भाजपच्या विजयाने होऊ लागली उपरती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2019   
Total Views |


 


लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या प्रचंड यशामुळे विविध पक्षांनी जसे आत्मपरीक्षण करण्यास प्रारंभ केल्याचे दिसत आहे, तसेच भाजपविरुद्ध एकांगी प्रचार करून आपली विश्वासार्हता गमावल्याचा साक्षात्कार काही ‘डाव्या-उदारमतवादी’ पत्रकारांना झाला आहे. इकडे, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपला सूर काहीसा नरमाईचा लावल्याचे दिसत आहे.


लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्या सरकारचा शपथविधी होऊन सरकारने कामास प्रारंभही केला आहे. पण, लोकसभा निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेले विरोधक अद्याप त्यातून सावरल्याचे दिसत नाहीत. काही पक्ष, कशामुळे पराभव झाला यासंदर्भात आत्मपरीक्षण करण्याच्या कामास लागले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर, पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपण अध्यक्षपदी राहणार नाही; तसेच अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याच्या बाहेरील व्यक्तीचा विचार करावा, असे सूचित केले आहे. पण, प्रत्यक्षात असे घडेल का, याची प्रतीक्षा आहे. पक्षाचा दारूण पराभव होऊनही काँग्रेसने संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधी यांची निवड केली आहे. आपला मुलगा राहुल गांधी, कन्या प्रियांका गांधी यांचा या पराभवात सिंहाचा वाटा असल्याचे माहीत असतानाही, संसदीय पक्षाचे नेतेपद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला नाही, हे लक्षात घेता काँग्रेस पक्षावरील आपली पकड सोडण्याची नेहरू-गांधी घराण्याची तयारी नसल्याचेच संकेत मिळत आहेत. काँग्रेसमधील नेत्यांनाही या घराण्याशिवाय पर्याय दिसत नाही. त्यामुळे राहुल गांधी वा सोनिया गांधी यांची पक्षावरील पकड सैल होण्याची शक्यता खूपच दुर्मीळ आहे. निवडणुकीत झालेल्या पानिपतानंतर आपल्या खचलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याचे काँग्रेसचे आणि अन्य पक्षांचे प्रयत्न चाललेले आहेत. काही पक्षांकडून संघटनात्मक फेररचना केली जात आहे, तर काही पक्षांनी आपल्या प्रवक्त्यांची तोंडे बंद करून टाकली आहेत. लोकसभेतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे संख्याबळ पाहून विरोधक आतून हादरून गेले आहेत. पण, आपण खचून गेलो नसल्याचा आव त्यांच्याकडून आणला जात आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात जे वक्तव्य केले, त्यावरून हे लक्षात येईल. “लोकसभेत आमच्या पक्षाचे संख्याबळ कमी असले तरी, आमचा पक्ष सत्ताधारी पक्षास पुरून उरेल,” अशी दर्पोक्ती त्यांनी केली आहे. याला ‘पडलो तरी नाक वर’ असे म्हणतात!

 

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या प्रचंड यशामुळे विविध पक्षांनी जसे आत्मपरीक्षण करण्यास प्रारंभ केल्याचे दिसत आहे, तसेच भाजपविरुद्ध एकांगी प्रचार करून आपली विश्वासार्हता गमावल्याचा साक्षात्कार काही ‘डाव्या-उदारमतवादी’ पत्रकारांना झाला आहे. याचे उदाहरण म्हणजे, स्वत:ला ‘ज्येष्ठ पत्रकार’ म्हणविणाऱ्या शेखर गुप्ता यांनी दिलेली कबुली! “नरेंद्र मोदी सरकारने जी अनेक चांगली कामे, ज्या विविध कल्याणकारी योजना हाती घेतल्या, त्याकडे आम्ही (डाव्या - उदारमतवादी) जाणूनबुजून लक्षच दिले नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,” असे शेखर गुप्ता यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. मोदी सरकारच्या उज्ज्वला योजना, मुद्रा योजना यांसारख्या योजना नावापुरत्या असल्याचे ही पत्रकार मंडळी समजत होती. पण, उज्ज्वला योजना किंवा मुद्रा योजना यांचा लाभ देशातील असंख्य गरीब कुटुंबांना झाल्याचे आमच्या लक्षात आले. पण, मोदी सरकारने जी चांगली कामे केली आहेत, त्याकडे ठरवून दुर्लक्ष करायचे म्हटल्यावर डावे -उदारमतवादी पत्रकार त्याकडे कशाला लक्ष देतील! पण उशिरा का होईना, आपल्या वर्तनाचा डाव्या-उदारमतवादी पत्रकारांना पश्चात्ताप झाला. हेही नसे थोडके! पण, या पत्रकार मंडळींनी आपली जी थोडीफार विश्वासार्हता होती, तीही आपल्या वर्तनाने गमावली असल्याने ती भरून निघणे कठीण आहे! पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये, “मोदी की छबी दिल्ली के खान मार्केट गँगने नहीं बनायी है, ल्युटेन्स दिल्ली नें नहीं बनायी है। ४५ साल की मोदी की तपस्या ने छबी बनायी है... यु कॅन नॉट डिसमॅन्टल इट,” असे का म्हटले होते, ते शेखर गुप्ता यांच्यासारख्या पत्रकारांनी आता जी कबुली दिली आहे, त्यावरून लक्षात येते.

 

मोदी सरकारने जी अनेक कामे केली, त्याकडे या मंडळींनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले. विरोधी पक्षांनीही त्यांचीच री ओढून सातत्याने नकारात्मक प्रचार केला. त्याचा व्हायचा तोच परिणाम आला आणि सर्व विरोधक चारीमुंड्या चीत झाले! आता काही विरोधक, भाजपने प्रचारात मूळ मुद्द्यांना बगल देऊन राष्ट्रवादास महत्त्व दिल्याने आणि त्याचा जनतेवर प्रभाव पडल्याने भाजपचा विजय झाल्याचे म्हणत आहेत. मात्र, भाजपने प्रचारामध्ये आपण जी जी कामे केली आहेत, त्याची जनतेला माहिती देत असतानाच देशाची सुरक्षा, राष्ट्रैक्य याबाबत कोणतीही तडजोड नाही, असे स्पष्ट केले. ‘घुसकर मारेंगे...’ असा इशारा देऊन, हाच पक्ष देशाचे संरक्षण करू शकतो, असा आत्मविश्वास जनतेच्या मनात निर्माण केला. ‘कलम ३७०, कलम ३५ अ आम्ही रद्द करू,’ अशी जी घोषणा प्रचारसभांमधून करण्यात आली होती, त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. इकडे, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपला सूर काहीसा नरमाईचा लावल्याचे दिसत आहे. प. बंगालमध्ये हिंदू समाजाने रामनवमीच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भाग घेण्यास प्रारंभ केल्यापासून त्या संतापल्याच होत्या. राम हा बंगाली संस्कृतीचा भाग नसल्याचे सांगून, तेथील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्नही त्यांनी करून पाहिला. आपण अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करीत असल्याचे ममतादीदी यांनी अनेकदा दाखवून दिले आहे. दुर्गापूजा विसर्जनाच्या वेळी प. बंगालमधील जनतेने त्याचा अनुभव घेतला आहे. निवडणुकीच्यावेळी जनतेने दिलेल्या ‘जय श्रीराम’ घोषणांनी त्यांचा किती तिळपापड झाला, हे देशवासीयांनी पाहिले आहे. ‘जय श्रीराम’ घोषणा दिल्याबद्दल, त्या घोषणा देणाऱ्यांना अटक करण्याचे कृत्यही त्या सरकारने केले आहे. ममता बॅनर्जी यांचा ‘जय श्रीराम’ घोषणेस होत असलेला विरोध लक्षात घेऊन त्यांना ‘जय श्रीराम’ घोषणा लिहिलेली लक्षावधी पत्रे पाठविण्याचा निर्धार तेथील जनतेने केला आहे.

 

आपल्याविरुद्ध तयार होत असलेले वातावरण पाहून ममतादीदी काहीशा नरमल्या असल्या, तरी मूळ भूमिका सोडण्याची त्यांची अजूनही तयारी नाही. अलीकडे ‘फेसबुक’वरून त्यांनी, आम्ही धार्मिक भावनांचा आदर करतो, असे म्हटले आहे. पण, “भाजप राजकारणात धर्माचा अंतर्भाव करून विद्वेषाने राजकारण खेळत आहे. ‘जय सिया राम’, ‘जय राम जी की’, ‘राम नाम सत्य है’, यामागे धार्मिक आणि सामाजिक गर्भितार्थ आहे. पण, द्वेषाचे तत्त्वज्ञान पसरविण्यासाठी याचा वापर केला जात आहे,” असे ममता बॅनर्जी म्हणतात. सर्व देशवासीय आदर्श राजा म्हणून ज्या प्रभू रामचंद्राकडे पाहतात, त्या श्रीरामाच्या घोषणा दिल्याने द्वेष कसा पसरतो? एकीकडे, आपल्या देशाची परंपरा आणि संस्कृती वैभवशाली असल्याचे म्हणायचे , पण दुसरीकडे त्याच परंपरेचा वसा घेऊन कार्य करीत असलेल्या भाजप आणि संघ परिवारावर समाजात द्वेष पसरवित असल्याचा आरोप करायचा, याला काय म्हणायचे? ‘जय श्रीराम’ घोषणा दिल्यावरून आकांडतांडव करणाऱ्या ममता बॅनर्जी यांना जनतेने अद्दल घडविली आहेच! त्यांचे आसन पूर्णपणे डळमळीत करण्याची ताकद ‘जय श्रीराम’ घोषणेत आहे, हे त्यांनी पक्के लक्षात ठेवावे!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@