सुपर थर्टी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2019   
Total Views |

 
 
वडील काय करतात तुझे? या प्रश्नाची उत्तरं नाना तर्हेची होती. ‘हयात नाहीत’ इथपासून तर मिठागारात मजूर आहेत इथपर्यंत. कचरा उचलण्याच्या गाडीवर चालक आहेत इथपासून, तर सफाई कामगार आहेत इथपर्यंत... घरची आर्थिक परिस्थिती? काय उत्तर असणार या प्रश्नाचं? सार्यांची सारखीच. अठराविश्वे दारिद्र्याशी नातं सांगणारी. आणि उराशी बाळगलेली स्वप्नं? ती मात्र थेट आकाशाला गवसणी घालणारी. कुणाला मेकॅनिकल इंजिनीअर व्हायचंय् तर कुणाला नासात जायचंय्. मार्ग खडतर आहे. खाचखळगेही खूप आहेत. पण आता थांबायचं नाही. आपल्या पालकांनी केले तसे त्या अडचणींच्या चिंतेचे ओझे पाठीवर वाहात बसायचे नाही. लांब, उंच उड्या घेऊन हे अडथळे पार करायचे आणि पुढे जायचे. बस्स! कुणी दिलं असेल या पाखरांच्या पंखांना बळ? कुणी दिली असेल त्यांना आभाळ पालथे घालण्याची ताकद? आनंद कुमार सरांनी...! परिस्थितीच्या विवंचनेतून शिक्षणाला मुकण्याची वेळ उद्भवलेल्या कित्येकांना थेट आयआयटीच्या दाराशी नेऊन ठेवणारे आनंद कुमार आणि त्यांनी साकारलेला सुपर थर्टीचा प्रयोग आता वर्तमानपत्र, पत्रिका, दूरचित्रवाणीच्या पलीकडे एका चित्रपटाचा विषय ठरला आहे...
 
बिहारमधील पाटण्यात 17 वर्षांपूर्वी सुरू झालेला एक प्रयोग- ‘सुपर थर्टी.’ या अनोख्या प्रयोगाचा परिणाम हा होता की, मिठागारात काम करणार्या मजुराचं पोरही आता आयआयटीत प्रवेश घेण्याची स्वप्नं बघू शकत होता. त्या आगळ्या प्रयोगाची ताकद एव्हाना सिद्ध झाली होती. परिणाम चकित करणारे होते. बौद्धिक क्षमता असली, तरी आर्थिक परिस्थितीने पाय जखडून ठेवलेल्या ज्या लोकांसाठी आयआयटीतला प्रवेश ही दुरापास्त बाब ठरली होती, ते उच्च शिक्षण ‘सुपर थर्टी’ने शक्य केले. आयपीएस अधिकारी राहिलेले अभयानंद आणि गणिताचे पाटण्यातील ख्यातनाम शिक्षक आनंद कुमार यांनी एकत्रितपणे सुपर थर्टीचा प्रयोग सुरू केला. 2002 मध्ये सुरू झालेल्या या संकल्पनेचा गाभाच मुळात गोरगरिबांच्या कल्याणाचा होता. जे शिक्षण आपल्यासाठी नाहीच, त्याचा खर्च आपल्या मर्यादेत बसणारा नाही, अशी कल्पना करून बसलेल्या झोपडपट्टीतल्या 30 मुलांची निवड करून त्यांना जेईईईच्या परीक्षेसाठी तयार करण्याची कल्पना या दोघांनी प्रत्यक्षात साकारली. या दोघांनी प्रदान केलेले प्रशिक्षण प्राप्त करण्याकरिता पात्रतेचा निकष एकच होता- गरिबीचा. फक्त आसमंत व्यापून टाकण्याची जिद्द तेवढी हवी. पहिल्याच वर्षी 30 पैकी 18 पोरं आयआयटीसाठी पात्र ठरली आणि मग सुपर थर्टीची चर्चा सुरू झाली. इतकी की, पहिल्या वर्षीप्रमाणे आता वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन विद्यार्थी शोधून आणण्याची गरज उरली नाही. आता क्लासरूमच्या बाहेर विद्यार्थ्यांची झुंंबड उडाली होती. इतकी की, विद्यार्थ्यांचे अर्ज आणि परीक्षा घेऊन त्यांचा ‘सुपर थर्टी’मधला प्रवेश निश्चित करावा लागला. दिवसागणिक या प्रयोगाची ख्याती वाढत गेली तसतशी इथून आयआयटीसाठी पात्र ठरणार्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत गेली. 22, 25, 28 असे करता करता पैकीच्या पैकी पोरं आयआयटीच्या दालनात दाखल होऊ लागली. दरम्यानच्या काळात आयआयटीच्या अभ्यासक्रमापासून तर परीक्षापद्धतीपर्यंत सर्वदूर होणारे बदल अंमलात आणून ‘सुपर थर्टी’ विद्यार्थी त्यानुरूप तयार करताना अभयानंद आणि आनंद कुमार यांचाही कस लागत होता. पण त्यांचे प्रयत्न, मेहनत आणि कल्पकतेला त्याच तोडीची साथ विद्यार्थ्यांकडून मिळत गेली आणि या प्रयोगाच्या यशाचा आलेखही आकाशाच्या दिशेने झेपावत राहिला. दरम्यानच्या काळात, ‘आता प्रयोग पुरे झाला,’ असं म्हणत अभयानंद यातून बाहेर पडले. पण, कधीकाळी स्वत: या प्रक्रियेतून शिक्षण घेऊन आयआयटी, इंजिनीअर झालेल्या काही माजी विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे केला. स्वत:चे जुने दिवस स्मरणात ठेवून वंचितांना साह्यभूत ठरण्यासाठी म्हणून तेही सरसावलेत. बहुधा त्यामुळेच की काय, पण अभयानंदांच्या अनुपस्थितीतही ‘सुपर थर्टी’चा प्रयोग सुरू राहिला. आजतागायत तो अव्याहतपणे सुरू आहे.
 
मुळात ही संकल्पना साकारण्याचा विचार डोक्यात आला तो कुठल्याशा जिद्दीतून. विपरीत परिस्थितीशी संघर्ष करण्याच्या इराद्याला बळही त्या जिद्दीनेच दिले. गावातल्या छोट्याशा डाकघरात पत्र हाताळणीचे काम करण्यार्या एका डाक कर्मचार्याचा मुलगा आनंद कुमार. नव्वदच्या दशकात उच्च शिक्षणासाठी कॅम्ब्रिज विद्यापीठात निवड झाली होती. पण नशिबानं थट्टा अशी काही मांडली, की विमानाचं तिकीट काढण्यासाठीच्या पैशाची जुळवाजुळवही करता आली नाही. मनात विचारांचे काहूर माजले. वादळाने थैमान घातले. विद्रोह दाटून आला. चीड आली आपल्याच हतबलतेची. कॅम्ब्रिजचा बेत रद्द झाला हे वेगळ्याने सांगायला नकोच, पण या अनुभवातून एक गाठ मनाशी पक्की बांधली गेली. यापुढे विपरीत परिस्थितीकडे निराश होऊन बघत बसायचे नाही. तिच्याशी झगडायचे. मात द्यायची. स्वत:ला सिद्ध करायचे. आणि हो! हाताशी आलेली संधी नशिबानं हिरावली, तो आयुष्यातला शेवटचा पराजय! यापुढे ठामपणे उभं राहायचं. करडेपणानं लढायचं. आपल्यासारख्या, विवंचनेत अडकलेल्यांना साह्यभूत ठरायचं. त्यांनाही शिलेदार करायचं या लढ्यात. दरवर्षी तीस हुशार पोरांना गरिबीतून ओढून काढत तावूनसुलाखून तयार करत खर्या अर्थाने ‘सुपर’ बनविण्याची धडपड ही खरंतर परिस्थितीवर मात करण्याच्या इराद्याने पेटून उठण्यातून साकारली आहे. हा लढा लढताना आकाशाला हात टेकले तरी पाय जमिनीवरच राहतील, याची घेतली जाणारी काळजी महत्त्वाची. म्हणून ही सारी मुलं एका कुटुंबासारखी एकत्र राहतात. सुरुवातीच्या काळात तर आई पापड तयार करायची अन् आनंद कुमार ते घरोघरी जाऊन विकायचे. त्या पैशातून या भल्या मोठ्या कुटुंबाचा रहाटगाडा हाकला जायचा. आज परिस्थिती बरीचशी बदलली आहे. पण, मागील कालावधीत कितीतरी विद्यार्थी आयआयटी, इंजिनीअरिंगला गेले. त्यांचं भवितव्य घडत गेलं. मात्र, ज्या परिस्थितीशी झगडत पुढे आलोय्, त्या वास्तवाचे भान मनात कायम राहिले. पायही जमिनीवरच राहिले.
 
‘सुपर थर्टी’च्या पहिल्या प्रयोगाला आता जवळपास 17 वर्षे होताहेत. दीड दशकांचा हा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. न्यूज वीकपासून तर टाईमपर्यंतच्या पत्रिकांनी दखल घेतली. राज्य सरकारपासून तर बराक ओबामांपर्यंत सर्वांनी कौतुक केलं. पुरस्कृत केलं. दरम्यानच्या काळात आरोपांची बरसातही झाली. ‘इथल्या’ मुलांना शिकवण्यासाठी पैशाची तजवीज करण्याकरिता म्हणून खाजगी ट्युशन क्लासेेस चालवलेत तर त्यावरूनही पोटशूळ उठला काहींना. काहींनी कोर्टात धाव घेतली. हल्ले झाले. आजवर सातत्याने केलेल्या कडव्या संघर्षाचा परिणाम एवढाच होता, की या परिस्थितीतही निकराचा लढा देण्याचे धैर्य मात्र सुटले नाही. आणि या अनोख्या प्रयोगाची स्वीकारार्हता एवढी की, आनंद कुमार यांच्या या संघर्षमय प्रवासावर लवकरच एक चित्रपट येतोय्- ‘सुपर थर्टी.’ विकास बाही यांची निर्मिती. हृतिक रोशन याचा अभिनय आदी त्याची वैशिष्ट्ये. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रीलीज झाला आहे. प्रदर्शनानंतर चित्रपटाची चर्चा होईल. त्यानंतर आनंद कुमार आणि अभयानंद ही माणसं किती मोठी, कर्तृत्ववान आहेत याचाही आलेख मांडला जाईल. भारतीय जनतेच्या मानसिकतेचा हा परिणाम आहे. चित्रपट, राजकारण अन् क्रिकेटजगताच्या पलीकडेही माणसं कर्तृत्ववान आहेत, यावर त्यांचा विश्वासच नसतो. असे चित्रपट निघाले की मग लोकांना ती माणसं मोठी, कर्तबगार वाटू लागतात. डोंगर फोडून रस्ता तयार करणार्या मांझीपासून, तर मिल्खासिंगपर्यंतची सारी माणसं चित्रपटांतूनच तर कळाली आम्हाला. होय ना? आता नंबर आनंद कुमार यांचा आहे... ही माणसं मुळातच मोठी होती, म्हणून त्यांच्यावर चित्रपट तयार झालेत, हे भारतीय जनसमूहाला उमजेल, तो सुदिन! हा देश गरिबांचा म्हटला जातो. हा देश भिकार्यांचा, अल्पशा मेहनतान्यावर काम करणार्या मजुरांचा मानला जातो. मग व्हिसा, मास्टरकार्ड वापरणारी माणसं कोण आहेत? विमानं कुणासाठी आहेत? गुळगुळीत रस्ते कुणासाठी आहेत? कुणाच्या घामातून साकारला आहे हा झगमगाट?... डोक्याचा भुगा करणार्या असल्या कित्येक प्रश्नांचे उत्तर म्हणजे सुपर थर्टीचा प्रयोग अन् त्याचा संघर्षमय प्रवास आहे...
@@AUTHORINFO_V1@@