माणसांचे पर्यावरण आणि पर्यावरणातला माणूस!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2019   
Total Views |

असासा बुजूर्गोंका इस तरह बांटा गया
आंगनमे हराभरा पेड था, वह भी काटा गया...
अब्बास दाना बडौदीचा हा शेर सहजच नाही आठवला. झाडं लावता लावताच आम्ही ती कधी कापतो तेही कळत नाही. बकर्या आणि कोंबड्या, मासळ्यांचे तसेच झाडांचेही. या प्राण्यांची पैदास खाण्यासाठी आणि म्हणूनच कापण्यासाठीच केली जाते. त्यांच्या पोषणावर खूप मायेनं लक्ष दिलं जातं असं नाही. असलीच माया तर ती स्वत:वरची असते. जिभेच्या चोचल्यांसाठी कापता आली पाहिजेत अन् त्यासाठी ती छान सुदृढ, मांसल असली पाहिजेत... झाडांचेही तसेच. कापता यावीत, यासाठी झाडं लावली जातात अन् झाडं कापतो आहोत, यावरून पर्यावरणप्रेमींचं लक्ष भरकटविण्यासाठी ती लावली जातात.
 
 
 
माणसाचं अध्यात्म आणि पर्यावरण सगळंच ‘मी’भोवतीच गुंफलेलं असतं आणि त्याचा मी हा त्याच्या गरजांनी भरगच्च लदबदलेला असतो. मी मी अन् कुसल्याचं बी... आता कुसला म्हणजे काय? कुसला म्हणजे आपले करटुलं असतात ना... आता पुन्हा नवा सवाल, करटुले म्हणजे काय? तर पावसाळ्यात, साधारण श्रावणात ही भाजी येते मार्केटला. आता ती केवळ खेड्यांत मिळते. ही रानभाजी आहे. तशाच आकाराचे कुसल्याचेही फळ असते. ते अत्यंत विषारी असते. जुन्या काळात कुणाला आत्महत्या करायची असेल, तर कुसल्याचं बी कुटून खायचे लोक... अर्थात, या म्हणीचा अर्थ हाच की ‘मी’, ‘मी’, असे करून माणसाचं विषारी कुसल्याचं बी होऊन जातं. माणसानं मी, मी करत अनेक गोष्टींची अशी नासाडीच करून टाकली आहे. सगळ्यात मोठी हानी तर त्याने पर्यावरणाचीच केली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा करताना आठवलं हे सारं...
आपले तुकाराम महाराज म्हणायचे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे... माणसानं हे सोयरेपण कधीचेच तोडले. त्यामुळे अनेक गोष्टी नाहीशा करून टाकल्या. माणसाचा हा जो ‘मी’ आहे ना तो खूपच बुलंद आहे. त्याला वाटते की, ‘मी’ म्हणजेच विश्व... त्यामुळे त्याने सार्या जगाचा वापर केवळ स्वत:साठीच केला. बरं, तो काय केवळ प्राणी, पक्षी, झाडं, वेली, जमीन, हवा, पाणी, प्रकाश यांच्याशीच बेईमानीनं वागला आहे का? माणसंही माणसांशी इमानदारीनं नाही वागत! दोन माणसंही एकत्र आले की, त्या दोघांचाही ‘मी’ वेगळा असतो. याला वाटतं, मीच खरा अन् माझंच बरं व्हायला हवं. बरं, दोघांचंही चांगलं होणं, सुख वेगवेगळंच असतं. त्यामुळे दोघेही मग एकमेकांच्या जिवावर उठतात. आतातर माणसांची गर्दी इतकी वाढली आहे की, प्रत्येकाच्या गरजा एकमेकांना टकरावतात. याला वाटते, माझ्याच वाट्याला सारे यायला हवे अन् त्यालाही वाटते की, मलाच सगळे मिळायला हवे. त्यामुळे ओरबाडणे सुरू होते. संसाधने कमी पडतात. त्यामुळे आधीच निसर्गापासून दूर असलेला माणूस आणखीच दूर गेला आहे. त्याने स्वत:साठी अनैसर्गिक अशा सुखसाधनांची निर्मिती केली.
 
 
 
आता पर्यावरण म्हटलं की, लोकांना केवळ झाडं, वेली, पाणी, नद्या, नाले, जमीन, माती असेच काही वाटते. कुणाला आभाळ म्हणजे पर्यावरण वाटते. पर्यावरणात माणूस माणसालाच काऊंट नाही करत. तो स्वत:ला पर्यावरणापासून वेगळे करतो अन् गंमत म्हणजे तरीही तो पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याची आहे, असे मानतो. आता पर्यावरण म्हणजे माणसा-माणसातील संबंधही आहेतच ना... मानवी संबंधांच्या पर्यावरणाचे प्रदूषण झाले आहे, त्याचे काय करायचे?
निसर्ग हाच खरा धर्म आहे अन् त्या धर्मात हव्यास नाही. माणसाने हव्यास धरला अश्मयुगात आणि त्याही आधी जंगली अवस्थेत तो निसर्गाच्या अधिक जवळ होता. नंतर मात्र तो प्रगत होत गेला अन् त्याने निसर्गाच्या विरुद्ध जाऊन स्वत:साठी संसाधने निर्माण केली. त्याची साठवणूक करणे म्हणजे संपन्नता, असे तो समजू लागला. निसर्गात कुठलाच प्राणी साठवणूक नाही करत. इतरांच्या वाट्याचे मला मिळाले पाहिजे, असा विचार करत नाही. वाघाने ठरविले की, मलाच जास्त मांस मिळाले पाहिजे अन् म्हणून त्याने जंगलातले प्राणी मारून गुहेत साठवून ठेवणे सुरू केले अन् ते चांगले राहावेत म्हणून अनैसर्गिक अशी साधने वापरली तर काय होईल? माणूस तर साठवणूक करतो अन् त्याचा धंदाही करतो.
 
 
 
माणूस अनेक प्राण्यांची अन् पिकांचीही पैदास करतो. ती साठवून ठेवतो. आपण फ्रोजन चिकन खातो. बकर्या मारून त्याचे मटणही साठवून ठेवतो. त्याची विक्री करतो. या जगातला सगळ्यात क्रूर प्राणी हा माणूसच आहे. वाघ, सिंह यांच्यासारखे मांसभक्षी प्राणी क्रूर आहेत, असे आपण मानतो; पण तेही ठरलेलेच प्राणी खातात. ते शिकार करतात, पण साठवून ठेवत नाही. भूक नसेल तर शिकारही करत नाहीत. माणूस खात नाही असा एकही प्राणी या जगात आहे का? माणूस इतका क्रूर आहे की, त्याच्यापासून वाघ, सिंह यांनाही संरक्षण देण्याची वेळ आलेली आहे! वाघ्र प्रकल्प कशासाठी? वाघांना कुणापासून भीती आहे? माणूस अगदी नाग-सापही खातो. नुसता खातच नाही, तर प्राण्यांच्या कातडीपासून तर नखं, दात यांचाही वापर करतो. नुसता वापरच नाही करत तर व्यापार करतो. हस्तिदंतासाठी त्याने हत्तींना धोक्यात आणले आहे. त्याला अत्यंत उपयुक्त असलेला पशू म्हणजे गाय... पण, तो गायीलाही मारतो. तिचेही मांस खातो. नुसते खात नाही तर ते विकतो. त्याला गुलाबी आर्थिक क्रांती म्हणतात. नागाच्या कातडीचे पट्टे, पर्स अशा वस्तू तयार करण्यात येतात. त्यासाठी नाग मारले जातात. कधीकाळी नागाची माणसाला भीती वाटायची, आता नागाला माणसाची भीती आहे! चीनमध्ये तर वाघाचे मांस ही खास डिश आहे. त्यासाठी तिकडे, आपल्याकडे कोंबड्या-बकर्या पाळतात तसे वाघ पाळले जातात...
आपण वाघ खातो, आपण साप खातो अन् त्यांच्या वस्तूही करतो. कुठेतरी वाचलं आहे मी की, वाळवंटात, आपल्याकडे पावसाळ्यात ज्यांना आपण पैसा म्हणतो त्या अळ्यांचा ज्युस पितात... म्हणजे अंगातली उष्णता कमी होते. त्यासाठी त्या अळ्याही मारून चिरडल्या जातात. हे सांगण्याचा इतकाच अर्थ की, माणूस त्याच्या ‘मी’साठी निसर्गाचं किती दोहन करतो. त्याने जंगलं खाल्ली, नद्या पिऊन टाकल्या. आता आपल्या विकासाच्या संकल्पना इतक्या भौतिक आणि अनैसर्गिक आहेत की, त्याच्यासाठी आपण सारेच कसे वेठीस धरले आहे. कारखान्यांत आपण वस्तू निर्माण करतो अन् त्यासाठी निसर्ग वेठीस धरतो. नद्या नासविल्या आम्ही. पवित्र म्हटलं नद्यांना अन् त्यांची घाण करून टाकली. कधीकाळी गंगेचं पाणी बाटलीत भरून घरात ठेवायचे, ते कितीही वर्षे झालीत तरी खराब होत नव्हतं. मरत्या माणसाच्या तोंडात अखेरचे म्हणून ते पाणी टाकले जात होते. आता गंगा नदीच आम्ही घाण करून टाकली आहे. मानवी उत्सर्जनाने सारा निसर्ग आम्ही नासवून टाकला आहे. तरीही आम्हाला जाग यायची काही पाळी दिसत नाही. फक्त आम्ही पर्यावरण दिन साजरा करतो. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ म्हणतो अन् आमच्या महामार्गांच्या निर्माणासाठी झाडांची कत्तल करतो.
 
 
 
 
आम्हाला जे हवं ते आम्ही निसर्गातून ओरबाडून घ्यायला लागलो. व्यावसायिक वागण्याला हरकत नाही. निसर्गाशी व्यावसायिक वागायचे असेल, तर जे घेता त्याच्या बदल्यात त्याला तितकेच परतही करायला हवे. माणूस निसर्गात काहीच निर्माण करत नाही, त्यामुळे त्याला घेण्याचा काहीच अधिकारही नाही. आपण पाणी निर्माण करू शकत नाही. जमीन तयार करू शकत नाही. ती आहे तितकीच असणार आहे. कुठल्याच प्रयोगशाळेत माती तयार केली नाही माणसाने, नासाडी मात्र केली. आता त्याला जाग यायला लागली आहे. आम्ही हवा खराब केली, आवाजाचे प्रदूषण केले. मुळात माणूसच प्रदूषित झाला आहे. माणसा- माणसातील संबंधच प्लॅस्टिकचे झाले आहेत. कचकड्याचे झाले आहेत. त्यातून प्रेमाचा ओलावा निर्माण होत नाही अन् निर्माण झालेली कटुता प्लॅस्टिकसारखी संपता संपत नाही.
 
 
गेल्या वर्षीच्या पर्यावरण दिनाचे स्लोगन होते- ‘प्लॅस्टिक निर्मूलन’ अन् त्याचे नेतृत्व भारताकडे होते. खरा भारतीय धर्म हा निसर्गच आहे. आपल्या दैनंदिनीत निसर्गाच्या पूजेचे काहीच नाही. किमान निसर्गाविषयीच्या आपल्या दायित्वाची जाणीव रोजच्या दैनंदिनीत दिसायला हवी. आपल्या भारतीय संस्कृतीत आपण झाडांची पूजा करतो. आपल्या देवतांशी आपण प्राणी जोडले आहेत. गणपतीचे वाहन उंदीर आहे. शंकराच्या गळ्यात नाग असतो अन् आपण त्यांची सतत हत्याच करत आलो आहोत. निसर्गधर्म पाळा अन् विनाश टाळा, इतकेच आजच्या दिवशी!
@@AUTHORINFO_V1@@