नेहमीच सूर्य नसतो...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2019   
Total Views |



समाज पुरुषाशी विद्रोह नव्हे, तर समन्वय आणि निष्ठा राखली तर स्वत:सोबतच समाजही घडत जातो, हे सांगणारे डवरी गोसावी समाजाच्या कांता शिंदेंचे जगणे...


अंधेरी भाजी मार्केटमध्ये एका पोलिसावर अचानक पाच-सहा गुंडांनी हल्ला केला. हे मार्केट माणसांनी गजबजलेले. ही हल्ल्याची घटना घडताच काही लोक थबकून बिचकत उभे राहिले. मात्र, कांता भाजी कापायची सुरी घेऊन त्या गुंडांपुढे उभी राहिली आणि म्हणाली, “का मारता पोलीसदादालाघोळक्यांनी?” कांताचा आवेश आणि धाडस पाहून सगळे मार्केट चकीत झाले. कांता पुढे आली म्हणून मार्केटमधील आणखी काही लोक पोलिसाच्या मदतीला सरसावले.त्या पोलीसदादांनी मग या बहिणीला सांगितले की, “तुझ्यात धडाडी आहे. मदतीला धावून जाण्याची धमक आहे. तू महिला मंडळ तयार कर.” भिक्षेकरी समाजाची ही कांता पाचवी शिकलेली. मात्र, पोलीसदादाने सांगितले म्हणून तिने पाठपुरावा करून महिला मंडळ तयार केले. इथूनच तिच्या जीवनाचा एक वेगळा प्रवास सुरू झाला. कांताचे वडील एकनाथ चव्हाण हे स्टोव्ह रिपेअरिंगचे काम करायचे, तर आई भाजीचा धंदा करायची. कांताला पाच भाऊ आणि एक बहीण. त्यातच कांता सात-आठ वर्षांची असताना एकनाथ गंभीर आजारी पडले. आईच्या कष्टांना पारावर राहिला नाही. ती रात्री ९ वाजताची वलसाडला जाणारी रेल्वे पकडायची. पहाटे ४ वाजता वलसाडला पोहोचून भाजी घ्यायची आणि पुन्हा रेल्वेने अंधेरीला यायची.

 

दुपारपर्यंत भाजी विकायची, त्यानंतर घरी येऊन घरकाम आटपून, स्वयंपाक बनवून, भाकरी घेऊन पुन्हा ४ वाजता घराबाहेर पडून भाजी विकायची. तेथूनच ती रात्रीची वलसाड रेल्वे पकडायची. आईला थकायलाही वेळ नव्हता. आईचे कष्ट पाहून कांताला रडू येई. तेव्हा ती दुसरीला होती. सोबतच्या मुली गाई घेऊन भिक्षा मागायला जात. कांताही भिक्षा मागायला गेली. त्यावेळी पहिल्यांदा फारच भीती वाटली, पण इलाज नव्हता. नव्वदचे दशक होते. पाचवीला असताना कांताला शाळा सोडावी लागली आणि तिचे लग्न झाले. तिचे पती दत्तू शिंदे स्टोव्ह रिपेअरिंगचा धंदा करायचे. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत कांताला तीन मुले झाली. पुढे स्टोव्हचा जमाना गेला. दत्तूंचा व्यवसाय चालेना. मग एके दिवशी कांताने वलसाडहून भाजी आणून विकण्याचा निर्णय घेतला. पतीनेही साथ दिली. दोघे दररोज रात्री वलसाडला जाऊन भाजी आणत. सकाळी घरी येत. कांता घरी आल्यावर घरचे सारे काम आटपून डोक्यावर भाजीची टोपली आणि कमरेला छोट्या मुलाला बांधून अंधेरीच्या पोलीस कॉलनी आणि इतर वस्त्यांमध्ये भाजी विकू लागली. परिसरातील लोकांना तिची दया येई. त्यामुळे पोलीस कॉलनीतल्या पोलिसांनी कांताला अंधेरीला एका ठिकाणी बसून भाजी विकण्याचा सल्ला दिला, तशीच तिला मदतही केली. त्यामुळे कांता एका ठिकाणी बसून भाजी विकू लागली.

 

जनसंपर्क वाढत असताना जगात काय चालले आहे, याचे ज्ञान कांताला होऊ लागले. ती आपल्या समाजातल्या महिलांचा विचार करे, तुलना करे. समाजातील महिला उपाशी-तापाशीगाई चरायला नेतात. किती हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतात. समाजातील महिलांनी गाई घेऊन भीक मागायचे सोडून दुसरे काम करायला हवे. कांताने त्या परिसरातील ज्या महिला गाई घेऊन भिक्षा मागायच्या, त्यांना समजावले, भाजी किंवा फळे विका, दुसरे काम करा. इतकेच नव्हे, तर चार महिलांना भाजीचा व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्धकरून दिल्या. आज त्या महिला दिवसाचे काही तास भाजी विकतात. मात्र, त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती सुधारली आहे. त्यांची मुले शाळेत जातात. तसेच ज्या महिला भाजी विकू शकत नाहीत, त्यांना घरी बसल्या बसल्या कुटीरोद्योग मिळवून दिले. अर्थात, इथपर्यंत कांताचे आयुष्य तसे सामान्यच. पण, एके दिवशी कांताच्या नात्यातल्या एका अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्या मनाविरुद्ध लावले जात होते. मुलगी रडत होती. लग्नाला तयारच नव्हती. तिला शिकायचे होते. त्या मुलीने कांताकडे मदत मागितली. कांताने मुलीला समजावले, पण मुलगी ऐकायला तयार नव्हती. मग कांताने मुलीच्या पालकांना समजावले.

 

पालकांची जबरदस्ती आणखीन वाढली. मुलीने कांताच्या मदतीने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी पालकांचे समुपदेशन केले आणि त्या मुलीचे लग्न टळले. या मुलीने स्थळ नाकारले. त्यामुळे आता तिला कुणीही स्थळ म्हणून जाऊ नये असे अलिखितपणे ठरलेलेच. दुसरीकडे पोलिसांकडे प्रकरण नेले म्हणून समाजाने कांतावर ३६ वर्षांचा बहिष्कार घातला. कांतावर आभाळ कोसळले. कांताने पोलिसांकडे न्याय मागितला. पोलिसांनी जात पंचायतीच्या माणसांना बोलावले. डवरी गोसावी समाजाच्या जातपंचायतीची माणसेही भलीच होती. नाईलाजाने परंपरा चालवावी म्हणून त्यांनी दंड दिला होता, पण माणुसकी पहिली असे त्यांचे मत. त्यामुळे डवरी गोसावीसमाजाने सहमतीने दंड मागे घेतला. कांतावरचे संकट टळले होते, पण त्या मुलीचे काय? कांताने मग पुढाकार घेतला. प्रवाहाच्या विरोधात जात तिने आपल्या मुलासोबत त्या मुलीचे लग्न लावले. न जाणो किती वर्षे असणाऱ्या रूढींचे प्राक्तन कांताने बदलले होते. कांता याचे श्रेय समाजाच्या थोरामोठ्यांना देते. समाजच मायबाप असून समाजाशी इमान राखूनच स्वत:ची आणि समाजाची प्रगती होते, असे कांताचे म्हणणे आहे. कांताचे विचार आणि तिला साथ देणारा समाज पाहिला की वाटते, प्रतिकूल परिस्थितीही कधीतरी अनुकूल घडतेच...

 

नेहमी सूर्य नसतोच,

इवलीशी ज्योतही अंधार भेदून जाते...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@