'जय' राष्ट्रहिताची नवी परिभाषा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2019   
Total Views |




जपानमध्ये सुरू असलेल्या 'जी-२०' देशांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या वेळी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. यावेळी मोदी यांनी जपान, अमेरिका आणि इंडिया यांचा अर्थ 'जय' असा होतो आणि हिंदी भाषेत 'जय'चा अर्थ विजय असा होतो, असे प्रतिपादन केले.


आजच्या आधुनिक युगात देशप्रेम हे राष्ट्रहित पूरक विचारांचा जागर करत, ते विचार प्रत्यक्ष अमलात आणून आणि त्या विचारांना पोषक ठरेल, असे जागतिक स्तरावर संबंध प्रस्थापित करत व्यक्त करणे खऱ्या अर्थाने आवश्यक आहे. या माध्यमातून राष्ट्रांतर्गत आणि पर्यायाने देशाची जागतिक स्तरावर विकासाच्या दृष्टीने वाटचाल होतेच. मात्र, देशाचे सार्वभौमत्व आणि राष्ट्र संरक्षण या बाबीदेखील अधिक मजबूत होण्यास मदत होते. सध्या भारताच्या नेतृत्वाने हे जाणले असावे. म्हणून जपान येथे होत असलेल्या 'जी-२०' देशांच्या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय या राष्ट्रहित धोरणाच्या नव्या परिभाषेस जन्म दिला. जय (JAI) अर्थात जपान, अमेरिका आणि इंडिया (भारत). जपानमध्ये सुरू असलेल्या 'जी-२०' देशांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या वेळी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. यावेळी मोदी यांनी जपान, अमेरिका आणि इंडिया यांचा अर्थ 'जय' असा होतो आणि हिंदी भाषेत 'जय'चा अर्थ विजय असा होतो, असे प्रतिपादन केले. वरकरणी अतिशय साधीसोपी आणि सहज रचना यातून दिसत असली तरी, आशिया खंडातील हिंदी आणि प्रशांत महासागरात असणारा तणावाच्या दृष्टीने हा मंत्र विशेष दखलदायक असाच आहे. तसेच, या क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि या क्षेत्राचा विकास यासाठीदेखील जयमधील राष्ट्रांचे मनोमिलन आणि परस्परपूरक साहाय्य नीती ही आंतरराष्ट्रीय पटलावर नक्कीच आगामी काळात महत्त्वाची भूमिका बजावण्यात मोलाचे योगदान देणारी ठरण्याची शक्यता आहे. या वेळी या तीनही नेत्यांनी हिंदी आणि प्रशांत महासागर क्षेत्रात एकत्र काम करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे या विवादित क्षेत्रात आपले स्थान शोधणाऱ्या चीनला याची मोठी चपराक बसण्याची आणि चीनच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण होण्याची गडद शक्यता जागतिक पटलावर आगामी काळात व्यक्त होईल.

 

शेनकापू बंदर संदर्भात चीन - जपान संबंध यापूर्वीच ताणले गेले आहेतच. तसेच, चीन व अमेरिका यांच्यातील व्यापारी धोरणामुळे चीन आणि अमेरिका यातील संबंधदेखील मागील काळात तणावपूर्ण झाले होते. अशातच जपानचे अमेरिकेशी सुधारणारे संबंध आणि भारताचाही त्यात असणारा सहभाग आणि जागतिक स्तरावर जय या त्रिराष्ट्र नीतीचा झालेला उदय हा आशिया खंडात आगामी काळात अनेक बदल घडवून आणण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची शक्यताच जास्त आहे. अशातच, भारतासाठी कायमच मोठी डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानासाठीदेखील जय हे नवीन अस्त्र मोठे घातक ठरणार आहे. कारण पाक या एका देशाभोवती जयमधील अमेरिका आणि आशियातील सुपरपॉवर चीन या दोन देशांचे मोठे संदर्भ राहिले आहेत. मात्र, आता अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांनादेखील यामुळे एक नवीन आयाम प्राप्त होण्यास मदत होईल आणि तिकडे चीनदेखील या धक्क्यात असेल. त्यामुळे पाकलादेखील आपले गार्‍हाणे मांडण्यासाठी एखादा नवीन देश यामुळे शोधावा लागण्याची शक्यता आहे. जय या संज्ञेच्या माध्यमातून भारताने एकाच वेळी आपले दोन शेजारी शत्रू राष्ट्रांसमोर खऱ्या अर्थाने आज प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यामुळे देशप्रेम व्यक्त करताना केवळ घोषणा आणि लढाया यांनाच महत्त्व असते, असा समज बाळगणार्‍यांसाठीदेखील हे एक उत्तम उदाहरण आहे. राजकीय समज आणि उत्कृष्ट व्यूहनीती यामुळे शत्रूराष्ट्राला हाती शस्त्र घेण्यापूर्वीच नामोहरम करण्याची किमया जयच्या माध्यमातून साधण्यात आली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपल्या राष्ट्राचा विकास करताना दोन मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते. १) देशाच्या सीमा शांत ठेवणे आणि २) जे राष्ट्र विकसित आहेत, त्यांच्याशी मित्रत्व प्रस्थापित करणे. या दोन्ही बाबी जय या एकाच मंत्रातून साधण्यात आल्या आहेत. आणि जयमधील तीनही राष्ट्रे ही लोकशाही राज्यव्यवस्था असणारी आहेत. त्यामुळे सामाजिक मूल्यांसह राजकीय व्यवस्थेचा समान धागादेखील जपान, अमेरिका आणि इंडिया यांना जोडणारा आहे. त्यामुळे आगामी काळात जय नक्कीच राष्ट्रहित धोरणाची नवी परिभाषा ठरू शकेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@