अये देवि दुर्गे महाशक्तिरुपे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2019   
Total Views |



१९९१ साली साध्वी ऋतंबरा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दुर्गावाहिनी’ची स्थापना करण्यात आली. मुली आणि महिलांमध्ये देश, समाज, धर्मसंस्कार यांची जागृती व्हावी, त्यांचे एक सक्षम संघटन असावे, हा त्यामागचा उद्देश. ‘दुर्गावाहिनी’चा एक उपक्रम म्हणजे ‘दुर्गावाहिनी शिबीर.’ कोकण प्रांताचे ‘दुर्गावाहिनी शिबीर’ कांदिवलीच्या शाळेत २६ मे ते २ जून रोजी पार पडले. यावेळी या शिबिराचे उद्घाटन श्रीरंग राजे यांनी केले. या शिबिरामध्ये कोकण प्रांताच्या २१ जिल्ह्यांच्या १३३ दुर्गा सहभागी झाल्या होत्या. या शिबिराचा हा आढावा.


सगळ्यांमध्ये देव आहे असे मानतो तो हिंदू, जो सगळ्यांच्या कल्याणाची कामना करतो तो हिंदू आणि ज्याचा विश्वास आहे की, कोणत्याही पद्धतीने पूजा केली तरी, ती अंतिमत: देवालाच पोहोचणार आहे तो म्हणजे हिंदू. थोडक्यात, सगळ्या जगाला भातृभावाने बांधणारी जी निष्ठा आहे, जे मानवी मूल्य आहे ते हिंदुत्वाचा एक घटक आहे, हे ‘दुर्गावाहिनी’च्या शिबिरामध्ये मुलींना शिकवले जाते. आपली प्रत्येक कृती, प्रत्येक विचार हा देशानुकूल आणि देशाला प्रगतिपथावर नेणारा असावा, हे या शिबिरातील प्रमुख शिकवण.” विश्व हिंदू परिषद मुंबईचे महामंत्री आणि ‘दुर्गावाहिनी’ कोकण प्रांताच्या शिबिराचे पालक असलेले मोहन सालेकर सांगत होते. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या १३३ दुर्गांना भेटले आणि वाटले की, ‘फुलभी हैं और चिंगारीभी ये भारत की नारी हैं।विविध स्तरांतून आणि जिल्ह्यातून आलेल्या या प्रत्येक दुर्गाचे जीवनच वेगळे. पण, या शिबिरामध्ये त्यांना जोडणारा एक समान धागा दिसला. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर विलक्षण आत्मतेज होते, पण त्याचबरोबर प्रत्येकीच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. का बरं? काय झाले असेल? मुलींना विचारले, “तुमच्या डोळ्यात अश्रू का?” यावर श्रुती राऊत म्हणाली, “या सात दिवसांत २४ तास आम्ही एकमेकींसोबत होतो. सुरुवातीला वाटले की, ओळखपाळख नाही, कसे काय राहायचे! आमच्या सगळ्यांची परिस्थिती हीच. पण एक-दोन दिवसांनंतर आमची एकमेकींशी जीवाभावाची मैत्री झाली. या शिबिरामध्ये आम्हाला जे शिकवले, जे उपक्रम करून घेतले किंवा जे खेळ घेतले गेले, ते असे होते की, ज्यामध्ये आम्हा सर्वजणींना एकमेकींशी संवाद साधावा लागला. एकमेकींना सहकार्य करावे लागले. त्यातून जादूच झाली. आम्ही खरंच एकमेकींच्या सख्ख्या मैत्रिणी झालो. असे वाटते या शिबिराचे दिवस कधी संपूच नयेत.” याच वर्गात सारा शेट्टी भेटली. किशोरवयीन, नुकतीच दहावी पास झालेली सारा. उत्साह आणि चंचलतेने ती म्हणाली, “पहिल्यांदा मला बाबांचा रागच आला की, त्यांनी मला अनोळखी मुलींमध्ये या शिबिराला का पाठवले? पण, आता वाटते, बरे झाले मी इथे आले. मला खूप काही कळले. माझी एक खास वर्गमैत्रीण आहे, तिची आणि माझी जोडीच. आमच्यात कधीच भांडण झाले नाही. पण, मोदी जिंकले तेव्हा ती म्हणाली, ‘अभी हम ख्रिश्चन लोगोंको ये लोग इंडिया से बाहर फेकेंगे।’ मैत्रीण असल्यामुळे मी काही बोलले नाही. खरं म्हणजे काय बोलावे, हेच माहिती नव्हते. पण, तिचा समज चुकीचा आहे, असे वाटत होते. या शिबिराला आले आणि कळले की, खरे हिंदुत्ववादी मानवताधर्म मानतात. नेहमी सगळ्यांना मदत करतात आणि देशाचे भले करतात.”

 

शिबिरामध्ये सर्व स्तरातील मुलींची उपस्थिती दिसली, काही मुली तर अत्यंत उच्च आर्थिक स्तरातूनही या शिबिराला हजर होत्या. त्यांच्या घरी सर्व आधुनिक भौतिक सुखसंपन्नता दिमतीला. त्यामुळे या शिबिराला आल्यावर इथली साधी निवास व्यवस्था, या शिबिरामध्ये सगळ्यांना सामायिक शयनखोली, सामायिक शौचालय आणि इतर सगळ्याच शिस्तबद्ध व्यवस्था पद्धती पाहून या मुलींच्या मनात आणि चेहऱ्यावरही स्पष्ट प्रश्नचिन्ह होते, ‘हे काय आहे?’ त्यातही मोबाईलचा वापर करता येणार नाही, ही अट शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी होती. त्यामुळे काही मुलींना मोबाईलशिवाय राहायचे कसे, अशी चिंता भेडसावू लागली. साराने तर “मला घरी जायचे आहे, इथे मी राहूच शकत नाही,” म्हणून रडून रडून गोंधळ घातला. शेवटी वर्गप्रमुख, शिबीरप्रमुखांनी निर्णय घेतला की, साराला परत घरी पाठवायचे, तर साराचे आईवडील म्हणाले, “तिला या शिबिरातून जे शिकायला मिळणार आहे, ते मौल्यवान आहे. ती आज शिकली तर तिचेच आयुष्य समृद्ध होणार आहे. फक्त एक दिवस तरी शिबिरामध्ये ठेवा, नाहीच जमले तर आम्ही येतो.” मात्र, दुसऱ्या दिवशी सारा त्या शिबिराच्या बौद्धिकमध्ये, खेळांमध्ये आणि उपक्रमांमध्ये इतकी रमली की, काल आपण वेड्यासारखे का करत होतो, असे तिला वाटले. तिलाच असे वाटले नाही, तर शिबिराचा अनुभव घेतल्यानंतर प्रत्येकीला असेच वाटले. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या दुर्गांना एक फायदा मात्र नक्कीच झाला. मोबाईलचा अतिरिक्त वापर न करताही आपण व्यवस्थित जीवन जगू शकतो; किंबहुना मोबाईलशिवाय आपले दैनंदिन व्यवहार चांगले हाताळू शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यात आला. या आत्मविश्वासबरोबरच स्वसंरक्षणाचा विश्वासही त्यांच्यात आला. कारण, या वर्गात मुलींना दंड-छुरिका, रायफल शूटिंग, शारीरिक-मानसिक ताकद यांचा सराव करून घेतला जातो. मुलींना प्रशिक्षण दिले जाते. अर्थात, यात वापरले जाणारे सर्व साहित्य हे कायदेशीर असते. जसे छुरिका लाकडी असते आणि बंदूक ही एअर गन असते. त्यामुळे या शस्त्रांमुळे कोणालाही इजा अथवा त्रास संभवत नाही. अर्थात, हे सगळे सांगण्याचा उद्देश हाच की, या शिबिरामध्ये इतके विश्वासाचे आणि आपुलकीचे वातावरण होते की, सहभागी झालेल्या दुर्गांना पहिल्या दिवशी काही तास वेगळे अनोळखी वाटले. पण, नंतर शिबीर जसे सुरू झाले, तसे त्या शिबिरामध्ये सगळ्या रमून गेल्या. या रमण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, किशोरवयीन मुली काय किंवा मुले काय, कोणत्या विषयात रमतील? तर कोणत्यातरी हलक्या-फुलक्या, मनोरंजनात्मक विषयात. पण हेच तर वेगळेपण आहे. या शिबिरातील विषय हलकेफुलके नाहीत, तर गंभीर आणि प्रबोधनात्मक होते. पण, मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येकाने आपला विषय संवादात्मक प्रभावीशैलीने मांडला. त्यामुळे मुलींनी सर्वच विषय मनापासून आत्मसात केले.

 

 
 

मोहन सालेकर म्हणाले की, “या शिबिराची तयारी तीन महिन्यांपासून सुरू आहे. मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या दुर्गा यात सहभागी झाल्या आहेत. सात दिवसांच्या या वर्गामध्ये पालकांनी विश्वासाने मुलींना पाठवले आहे. हा विश्वास विश्व हिंदू परिषदेची आणि ‘दुर्गावाहिनी’चा मानबिंदू आहे.” इथे आलेल्या प्रत्येक दुर्गा इथून सकारात्मक प्रेरणा घेऊन आपापल्या स्तरावर कार्यरत होईल, या दृष्टीने शिबिराचे नियोजन केलेले दिसले. या शिबिरामध्ये जे विषय समाविष्ट केले गेले, त्याकडे एक नजर टाकली तरी मोहन सालेकरांच्या म्हणण्याची सत्यता पटते. या शिबिराची मुख्य शिक्षिका सायली देशमुख एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी. तिची आई ‘दुर्गावाहिनी’ची कार्यकर्ती. ती लहान असताना आई शिबिराला जायची. तेव्हा लहानपणापसून ती आईबरोबर जायची. तेव्हापासून तिला ‘दुर्गावाहिनी’च्या शिबिरांचा लळा. तेव्हापासून ती अनेक वेळा ‘दुर्गावाहिनी’च्या शिबिराला शिबिरार्थी म्हणून गेलेली. त्यानंतर दोनवेळा तिने मुख्य शिक्षिकेची जबाबदारीही पार पाडलेली. संपूर्ण शिबिराच्या व्यवस्थेचे समन्वय साधणे, हे मुख्य शिक्षिकेचे काम. वर्गाला उपस्थित मुलींची सर्वच व्यवस्था व्यवस्थित ठेवणे, शिबिरामध्ये आयोजित विषयांच्या वक्त्यांशी समन्वय साधणे तसेच, इतर सहशिक्षकांशी समन्वय साधणे या सर्व गोष्टी सायली लीलया पेलत होती. तिला याबाबत विचारले असता, तिने याचे सर्व श्रेय ‘दुर्गावाहिनी’लाच दिले. या शिबिराच्या वर्गाधिकारी होत्या उज्ज्वला शेटे. त्यांचे काम दैनंदिन कामामध्ये सर्व शिक्षकांची काळजी घेणे. वर्गामध्ये काही समस्या उद्भवलीच, तर ती समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करणे. या शिबिराबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “हे शिबीर म्हणजे नियोजन आणि समन्वयात्मक नेतृत्व यांचे शिक्षण देणारे उत्तम विद्यापीठ आहे. कारण, इथे कोणत्या वेळी काय करावे? एकाच वेळी सगळ्यांशी उत्तम संबंध कसे ठेवावे, याचे प्रत्ययकारी अनुभव मिळतात.” या शिबिराची सुरक्षिततेच्या दृष्टीनेही तयारी अगदी उत्तमच. बजरंग दलाचे कार्यकर्ते २४ तास या शाळेच्या गेटवर पहारा करत बसलेले. प्रत्येकाची चार-चार तास स्वेच्छा जबाबदारी. ती जागा सोडून तो कार्यकर्ता कुठेही त्या चार तासात गेला नाही. शिबिराशी संबंधित नसलेल्या कोणाला आत कामाशिवाय जाऊ दिले नाही, तसेच, कोणाला बाहेर जाऊ दिले नाही. त्यांची प्रेरणा काय असावी? कामधंदे सोडून इथे पहारा करत बसावे असे का त्यांना वाटले असावे? असे काहींना विचारले तर ते म्हणाले, “आमच्या बहिणी आहेत त्या. राष्ट्रधर्म, समाज-संस्कृतीसंबंधी माहिती घ्यायला आल्या आहेत. त्या सक्षम झाल्या, तर कुटुंब आणि समाज सक्षम होणार. आम्ही ‘ड्युटी’ वगैरे काही करत नाही, तर आमच्या बहिणींसाठी ही आमची जबाबदारीच आहे.” हे ऐकून मी थक्क झाले आणि धन्यही झाले. आजकाल समाजामध्ये मुद्दाम संशयाचे वातावरण पसरवण्याचे काहीजण काम करतात. या पार्श्वभूमीवर अनोळखी मुली, त्यांच्या व्यवस्थेसाठी काही लोक एकत्र येतात आणि कुटुंबासारखी एकमेकांची काळजी घेतात, प्रगती करण्याची प्रेरणा देतात तसेच या ना त्या रूपात सहभागी सर्वजणतेरा वैभव अमर रहे माँ’चे लक्ष्य साध्य करण्यास सिद्ध होतात का? हेच या ‘दुर्गावाहिनी’च्या शिबिराचे सत्यचित्र होते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@