महागात पडला नकारात्मक प्रचार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2019
Total Views |


 
 
केंद्रात भारतीय जनता पार्टीप्रणीत रालोआचे सरकार येऊन सहा दिवस झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारून कामांचा धडाकाही सुरू केला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमधील 10 अतिरेक्यांची यादी तयार केली आहे, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सियाचिनला भेट देऊन आले आहेत, तर भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्तेविकासाला गती देत, पर्यावरणसंरक्षणाच्या दृष्टीने महामार्गांच्या बाजूला सव्वाशे कोटी झाडे लावण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. सहाच दिवसांत सरकारचे असे सक्रिय होणे देशवासीयांना आश्वस्त करणारे आहे. पहिल्या कार्यकाळात दिलेली आश्वासने पूर्ण करतानाच, नव्या कार्यकाळासाठी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आव्हान मोदी सरकारपुढे आहे आणि सरकारची सहाच दिवसांतली सक्रियता लक्षात घेता, सगळी आश्वासनं सहज पूर्ण होतील आणि जनतेचे जीवनमान उंचावेल, यात शंका नाही.
 
 
 
 
एकीकडे मोदी सरकार जोमाने कामाला लागले असताना विरोधी पक्ष, विशेषत: कॉंग्रेस पक्ष अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेला दिसत नाही. केवळ मोदीविरोधातून पाच महिन्यांपूर्वी एकत्र आलेले अखिलेश यादव आणि मायावती यांची युती तुटली आहे. उत्तरप्रदेशात होणार्या विधानसभांच्या पोटनिवडणुकीत या दोघांचेही पक्ष वेगवेगळे लढणार असल्याची घोषणा दोन्ही नेत्यांनी कालच केली आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतच होते. जे घडले ते अनपेक्षित नाहीच. स्वार्थाने प्रेरित एकत्रीकरण हे टिकाऊ नसतेच, मायावती-अखिलेश युतीने दाखवून दिले आहे. बुआ-बबुआ फार काळ एकत्र राहणार नाहीत, असे भाकीत आधीच करण्यात आले होते. लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने मायावतींनी अखिलेशवर आगपाखड केली आणि पोटनिवडणुकीत वेगळे लढण्याची भाषा करतानाच, भविष्यात समाजवादी पार्टीत काही सुधारणा घडून आली तर पुन्हा एकत्र लढण्याचा विचार करता येईल, असे सांगत अखिलेश यादवांना हळूच बाजूला करण्याची किमया मायावती यांनी साधली.
 
तिकडे राहुल गांधी अध्यक्ष असलेला कॉंग्रेस पक्षही पराभवाच्या छायेतच असल्याचे दिसते आहे. कॉंग्रेसला मोठा उलटफेर होण्याची अपेक्षा होती. नरेंद्र मोदींवर तुटून पडलो, त्यांना चोर ठरवले, त्यांच्यावर राफेल प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप केले तर जनता आपल्या बाजूने उभी राहील, ही कॉंग्रेसची अपेक्षा होती. पण, राहुल गांधी आणि त्यांच्या साथीदारांनी मोदींना निवडणूक प्रचारात मोजून 56 शिव्या दिल्या आणि त्या सगळ्या कॉंग्रेसवरच उलटल्या! अपेक्षेच्या विपरीत निकाल लागले आणि कॉंग्रेसच्या आशा-आकांक्षा धुळीस मिळाल्या. भाजपाला 2014 च्या निवडणुकीत 282 जागा मिळाल्या होत्या, यावेळी दीडशेही मिळणार नाहीत, असा कॉंग्रेसचा होरा होता. पण, झाले उलटेच! यावेळी भाजपाला 303 जागा मिळाल्या अन् कॉंग्रेसच्या जागांमध्ये केवळ आठ जागांची वाढ होऊ शकली. निकालांच्या आधी मतदानयंत्रांवर संशय घेणारी कॉंग्रेस निकालांनंतर मात्र गप्पगार झाली. मतदारांनी कॉंग्रेसला सपशेल नाकारले होते. विशेषत: कॉंग्रेसच्या नकारात्मक प्रचाराला कॉंग्रेसने केराची टोपली दाखवली. काय झाले अन् कसे झाले, हे कॉंग्रेसला कळलेच नाही! निकालाच्या तारखेपर्यंत वृत्तवाहिन्यांवरून मुजोरी करणार्या कॉंग्रेसने आता आपल्या प्रवक्त्यांना वृत्तवाहिन्यांवरील चर्चांपासून महिनाभर दूर राहण्याचे फर्मान सोडले आहे. निवडणुकीत पक्षाची जी दाणादाण झाली, त्याबाबत राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्न विचारल्यास उत्तरे काय द्यायची, असा प्रश्न पडलेल्या कॉंग्रेसने चर्चांपासून दूर राहणे पसंत केले असले, तरी देशातील सगळ्यात जुन्या पक्षाला ही बाब शोभणारी नाही. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने शानदार कामगिरी केली. मोदींचे मजबूत आणि निर्णायक नेतृत्व, केलेल्या विकास कामांचा सकारात्मक प्रचार यामुळे भाजपाला दणदणीत यश मिळाले, तर राहुल गांधी आणि सॅम पित्रोदांसारख्या त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या नकारात्मक प्रचारामुळे कॉंग्रेसला दारुण पराभवाचे तोंड पाहावे लागले, यात शंका नाही.
 
दिवसामागून दिवस जात होता, तसा कॉंग्रेसचा नकारात्मक प्रचार वाढत होता आणि मोदींच्या विजयाचा मार्गही गतीने सुकर होत होता. दशकांपासून नेहरू-गांधी परिवार ल्युटियन दिल्लीतल्या बंगल्यांमध्ये राहात आला आहे. मधल्या काळात तर अशी वेळ आली की, गांधी घराण्याला ल्युटियन दिल्लीतल्या बंगल्यात राहण्याचा काही अधिकार राहिला नव्हता; तरीपण गांधी कुटुंबीय या अलिशान बंगल्यांमध्ये वास्तव्यास होते, आजही आहेत. या बंगल्यांमध्ये राहणे हा जणू आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, अशीच धारणा या कुटुंबाने करून घेतली आहे. ल्युटियन दिल्ली ही नरेंद्र मोदींसारख्यांच्या राहण्याच्या लायक नाही किंवा मोदी या ठिकाणी राहण्याच्या लायकीचे नाहीत, असा भ्रम या नेहरू-गांधी खानदानीने करून घेतला होता. मोदींनी नेहरू-गांधी घराण्यावर टीका करायला सुरुवात केल्यापासून राहुल गांधी आणि त्यांचे मनसबदारी सरदार मोदींवर असे काही तुटून पडलेत की, मर्यादेची लक्ष्मणरेषा कधी ओलांडली, हे त्यांचे त्यांनाही कळले नाही! पंतप्रधान बनवावे असे मोदींमध्ये काहीच नाही, ते चहा विकण्याच्याच लायकीचे आहेत, असा नकारात्मक प्रचार कॉंग्रेस नेते करीत राहिले. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासूनच नेहरू-गांधी खानदानीने त्यांच्यावर टीका सुरू ठेवली आहे. सोनिया गांधी यांनी तर त्यांना ‘मौत का सौदागर’ असे म्हटले होते. आपण आरोप करताना मर्यादेचे उल्लंघन करतो आहोत, याचे भानही त्यांना राहिले नव्हते. मोदींनी सातत्याने कॉंग्रेसची टीका सहन केली. यावेळच्या निवडणूक प्रचारात तर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना चोर ठरवून टाकले. वास्तविक, ही बाब देशातील मतदारांना आवडली नाही. त्याचे परिणाम जे व्हायचे तेच झाले.
 
 
रालोआच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत जी विकासाची कामं केली, त्याकडे दुर्लक्ष करत पंतप्रधानांना चोर ठरवणारा नकारात्मक प्रचार जनतेने मतदानातून हाणून पाडला, हे 23 मे रोजी सिद्ध झाले. वास्तविक, नरेंद्र मोदी हे अतिशय गरीब कुटुंबात जन्मले आहेत. आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी त्यांनी रेल्वेस्थानकावर चहा विकण्याचे काम केले होते आणि ही बाब संपूर्ण देशाला माहिती होती. असे असताना मोदींवर टीका करताना कॉंग्रेसने फार काळजी घ्यायला पाहिजे होती. एका मर्यादेत राहून कॉंग्रेसने आरोप करायला हवे होते. पण, प्रचार करताना कॉंग्रेस पक्षाने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आणि जनतेला ते अजीबात आवडले नाही. जनतेने मोदींच्या पदरात आपल्या मतांचे भरभरून दान टाकले आणि कॉंग्रेसला एवढ्या जोरात आपटले की, अजूनही कॉंग्रेस पक्ष नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडलेला नाही! साधन-संपन्न आणि प्रतिष्ठित असा नेहरू-गांधी परिवार, एका गरीब घरात जन्माला आलेल्या मोदींना शिव्या घालतोय्, चोर ठरवतोय् ही बाब जनेतला रुचलीच नाही. कॉंग्रेसने घोर असंवेदनशीलतेचा परिचय दिला, त्याला जनतेने चोख उत्तर देत चारीमुंड्या चीत केले. यातून धडा घेऊन कॉंग्रेस आणि त्या पक्षाचे नेते स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणतील, अशी अपेक्षा करू या...!
@@AUTHORINFO_V1@@