विविध धर्म प्रणालीतील चिह्नसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2019   
Total Views |



ख्रिश्चन क्रॉस निरुपणाचा समारोप


'फ्रीमेसनरी' या विश्वव्यापी संघटनेच्या सभासदांनी गेल्या आठवड्यात दि. २४ जून रोजी 'ब्रदरहूड डे' हा त्यांचा 'वार्षिकोत्सव' साजरा केला. २००५ या वर्षी मी या संघटनेचा सदस्य झालो. चिह्न-चिह्नसंस्कृती- चिह्नसंकेत या ज्ञानशाखेच्या माझ्या प्राथमिक अभ्यासाची सुरुवात २००५ या वर्षी नेमकी याच संघटनेमुळे झाली होती. कालांतराने लिखित साहित्य-मूर्ती-शिल्प-चित्र-रंग अशा अनेक माध्यमांतील चिह्नसंकेतांचा अभ्यास करताना या संघटनेच्या वरिष्ठ स्नेही सभासदांनी खूप प्रोत्साहन दिले होते आणि मार्गदर्शन केले होते. 'लायन्स' आणि 'रोटरी' या संघटनांच्या छोट्या सदस्य गटाला 'क्लब' असे संबोधित केले जाते. अगदी त्याप्रमाणे 'फ्रीमेन्स' या संघटनेच्या छोट्या सदस्य गटाला 'लॉज' या नावाने संबोधित केले जाते. चिह्नांचा वापर आणि प्रत्येक 'लॉज'चा स्वतःचा वेगळा ध्वज ही या संघटनेची काही वैशिष्ट्ये आहेत. या 'लॉज'ची ध्येय-धोरणे, सदस्यांचे व्यवसाय, 'लॉज'चे भौगोलिक स्थान, त्या स्थानाची सांस्कृतिक-सामाजिक-भौगोलिक-ऐतिहासिक-परिधान-रसना संस्कृती यांची वैशिष्ट्ये याचा वापर चिह्नांच्या माध्यमातून या ध्वजावर अंकित केलेला असतो. अशा ४० ध्वजांच्या चिह्नांचा अभ्यास आणि त्यातील अर्थसंकेतांची नोंद इथून माझ्या चिह्नसंस्कृतीच्या अभ्यासाची सुरुवात झाली होती. याच प्रेरणेतून काही देशांच्या राष्ट्रध्वजाचा अभ्यास झाला. त्या अभ्यासातील काही विशेष नोंदी या लेखात समाविष्ट केल्या आहेत. 'ख्रिश्चन क्रॉस' या चिह्नाने अंकित झालेला इंग्लंड या देशाचा 'युनियन जॅक' या संबोधनाने सुपरिचित ध्वज आणि काही अन्य देशांच्या राष्ट्रध्वजातील या क्रॉसचे चिह्नसंकेत खूपच रंजक आहेत. 'युनायटेड किंग्डम' अर्थात इंग्लंड आणि उत्तर आयर्लंड या दोन देशांचा मिळून बनलेला एक संयुक्त देश म्हणजेच ग्रेट ब्रिटन. या देशामध्ये १४८४ सालात 'कॉलेज ऑफ आर्म्स' ही सरकारी नियंत्रणाखाली असलेली संस्था स्थापन झाली. आजही ही संस्था कार्यरत आहे. कित्येक शतकांपासून इंग्लंड-वेल्स-आयर्लंड-स्कॉटलंड या देशातील राजे-उमराव यांची राजचिह्ने, संघटना आणि संस्थांची मानचिह्ने यांची ही संस्था नोंद ठेवते. याच 'कॉलेज ऑफ आर्म्स'कडे 'युनियन जॅक' या संबोधनाने परिचित इंग्लंड या देशाच्या ध्वजाची नोंद केली गेली आहे. हा 'युनियन जॅक'चा वापर कोणी, कधी, कसा करावा याचे पूर्ण अधिकार याच संस्थेकडे आहेत. हा ध्वज तीन क्रॉसच्या चिह्नांनी बनलेला आहे. आजचा 'युनायटेड किंग्डम' हा चार स्वायत्त देशांचा मिळून बनलेला आहे. यातील तीन देशांतील तीन आराध्य संतांचे 'क्रॉस' या देशाच्या ध्वजात वापरले गेले.

 

चित्र क्र. १ मधील 'सेंट जॉर्ज क्रॉस' या चिह्नाचा ओझरता उल्लेख मागील लेखात केला होता. 'सेंट जॉर्ज क्रॉस'ने अंकित झालेला हा ध्वज या चार देशांपैकी फक्त इंग्लंड या एका देशाचा ध्वज आहे. 'सेंट जॉर्ज' हे इंग्लंड या देशाचे आराध्य संत आहेत. याबरोबरच हा ध्वज 'चर्च ऑफ इंग्लंड'चा अधिकृत ध्वज आहे. या बरोबरच इंग्लंड आणि वेल्स या देशाचे प्रतिनिधित्व करणारे सर्व खेळाडू आणि इंग्लंडमधील सामान्य नागरिक हा ध्वज वापरतात. या पन्नासाव्या लेखानंतर चिह्नसंकेतांच्या या लेखमालेचे नियमित वाचक आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रध्वजांचे वरिष्ठ अभ्यासक श्रीकांत जोशी यांचा पुण्याहून फोन आला. पन्नासाव्या लेखात उल्लेख केल्यानुसार, या ध्वजाला 'युनियन फ्लॅग' असे संबोधन न वापरता 'इंग्लिश फ्लॅग' असे संबोधन वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला. दै. 'मुंबई तरुण भारत' वृत्तपत्राची रविवार आवृत्ती पुण्यात एक दिवस उशिराने मिळते. तरीही ही लेखमाला आवर्जून वाचणाऱ्या माननीय श्रीकांत जोशी यांना त्यांनी केलेल्या मार्गदर्शनासाठी मनःपूर्वक धन्यवाद. चित्र क्र. २ मध्ये दिसणारा 'क्रॉस' हा स्कॉटलँड या देशाचा आराध्य संत सेंट अँड्य्रू यांचा आहे. गणिताच्या गुणिले(गुणाकार) चिह्नासारखा दिसणाऱ्या या 'क्रॉस'ला 'सल्टायर क्रॉस' असे संबोधनसुद्धा वापरले जाते. निळ्या पार्श्वभूमीवरील हा 'पांढरा क्रॉस' हा स्कॉटलँड या देशाचा सोळाव्या शतकात स्वीकारला गेलेला अधिकृत राष्ट्रीय ध्वज आहे. इंग्लंडच्या 'युनियन जॅक' या ध्वजातील हा 'दुसरा क्रॉस.' चित्र क्र. १ या चित्रातील हा 'सेंट जॉर्ज क्रॉस'चा 'इंग्लिश ध्वज' चित्र क्र. २ च्या स्कॉटलँड देशाच्या ध्वजाशी जोडला गेला की चित्र क्र. ३ मधील ध्वजाची आकृती तयार होते. सन १६०६ ते सन १७०७ या कालावधीत हा 'ध्वज ग्रेट ब्रिटन' या देशाचा 'किंग्स कलर्स' अर्थात 'युनियन जॅक' या नावाने संबोधित केला जात असे. सन १७०७ ते १८०१ या कालावधीत हा ग्रेट ब्रिटनच्या सर्व दर्यावर्दी जहाजांवर हा ध्वज फडकवला गेला. चित्र क्र. ३ मधील या आकृतीमध्ये गुणिले(गुणाकार) चिह्नाचा 'पांढरा सेंट अँड्य्रू क्रॉस' दिसतो आहे. सन १८०१ मध्ये या क्रॉसवर चित्र क्र. ४ मधील 'सेंट पॅट्रिक क्रॉस' जोडला गेला. 'सेंट पॅट्रिक' हे आयर्लंड देशाचे आराध्य संत आहेत आणि सेंट अँड्य्रू यांचे भाऊ आहेत.

 

 
 

चित्र क्र. ३ मध्ये दिसणाऱ्या 'ग्रेट ब्रिटन'च्या ध्वजामध्ये १८०१ सालातील झालेल्या या बदलानंतर आज प्रचलित असलेला 'युनायटेड किंग्डम' या चार देशांचा मिळून एक संयुक्त ध्वज तयार झाला. चित्र क्र.५ मध्ये असलेल्या या आकृतीकडे निरखून पाहिल्यास 'पांढऱ्या क्रॉस' वरील 'लाल क्रॉस' एका रेषेत नसल्याचे लक्षात येईल. यामुळे 'लाल क्रॉस'ची पांढरी धार जाणीवपूर्वक थोडीशी जाड-बारीक ठेवली गेली आहे. चित्र क्र. ५ 'युनायटेड किंग्डम' अर्थात इंग्लंडसह अन्य तीन देशांच्या या संयुक्त ध्वजात सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासून झालेले बदल फार रंजक आहेत. त्याचा सविस्तर इतिहास आज उपलब्ध आहे. 'क्रॉस' या चिह्नाचा प्रवास, पश्चिम युरोपमधील 'युनायटेड किंग्डम' या देशांच्या समूहाच्या ध्वजापर्यंत येऊन संपत नाही. उत्तर अटलांटिक आणि उत्तरेकडचा युरोप याला 'स्कॅण्डिनेव्हियन प्रदेश' असे म्हटले जाते. या प्रदेशांत डेन्मार्क, फिनलँड, आईसलँड, नॉर्वे, स्वीडन आणि ग्रीनलँड असे सहा देश समाविष्ट आहेत. ग्रीनलँड सोडून उरलेल्या पाच देशांचे ध्वज 'स्कॅण्डिनेव्हियन ख्रिश्चन क्रॉस'ने अंकित झालेले आहेत. आपल्या समोर दिसणाऱ्या 'स्कॅण्डिनेव्हियन ख्रिश्चन क्रॉस'च्या उजव्या बाजूचा आडवा हात अन्य तीन हातांपेक्षा थोडासा लांब आहे, हे 'स्कॅण्डिनेव्हियन ख्रिश्चन क्रॉस'चे वैशिष्ट्य आहे. लाल रंगाच्या पार्श्वभूमीवरील 'पांढरा क्रॉस' हा १७४८ सालात स्वीकारलेला डेन्मार्क या देशाचा ध्वज आहे. 'पांढऱ्या' पार्श्वभूमीवरील 'गडद निळा क्रॉस' हा १९१८मध्ये स्वीकारलेला फिनलँड या देशाचा ध्वज आहे. निळ्या पार्श्वभूमीवरील 'पिवळा क्रॉस' हा स्वीडन या देशाचा ध्वज आहे. आईसलँड या देशाचा ध्वज थोडा वेगळा आहे. गडद निळ्या पार्श्वभूमीवरील 'लाल क्रॉस'ला चारी बाजूंनी 'पांढरी किनार' आहे. नॉर्वे या देशाच्या ध्वजावरील रंग याच्या बरोबर उलट आहेत. याच्या गडद लाल पार्श्वभूमीवरील 'निळ्या क्रॉस'ला चारी बाजूंनी 'पांढरी किनार' आहे. सोबतच्या चित्र क्र. ५ मध्ये हे पाचही ध्वज एकत्र फडकताना दिसत आहेत. जगभरात प्रचलित असलेल्या 'ख्रिश्चन क्रॉस'च्या चिह्नांचे, अनेक दृश्य स्वरूपातील अर्थसंकेताबरोबरच अनेक विद्वान लेखकांनी केलेले या चिह्नाचे विश्लेषण आणि 'स्वस्तिक' या चिह्नाशी असलेले त्याचे साधर्म्य याचा परिचय या लेखमालेत आपण करून घेतला. या लेखात 'ख्रिश्चन क्रॉस'च्या चिह्नांचे निरुपण संपन्न झाले आहे. या पुढील लेखांतून अन्य धर्म-पंथ-संप्रदायांच्या चिह्नांचा आणि त्यातील चिह्नसंकेतांची ओळख, आपण करून घेणार आहोत.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@