कुणी निंदा, कुणी वंदा, मोदींचा तिन्ही लोकी झेंडा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2019   
Total Views |

2019 मध्ये मोदींना निवडणुकीत अभूतपूर्व असा विजय मिळाला. जागतिक वृत्तप्रसारमाध्यमांनी हे वृत्त पहिल्या पानावर छापून दखल घेतली. आता भारतात हिंदुप्रधानतेला उभारी मिळेल आणि इतर धर्मीयांना दुय्यम नागरिकांप्रमाणे वागविले जाईल, असा टाहो यांपैकी काहींनी फोडला आहे. विशेष असे की, ही माध्यमे ज्या देशातील आहेत, ते बहुतेक सर्व देश घोषित ख्रिश्चन राष्ट्रे आहेत. एवढेच नव्हे, तर मोदींच्या विजयामुळे ‘सेक्युलॅरिझम् खतरेमें’ अशी चिंता पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी व्यक्त केलेली पाहून आश्चर्यासोबत करमणूकही होईल.
 
एकच मथळा- जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड मोठा जनादेश मिळवून दुसर्यांदा निवडून आले आहेत, अशा आशयाचा मथळा बहुतेक वृत्तपत्रांचा आहे. मोदींचा हा विजय सध्याच्या जागतिक राजकीय कलाशी मिळताजुळता आहे, हेही सर्व वृत्तपत्रे नमूद करीत आहेत.
असोसिएटेड प्रेस- भारतीय जनता पक्षाचा हा नेता भारून टाकणार्या व्यक्तिमत्त्वाचा असून मतदारांचे ध्रुवीकरण करणे, हा त्याचा हातखंडा आहे. सध्या जगभर उजव्या विचारसरणीच्या सवंग लोकप्रियतेची चलती असून अमेरिका, ब्राझील व इटलीसकट अनेक देशांत हे अनुभवाला आले आहे. निवडणुकीच्या प्रचारात सुरक्षाविषयक कडक पवित्रा आणि आपापल्या देशाच्या व्यापारहिताला प्राधान्य, हे सर्वदूर आढळून आले आहे, अशा आशयाची टिप्पणी असोसिएटेड प्रेस या वृत्तप्रसारमाध्यमाची आहे.
भारतातील ही 17 वी निवडणूकप्रक्रिया दीर्घकाळ चालली आणि निकाल काय लागणार, हे ते प्रत्यक्ष जाहीर होण्याअगोदरच स्पष्ट झाले होते. बहुतेक सर्व एक्झिट पोल्सही हेच भविष्य वर्तवीत होते. नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) केवळ विजय संपादूनच थांबणार नाही, तर हा एनडीएचा एखाद्या त्सुनामीसारखा जबरदस्त विजय असेल, यावर सर्वांचे एकमत होते.
एनडीएचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीने केले असून, तिने लोकसभेतील 543 जागांपैकी स्वबळावर 303 जागा आणि एनडीएच्या एकूण 350च्या जवळपास जागा खेचून आणल्या आहेत. लोकसभेत याशिवाय दोन नामनिर्देशित सदस्य असतात, असे सर्व तपशील देत वृत्तसृष्टीने या विजयाची नोंद घेतली आहे. पाश्चात्त्य वृत्तसृष्टीत टीका (अपवाद जेरुसलेम पोस्ट), तर पाकिस्तानचा अपवाद वगळता आशियातील वृत्तसृष्टीत स्वागत, अशा प्रकारची दुभंगलेली प्रतिक्रिया आढळताना दिसते.
न्यू यॉर्क टाइम्स- या नेत्याला (नरेंद्र मोदींना) प्रखर हिंदुराष्ट्रवाद, लोकांना भावणारी विनयशीलता आणि गरिबांविषयीची विशेष कणव यांच्या बेमालूम मिश्रणाची मदत झाली आहे.
गार्डियन- या वृत्तपत्राच्या संपादकीय टिप्पणीत, मुस्लिमांबाबतचा कळवळा(?) व्यक्त झाला आहे. भारताचा आत्मा या विजयाने काळवंडला असून, 19.5 कोटी भारतीय मुस्लिमांकडे आता दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून पाहिले जाईल.
 
वॉशिंग्टन पोस्ट- ‘वॉशिंग्टन पोस्ट’चा सूर काहीसा वेगळा आहे. ‘इंडियाज डेंजरस लॅण्डस्लाइडस्’ या लेखात हा सूर स्पष्टपणे जाणवतो. अर्थकारणाला उभारी प्राप्त करून देईन आणि रोजगारात वाढ घडवून आणीन, ही मोदींची 2014 मध्ये मतदारांना दिलेली अभिवचने होती. ती पूर्ण झाली नाहीत. याउलट, देशाला सुरक्षा प्रदान करण्याची आणि दहशतवादाला पायबंद घालण्याची क्षमता असलेले एकमेव नेतृत्व आपलेच आहे, असे मतदारांवर बिंबवून मोदींनी राष्ट्रवादाला साद घातली आणि घवघवीत यश संपादन केले. फेब्रुवारीत काश्मीरमध्ये आत्मघातकी बॉम्बहल्ला झाला होता आणि भारत आणि पाकिस्तान यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा हाच प्रचारातला मुख्य मुद्दा बनला. या मोठ्या विजयामुळे मोदी देशासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक सुधारणांऐवजी, हिंदुराष्ट्रवादाची भूमिका घेऊनच पुढे जातील, अशी शंका आणि भीती ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने व्यक्त केली आहे. बरखा दत्त यांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मधील ‘धिस इज मोदीज इंडिया नाऊ’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला आहे. मोदींवर अनेक आरोप झाले, भरपूर टीका झाली. मात्र, मोदींनी अतिशय कुशलतेने ही प्रतिकूलता अनुकूलतेत परिवर्तित करून अपूर्व यश मिळविले. डॉ. अमर्त्य सेन यांनीही आपली भडास व्यक्त केली आहे. ‘‘मोदी वन पॉवर, नॉट द बॅटल ऑफ आयडियाज्,’’ असे म्हणत, मोदी सत्तास्थानी राहणार आहेत, तर अमर्त्य सेन आपल्या कल्पनाविश्वात, ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. पंकज मिश्रा हे खरेतर पत्रकार व लेखक आहेत. पण, त्यांनी मोदींच्या विजयाबाबत मतदारांना खूप दूषणे दिली आहेत.
डेली टेलिग्राफ- ब्रिटनच्या ‘डेली टेलिग्राफ’ने, ‘मोदींना माफ केले,’ असा मथळा दिला आहे. मोदींनी अनेक चुका केल्या, अनेक गैर गोष्टी केल्या, पण मतदारांनी त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना भरभरून जागा दिल्या. माझ्या हातूनही चुका झाल्या असतील, होऊ शकतील, पण हेतू कधीच वाईट नसतात, असे स्वत: मोदीही म्हणाले आहेत.
गार्डियन- बहुपक्षीय लोकशाही मोदींनी धोक्यात आणली आहे, अशी चिंता ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने अग्रलेखात व्यक्त केली आहे. आता हिंदुराष्ट्रवाद फोफावेल, उच्चवर्णियांचे वर्चस्व वाढेल, उद्योगपतींचा वरचष्मा निर्माण होईल आणि घटनात्मक संस्थांची स्वायत्तता धोक्यात येईल, असे नमूद करून, नेहरू-गांधी घराण्याने कॉंग्रेसच्या माध्यामातून याची चिंता केली पाहिजे, असा सल्लाही गार्डियनने दिला आहे.
ग्लोबल टाइम्स, साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट, ही चीनची दोन मातब्बर सरकारी वृत्तपत्रे आहेत. या दोन्ही वृत्तपत्रांत मोदींच्या विजयाचे स्वागत केलेले आढळते.
ग्लोबल टाइम्स- यात चीनचे अध्यक्ष शी जिनिंपग यांनी फेरनिवडीबद्दल मोदींचे अभिनंदन केले असल्याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. तसेच या वृत्तपत्रात भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध दृढ होतील, अशी आशा आणि विश्वासही व्यक्त होताना दिसतो आहे. चीन व अमेरिका यात व्यापारयुद्ध भडकले असले, तरी भारत आणि चीन यातील व्यापारात वाढ होते आहे, याचा उल्लेख हे वत्तपत्र (मुद्दाम?) करते आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी बीआरआय प्रकल्पात भारत सहभागी व्हावा यासाठी तर ही साखरपेरणी नाही ना?
साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट- ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’मधील मजकुराचा सूर काहीसा वेगळा असला, तरी ‘ग्लोबल टाइम्स’मधील मजकुराला पूरक असाच आहे. मोदींचे नेतृत्व कणखर आणि सक्षम आहे आणि ते जनतेला चांगले दिवस आणण्यासाठी झटत आहेत. प्रचार करताना मोदींनी प्रतिकूल मुद्दे मोठ्या खुबीने बाजूला सारले. आपली भूमिका मतदारांना पटविण्यात त्यांना अपूर्व यश मिळाले आहे.
द जेरुसलेम पोस्ट- इस्रायलमधील ‘द जेरुसलेम पोस्ट’सकट एकजात सर्व इस्रायली माध्यमांनी, निवडणुकीचे निकाल जाहीर होताच, पंतप्रधान नेतन्याहू यांनी नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्याचे वृत्त ठळकपणे देताना, नेतन्याहू यांनी व्यक्त केलेली खंतही जाहीर केली आहे. मीही निवडणूक जिंकलो आहे, पण पाठिंब्यासाठी मला घटकपक्षांवर अवलंबून राहावे लागते आहे. तुमचे तसे नाही. इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंध मोदींच्या विजयानंतरच दृढ झाले आहेत. इस्रायलला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत, ही बाब इस्रायलच्या कायम लक्षात राहील. उभयतांच्या फेरनिवडीने, भारत व इस्रायल या दोन देशांतील संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास इस्रायलमधील सर्व वृत्तपत्रांनी व्यक्त केला आहे.
डॉनची विस्तृत प्रतिक्रिया-पाकिस्तानमधील ‘डॉन’ या एका प्रमुख वृत्तपत्राचा कांगावा वेगळाच आहे. मोदी सतत तीन-चार महिने मुस्लिमांविरुद्ध गरळ ओकीत होते. त्यांनी धार्मिक द्वेष पसरवला आणि पाकिस्तानच्या विरोधात आरडाओरड करून मतदारांना भुलविले. देशात राष्ट्रवादाचा भडका उडावा म्हणून त्यांनी शेवटी पाकिस्तानवर हवाई हल्ले केले. आतातरी मोदींनी भारतीय उपखंडात शाश्वत शांतता कशी निर्माण होईल यावर लक्ष केंद्रित करावे. पाकिस्तानशी चर्चा करून शांतता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करावे.
खरेतर भारतीय उपखंडात टिकाऊ शांतता कशी नांदेल, यावर भर असायला हवा होता. यासाठी वाटाघाटी करण्याची आवश्यकता होती. पाकिस्तानने यासाठी वारंवार आपला हात पुढे केला, पण भारताने तो सातत्याने झिडकारला. भारताबद्दल पाकिस्तानी जनतेसमोर कसे चित्र उभे केले जात असते, हे ‘डॉन’मधील वृत्तावरून स्पष्ट होईल. दहशतवाद आणि वाटाघाटी एकाच वेळी चालू शकत नाहीत, ही भारताची भूमिका पाकिस्तानी जनतेसमोर कधीच येणार नाही, याची पुरेपूर काळजी पाकिस्तान सरकार तर घेत असतेच, पण ‘डॉन’सारखी वृत्तपत्रेही याबाबतीत कसे पुढाकार घेत आहेत, हे यावरून स्पष्ट होईल.
- वसंत गणेश काणे
9422804430
@@AUTHORINFO_V1@@