जागतिक कल सायकलकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2019   
Total Views |



नुकताच सोमवारी म्हणजेच ३ जूनलाजागतिक सायकल दिन’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने जाणून घेऊया, सायकलचा सर्वाधिक वापर करणारी शहरे, भारताचे स्थान आणि सायकलच्या लाभाबद्दल...


इतिहासाची पुनरावृत्ती होत असून जेट युगातून दळणवळणाच्या मूळ साधनांच्या वापराकडे कितीतरी देश, संस्था आणि सर्वसामान्य नागरिकही वळताना दिसतात. गगनाला भिडणारी इंधनाची किंमत, रस्त्यांवरील वाहनांची प्रचंड संख्या आणि आरोग्य व प्रदूषणाप्रतिच्या वाढत्या जागरुकतेने पुन्हा एकदा जगाला सायकलस्वारी करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. अनेक देशांत सायकलला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सायकली शहरी दळणवळण विषय प्रकल्पांच्याही प्रमुख भाग झाल्या आहेत. नुकताच सोमवारी म्हणजेच ३ जूनला ‘जागतिक सायकल दिन’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने जाणून घेऊया, सायकलचा सर्वाधिक वापर करणारी शहरे, भारताचे स्थान आणि सायकलच्या लाभाबद्दल...

 

‘अ‍ॅमस्टरडॅम’ या नेदरलँडच्या राजधानीत नियमित प्रवास करणाऱ्यांपैकी ४० टक्के लोक सायकलचा वापर करून आपापल्या कार्यालयात वा घरी वा इच्छित स्थळी जातात, तसेच इथे भाड्यानेही सायकली दिल्या जातात. डेन्मार्कची राजधानी असलेल्या कोपनहेगनमध्येही काहीशी अशीच स्थिती असून शहरातील सुमारे ३२ टक्के लोक सायकलवरूनच प्रवास करतात. इथेही सायकलसंस्कृती प्रचलित असून इथे बिनभाड्याच्या सायकलीही मिळतात. कोलंबियाची राजधानी बोगोटातही १३ टक्के लोकांकडे चारचाकी गाडी असल्याने सायकलचा वापर करणे इथल्या लोकांना अपरिहार्य झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे, शहरातील मुख्य रस्त्यांना आठवड्यातील एक दिवस वाहनमुक्तही ठेवले जाते. वाहनमुक्तदिनी केवळ सायकलस्वार, जॉगिंग आणि स्केटिंग करणारे लोकच रस्त्यांवरून प्रवास करू शकतात, हाही इथला नियम आहे. क्युरितिबा या ब्राझीलियन शहराच्या संरचनेतच सायकलप्रवासावर लक्ष दिले आहे. इथे प्रत्येक ठिकाणी सायकलसाठीचे वेगळे मार्ग पाहायला मिळतात. अमेरिकेच्या पोर्टलॅण्ड या शहरात तर सायकलसाठी रस्ते तयार केले आहेत, पण ते अन्य शहरांशीही जोडलेले आहेत. तर बासेल या स्वित्झर्लंडमधील अतिसुंदर शहरातही सायकलसाठी वेगळ्या रस्त्यांची, मार्गांची रचना उभारण्यात आलेली आहे. स्पेनमधील बार्सिलोना शहरात हिरव्या रंगाच्या सायकल्स वापरल्या जातात, ज्याचा संबंध निसर्ग-पर्यावरणाशी आहे. तसेच इथे निरनिराळ्या सायकल केंद्रावरून भाड्याने सायकल घेऊन नंतर ती पुढल्या कुठल्याही केंद्रात जमा करण्याचीही सोय इथे आहे. चीनची राजधानी बीजिंग आणि नॉर्वेच्या ट्रान्डहीम शहरातही सायकल प्रवासाला प्रोत्साहन दिले आहे. नॉर्वेमध्ये तर चढ असलेल्या रस्त्यावरून जाताना, पॅडल मारताना होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी सायकल थेट उचलून घेऊन नंतर ती लिफ्टच्या साह्याने सपाट मार्गावर आणायचीही सुविधा आहे.

 

नुकताच जगभरातील विविध शहरांचा अभ्यास करूनबायसिकल सिटीज इंडेक्स-२०१९’ प्रकाशित करण्यात आला. ज्यात जगातील ९० शहरांचा अभ्यास करून त्यात नेदरलँडचे उट्रेच शहर जगात अव्वल सायकलप्रेमी असल्याचे स्पष्ट झाले. उट्रेचला १०० पैकी ७७.८४ इतके गुण मिळाले. दुसरीकडे जगातील सर्वाधिक सायकलींचे उत्पादन होणाऱ्या भारतातील ४० टक्के परिवारांकडे सायकल असली तरी ज्यांच्याकडे अन्य कोणताही पर्याय नाही, तेच सायकल चालवतात. कारण, सायकल वापरणे हे मान आणि शानविरुद्ध असल्याचे कित्येकांना वाटते. तरीही जनमानस बदलत असून ते पर्यावरणाचा विचारही करताना दिसतात. सायकलचे काही फायदेही आहेत, जसे की, कोणत्याही घातक उत्सर्जनाशिवाय वापरता येणारी सायकल ग्लोबल वॉर्मिंगविरोधात लढण्यास मदत करते. अनेक आकार आणि प्रकारामुळे वाहतूककोंडीचीही अडचण होत नाही. आवाज करत नसल्याने ध्वनिप्रदूषणाचा सवालच नाही. छोट्या-मोठ्या घरगुती सामानाची ने-आण करण्यासाठी, पायी चालण्यापेक्षा वेगवान आणि सुलभ, इंधनाशिवाय व कमी देखभालीची आवश्यकता असल्याने खिशालाही परवडते. पॅडल मारल्याने पायाच्या मांसपेशी सुगठित आणि हाडे बळकट होतात. क्षमता वाढविण्याबरोबरच श्वसनतंत्रातही सुधारणे करते. नियमित सायकल चालकांत मधुमेह, हृदयविकाराचा झटका आणि अन्य विकार होण्याची शक्यताही कमी असते. अर्थात, हे सगळे फायदे असले तरी सायकल वापरासाठीची यंत्रणा, वेगळे मार्ग उभारण्याचीही नितांत आवश्यकता आहे. तसेच लांब अंतरासाठी सायकल हा पर्याय सदासर्वकाळ कधीही व्यवहार्य ठरू शकत नाही. शिवाय सायकल आणि दुचाकी व चारचाकीचा वेग पाहता आणीबाणीच्या समयी वा लवकर पोहोचण्याच्या परिस्थितीत सायकल उपयुक्त ठरू शकत नाही, या गोष्टीही लक्षात घ्यायला हव्यात. मात्र, या गोष्टी वगळता इतरवेळी सायकल हा एक उपयुक्त पर्याय नक्कीच ठरू शकतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@