युतीत सर्वकाही आलबेल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2019
Total Views |



कोल्हापूर : भाजप आणि शिवसेनेचे जागावाटपाच्या मुद्द्यांवरुन ठरले असून युतीत सर्वकाही आलबेल असल्याची स्पष्टोक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या सर्व १८ खासदरांना घेऊन ते गुरुवारी कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर उद्घव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “जागा वाटपाच्या मुद्द्यांवरुन आमचं ठरलंय. शिवसेना कोणत्याही गोष्टी चोरुन करीत नाही. दोन-चार जागांसाठी आम्ही युती केलेली नाही, हिंदुत्वासाठी युती केली आहे. काश्मीरचा मुद्दा केंद्राच्या अजेंड्यावर असल्याने आम्ही त्यासाठी युती केली आहे. यापूर्वी आम्ही भाजपकडे नाराजी व्यक्त केलेली होतीच. मात्र, आता सगळं चांगलं चाललेलं आहे.”

 

उपाध्यक्षपदाची मागणी, नाराजी नाही

 

दरम्यान, केंद्रातील एनडीए सरकारमध्ये शिवसेना हा भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा मित्र पक्ष आहे. त्यामुळे लोकसभा उपाध्यक्षपद आपल्यालाच मिळावे अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना “आम्ही भाजपकडे हक्काने याबाबत मागणी केली होती. मात्र, या हक्काच्या मागणीला नाराजी समजण्यात येऊ नये,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा उपाध्यक्षपदाबाबत सूचकपणे दावा केला.

 

सरकारला शाबासकी

 

दुष्काळाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्यात दुष्काळी स्थितीत महायुतीच्या सरकारकडून चांगले काम झाले आहे. या परिस्थितीत पाणी साठ्याची मोठी चिंतेची बाब बनली आहे. मात्र, दुष्काळाचा हा शेवटचा टप्पा असावा. तसेच लवकरात लवकर पाऊस पडावा अशी अपेक्षा करुयात.” या आठवड्यात मराठवाडा आणि बाजूच्या काही भागाचा दुष्काळ दौरा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. त्याचबरोबर अयोध्या दौर्‍याची तारीख लवकरच जाहीर करु, असेही ते पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@