रविवारचा सामना ठरणार ‘हाय व्होल्टेज’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2019
Total Views |


 


इंग्लंडपुढे 'आव्हान टिकवण्याचे आव्हान'


बर्मिंगहॅम : स्पर्धेच्या सुरूवातीस विश्वचषकाचे दावेदार मानल्या गेलेल्या इंग्लंडचे अचानक लागोपाठ दोन पराभवांच्या धक्क्यांमुळे स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, सलग ५ सामने अपराजित राहणारा भारत सहावा सामनाही जिंकून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे या दोन तगड्या संघांमध्ये रविवारी होणारा सामना भलताच ‘हाय व्होल्टेज’ ठरणार आहे.

 

घरच्या मैदानावर खेळत असलेला इंग्लंडचा संघ विश्वचषक २०१९ चा प्रबळ दावेदार मानला जात होता. परंतु, श्रीलंकेने केलेला धक्कादायक पराभव आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारलेली मानहानीकारक हार यांमुळे इंग्लंडचा संघ चांगलाच संकटात सापडला आहे. अशातच, रविवारी इंग्लंडची गाठ सलग ५ सामन्यात अपराजित राहिलेल्या भारताशी पडणार असल्यामुळे इंग्लंडवरील दबाव प्रचंड वाढला आहे. भारताने सर्वच पातळ्यांवर, विशेषतः गोलंदाजीत कमालीचे सातत्यपूर्ण आणि आक्रमक प्रदर्शन केले आहे. अफगाणिस्तानचा अपवाद वगळता भारताचे फलंदाजही फॉर्मात आहेत. अशा सांघिक आणि संतुलित कामगिरीच्या जोरावर भारत गुणतालिकेत ११ गुणांसह सध्या दुसऱ्या स्थानावर असून इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताला पहिल्या स्थानावर विराजमान होण्याची संधी आहे.

 

दुसरीकडे, आतापर्यंत ७ सामने खेळून ४ विजय मिळवणारा इंग्लंडचा संघ ८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी आता इंग्लंडला उरलेले दोन्ही सामने जिंकण्याची गरज आहे. नेमके हेच दोन सामने बलाढ्य भारत आणि न्यूझीलंडविरूद्ध होणार असल्यामुळे इंग्लंडची गोची झाली आहे. भारताविरुद्ध इंग्लंड पराभूत झाल्यास इंग्लंडऐवजी पाकिस्तान, बांगलादेश आदींना ‘लॉटरी’ लागण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीच निश्चित केले असून भारत आणि न्यूझीलंड हेदेखील उपांत्य फेरीत पोहोचणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ कोणता याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष असून त्याकरिता बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर होणारा रविवारचा भारत वि. इंग्लंड सामना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

 

शंकरऐवजी पंतला संधी?

 

अष्टपैलू विजय शंकरला अपेक्षित कामगिरी न करता आल्याने त्याला भारतीय संघातून डच्चू देऊन नव्या दमाच्या ऋषभ पंतला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हादेखील आता तंदुरुस्त झाला आहे परंतु, त्याला संघात घ्यायचे झाल्यास कोणत्या गोलंदाजाला डच्चू द्यायचा हा मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे निर्माण झाला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@