काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



आज देशातील व महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच अशी आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाला भाजपचा एकहाती सामना करण्याची हिंमत नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तर त्यात फारसे आश्चर्य वाटायला नको.


भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या धक्क्यातून विरोधी पक्ष अजूनही सावरत आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे विलीनीकरण होईल, अशा आशयाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या बातम्यांचा जोरदार इन्कार केला असला तरी, जर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन झाली तर आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अवघ्या पाच-सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभा निवडणुकांत मिळालेल्या देदीप्यमान विजयानंतर भाजप-सेना युती त्यातही भाजप फार जोरात आहे. अशा अवस्थेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले तर धक्का बसायला नको. असाच प्रकार मे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. तेथे समाजवादी पक्ष व मायावतींचा बहुजन समाज पक्ष यांची युती झाली. या युतीने २०१८ साली उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुका चांगल्या मताधिक्याने जिंकल्या होत्या. त्यामुळे २०१९ साली होत असलेल्या सतराव्या लोकसभा निवडणुका दणदणीत बहुमताने जिंकतील, असे वातावरण निर्माण झाले होते. असे असूनही भाजपने एकूण ८० जागांपैकी ६२ जागा जिंकल्या, तर बसपाने १० व सपाने पाच जागा जिंकल्या. काँग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली. काँग्रेसला राहुल गांधींची अमेठीची जागासुद्धा जिंकता आली नाही. सपा व बसपा युतीला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे अशा निवडणूकपूर्व आघाडींचा फायदा होतो का वगैरे प्रश्न चर्चेत येणे अपेक्षित होते. असेच अपयश महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला मिळाले. हीसुद्धा निवडणूकपूर्व आघाडी होती. तरीही या आघाडीला फारसे यश मिळाले नाही, हे लक्षात घ्यावे लागते.

 

महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत काँग्रेसने एकूण ४८ जागांपैकी २६ जागा लढवल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने २२ जागा लढवल्या होत्या. काँग्रेसला फक्त एक जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसने आधी स्वतःकडे असलेल्या चार जागा जिंकल्या. अशा स्थितीत आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. परिणामी, महाराष्ट्रातील राजकीय शक्ती कामाला लागल्या आहेत. आज एका बाजूला भाजप-सेना युती आहे, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आहे. अजून वंचित बहुजन आघाडी कोणाबरोबर जाईल की स्वतंत्रपणे लढेल, हे स्पष्ट व्हायचे आहे. आताचा भाजप-सेना युतीचा आत्मविश्वास बघता, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा युती सहजपणे जिंकेल, असे आजतरी वातावरण आहे. अर्थात, क्रिकेट आणि राजकारणात शेवटपर्यंत काय होईल, हे छातीठोकपणे सांगता येत नाही. कारण, जून महिना आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये बरेच अंतर आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलीनीकरणाच्या चर्चेकडे बघावे लागेल. आज देशात महाराष्ट्रातील सेना-भाजप युती, उत्तर प्रदेशातील बसपा-सपा युती व बिहार राज्यातील जनता दल (युनायटेड) व भाजप या तीन युती आहेत. यात महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ही एकमेव आघाडी अशी आहे, जेथे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने जून १९९९ स्थापन केलेल्या पक्षाची काँग्रेसशी आघाडी करतो आहे.

 

शरद पवारांची सर्व हयात काँग्रेसमध्ये गेली. १९९९ मधील लोकसभा निवडणुकांच्या काळात भाजपने सोनिया गांधींच्या विदेशी वंशाचा मुद्दा लावून धरला होता. हा मुद्दा मतदारांना कसा समजून सांगावा, या संदर्भात पवारांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या शंकांचे निरसन करण्याऐवजी सोनिया गांधींनी शरद पवार, तारिक अन्वर व पूर्णो संगमा या तीन ज्येष्ठ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर या तिघांनी १० जून, १९९९ रोजी 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' स्थापन केला. पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, पण लगेच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी त्यांनी काँग्रेसशी आघाडी केली. ऑक्टोबर १९९९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने ७५ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसने ५५, सेनेने ६९ जागा, तर भाजपने ५६ जागा जिंकल्या होत्या. परिणामी, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेत आले. या आघाडीने २००४ तसेच २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांही जिंकल्या. पण, दरवेळी मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडेच होते. सेना-भाजपने २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत मात्र सत्ता खेचून आणली व भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तसे पाहिले तर शरद पवार १९९९ पासून आजपर्यंत म्हणजे तब्बल २० वर्षे काँग्रेसच्या बाहेर आहेत. पवार या आधीसुद्धा एकदा काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांनी १९७८ साली काँग्रेसमधून बाहेर पडून 'काँगेस समाजवादी' स्थापन केला होता. नंतर त्यांनी जनता पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केले व ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते. १९८० मध्ये जेव्हा इंदिरा गांधी परत आल्या, तेव्हा त्यांनी देशातील अनेक राज्यांची सरकारं बरखास्त केली, जेथे जनता पक्षाची सरकारं सत्तेत होती. त्यानंतर पवार जवळजवळ सहा वर्षे काँग्रेस बाहेर होते व डिसेंबर १९८६ मध्ये राजीव गांधी पंतप्रधानपदी असताना ते काँग्रेसमध्ये परतले. काँग्रेसमध्ये विलीन व्हायचे की नाही, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन टोकाच्या भूमिका असणे अगदी स्वाभाविक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते विलीनीकरणाच्या विरोधात तर आहेतच, शिवाय या खेपेस काँग्रेसबरेाबर जर आघाडी करायची असेल, तर काँग्रेसकडून '५० : ५०' जागांचा फॉर्म्युला मान्य करून घ्या, असा त्यांचा आग्रह आहे. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादीने ११४ जागा, तर काँग्रेसने १७४ जागा लढवल्या होत्या.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत अलीकडे झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी व राज ठाकरे यांच्याबरोबर युती करायची की नाही, याबद्दलही चर्चा झाली. याबद्दलसुद्धा पक्षात दोन परस्परविरोधी मतप्रवाह आहेत. काही ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसशी युती केल्यावर इतर कोणत्याच पक्षाबरोबर युती करू नये, असे वाटते. खुद्द शरद पवारांना निधर्मी मतांत फूट पडू नये, असे वाटते व त्यासाठी शक्य तितक्या समविचारी पक्षांना बरोबर घेता आले पाहिजे, या दिशेने त्यांचे प्रयत्न असतील. मात्र, ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान जागांबद्दल घोळ घातला व एकतर्फी स्वत:चे उमेदवार घोषित केले, ते बघता त्यांना युती नको होती, हे स्पष्ट दिसत होते. आता विधानसभेत वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेते, हे कळेलच. तेव्हाप्रमाणे आताही जरी वंचित बहुजन आघाडीने जागांबद्दल घोळ घातला तर मग अवघड होईल. अशी अडचण राज ठाकरेंच्या मनसेबद्दल नाही. राज ठाकरेंनी लोकसभेत उमेदवार उभे केले नव्हते. आता मात्र ते या निवडणुका जोरदात तयारी करून लढवतील यात शंका नाही. जागावाटपाबद्दल तेसुद्धा आता वस्तुनिष्ठ भूमिका घेतील, असे दिसते. लोकसभा निवडणुकांदरम्यान त्यांनी घेतलेल्या सभांना तुफान गर्दी होत असे. पण, त्याचे मतांत रूपांतर काही झाले नाही. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेसाठी फारच महत्त्वाच्या आहेत. आज देशातील व महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच अशी आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाला भाजपचा एकहाती सामना करण्याची हिंमत नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तर त्यात फारसे आश्चर्य वाटायला नको. या प्रकारे उत्तर प्रदेशातील सपा-बसपाचे विलीनीकरण होऊ शकत नाही की बिहारमध्ये भाजप-जनता दल (यु) चे होऊ शकत नाही. हे पक्ष पूर्णपणे वेगळे आहेत. त्यांचा जनाधार वेगळा आहे, यांचे राजकीय तत्त्वज्ञान वेगळे आहे. तसे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही. या दोन्ही पक्षांचे तत्त्वज्ञान, कार्यसंस्कृती एकच आहे. म्हणूनच या दोन पक्षांच्या विलीनीकरणात अडचणी नाहीत. याबद्दल लवकरच बातमी आली तर आश्चर्य वाटायला नको.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@