'सरहद' का रखवाला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2019   
Total Views |



'सरहद फाऊंडेशन'च्या संजय नहार यांच्या सामाजिक कार्याविषयी आजच्या 'माणसं' या सदरात जाणून घेऊया.


'पृथ्वीवरचा स्वर्ग' म्हणून सुपरिचित जम्मू-काश्मीरची ओळख आज दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढ्यापुरती मर्यादित राहिली आहे. याच दहशतवादाने येथील लाखोंचे आयुष्य उद्ध्वस्त केले. बेरोजगारी व राजकीय अस्थिरतेमुळे काश्मीरमधील तरुण दहशतवादाचा मार्ग स्वीकारत आहेत. आजही येथे हजारो मुले आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. बंदुकीच्या गोळ्यांच्या भीतीने येथील तरुणपिढी घराबाहेर पडायला धजावत नाही. स्थानिक नेते व फुटीरतावादी नेते या परिस्थितीचा फायदा आपल्या आर्थिक व राजकीय स्वार्थासाठी करून घेतात. मात्र, संजय नहार हा मराठी तरुण जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन मृत्यूशी झुंज देत मागील तीन दशकांहून अधिक काळ येथील मुलांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी धडपडतो आहे. या धडपडीत त्याने अनेक वेळेस मृत्यूचा आणि धमक्यांचा सामना केला. या धमक्यांना, हल्ल्यांना तो घाबरला नाही, उलट या परिस्थितीला तोंड देत घेतलेला वसा आणखीन ताकदीने तो पुढे नेत आहे. याच 'सरहद फाऊंडेशन'च्या संजय नहार यांच्याविषयी आजच्या 'माणसं' या सदरात प्रकाश टाकणार आहोत.

 

संजय नहार यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील कान्हूर पठार येथे झाला. देशभक्ती आणि देशासाठी काम करण्याची ऊर्मी त्यांना लहानपणीच आपल्या काकांकडून धनराज नहार यांच्याकडून मिळाली. धनराज नहार यांनी यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे आणि केशवराव जेधे यांच्यासोबत काम केले आहे. यामुळे या दिग्गजांची नहार कुटुंबीयांच्या घरी उठबस असायची. त्यामुळे संजय यांना लहानपणापासून देशसेवेची प्रेरणा मिळाली. संजय हे १९८४-८५च्या काळात पुण्यातील स. प. महाविद्यालयात शिकत होते. नवीन काही तरी करण्याची ऊर्मी असलेले संजय हे महाविद्यालयीन उपक्रमांमध्येही अग्रेसर असायचे. त्यांच्यावर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. याच विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी महाविद्यालयीन जीवनात 'हिंदू एकता समिती'मध्ये काम केले होते. याच काळात पंजाब दहशतवादाच्या तडाख्यात सापडला होता. पंजाबमधील परिस्थिती पाहून संजय आणि त्यांचे मित्र अस्वस्थ झाले. काहीतरी वेगळे आणि 'अचाट' करण्याची ताकद असलेल्या संजयला पंजाबची परिस्थिती पाहवली नाही. दि. २३ मार्च, १९८४ रोजी त्यांनी 'वंदे मातरम्' या संस्थेची स्थापना केली आणि पंजाबमध्ये जाऊन शांतता आणि जातीय सलोखा यांसाठी काम करायचे उद्दिष्ट ठरवले. हुतात्मा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या हौतात्म्यदिनी पंजाबमधील जालियनवाला बागेत ३६१ तरुणांनी देशसेवेची शपथ घेतली आणि त्यांच्या 'अचाट' आणि 'अफाट' अशा कामाची सुरुवात झाली.

 

संजय नहार यांची ती तरुण संघटना १९८७ साली पंजाबमध्ये पूर आला तेव्हा बचाव आणि मदतकार्यामध्ये सहभागी झाली होती. त्यांच्यापैकी दत्तात्रय गायकवाड या तरुणाने एका शीख कुटुंबाला वाचवताना आपल्या प्राणांची आहुती दिली. पंजाबमधील त्यांचे काम वाढत होते आणि याच कामामुळे पंजाबमधील लोक त्यांना ओळखू लागले होते. १९९०च्या सुमारास पंजाबमधील आग शांत झाली, पण त्याच काळात काश्मीरमधील दहशतवाद बाळसं धरू लागला होता. याच काळात नहार यांचे लग्न झाले आणि त्यांनी आपली पत्नी सुषमा यांच्यासोबत काश्मीरचा दौरा केला आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तेथील भयावह परिस्थिती पाहून त्यांनी पंजाबमधून आपला मोर्चा काश्मीरकडे वळवला. येथील काम सुरू झाल्यानंतर त्यांनी आपल्या 'वंदे मातरम्' या संस्थेचे 'सरहद' असे नामकरण करत काम सुरू केले. येथील दहशतवादाचा लहानग्यांवर परिणाम होत असून त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता, असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या मुलांना तेथील दहशतीच्या वातावरणातून बाहेर काढण्याचे ठरवले. याच मुलांसाठी त्यांनी पुण्यामध्ये 'सरहद' शाळा सुरू करत या मुलांच्या पुनर्वसनाला सुरुवात केली. पंजाब आणि काश्मीरच नव्हे, तर ईशान्य भारतातील दहशतवादाचा बळी ठरलेल्या मुलांचे पुनर्वसन त्यांनी केले आहे.

 

दहशतवादाचा बळी ठरलेल्या या मुलांच्या पुनर्वसनासाठी 'सरहद' ही शाळा पुण्यातील कात्रजमध्ये आजही सुरू आहे. येथे त्यांना मोफत शिक्षण, राहण्याची व जेवणाची मोफत सोय उपलब्ध करून दिली आहे. आज येथील अनेक मुले उच्चशिक्षित असून अनेक चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहेत. मुलांच्या पलीकडे जात संजय नहार यांनी काश्मीरमधील गरीब आणि विधवा स्त्रियांना संघटित करत त्यांना स्वावलंबी होण्यासाठी 'आश' नावाचा प्रकल्पही सुरू केला आहे. पंजाबमध्ये 'मराठी साहित्य संमेलन,' पुण्यामध्ये 'विश्व पंजाबी संमेलन,' घुमानमध्ये देशाच्या विविध भाषांमधील साहित्यिकांचे 'बहुभाषा संमेलन,' पुण्यामध्ये दरवर्षी 'काश्मीर महोत्सव' असे साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, महाराष्ट्रातील प्रमुख पत्रकारांचा काश्मीर दौरा, ईशान्य भारतामध्ये सायकलफेरी, कारगिलमध्ये मॅरेथॉन शर्यत, संत नामदेवांच्या नावाचे घुमानमध्ये पदवी महाविद्यालय असे अनेक महत्त्वाचे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. एवढंच नाही, तर त्यांनी 'चिनार पब्लिकेशन' ही प्रकाशन संस्था सुरू करून आंतरराष्ट्रीय संबंध, पाकिस्तानसंबंधी अनेक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या संजय नहार यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. 'मुंबई तरुण भारत'तर्फे शुभेच्छा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@