जय हो...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2019   
Total Views |


 


६ षटकांमध्ये १६ धावांमध्ये ४ गडी बाद आणि एक झेल... बरं, बळी कोणाचा तर पहिलाच बळी ख्रिस गेलचा, त्यानंतर होप, हेटमेयर आणि मग सरतेशेवटी थॉमसचा... गेल म्हणजे एक वादळ, हे घोंघावण्याआधीच शमीने त्याला तंबूत पाठविलं आणि भारताच्या विजयाचा पाया रचला.


भारताने वेस्ट इंडिजचा १२५ धावांनी धुव्वा उडवला, या वाक्यापेक्षाही मला यंदाच्या विश्वचषकामध्ये सहा सामन्यानंतर भारत हा एकमेव देश आहे की, जो अपराजित आहे, हे वाक्य जास्त गौरवाचं वाटतंय. भारताने या सहा सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या देशांचा पराभव केलाय तर न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसामुळे अनिर्णीत राहिली. भारत सोडून यंदाच्या विश्वचषकामधील सर्व म्हणजेच नऊ संघांनी पराभवाची चव चाखलीय आणि म्हणूनच भारताचा आजचा विजय हा विशेष उठून दिसणारा आहे. भारताच्या या विजयी घोडदौडीत वेस्ट इंडिजचा संघ पायदळी तुडवला गेला. होय, अक्षरशः तुडवला गेला. खरंतर शिखर धवनला झालेल्या दुखापतीनंतर भारतीय संघाच्या रनमशीनला तशी खीळ बसलीय. के. राहुल तसा आपल्यापरीने जोरदार प्रयत्न करतोय, पण शम्मी कपूरची बेभान अदाकारीची अपेक्षा आपण संजीवकुमारकडून नाही ना करू शकत? दोघेही आपापल्या ठिकाणी बाप...पण आक्रमण म्हटल्यावर शम्मीकडून रुपेरी पडद्यावर आणि शिखर धवनकडून मैदानात जे आपण अपेक्षित करू शकतो, ते संजीव कुमार आणि के. राहुलकडून नाही करू शकत. त्यामुळे भारताच्या धावांच्या वेगाला जरा सुस्तीच आलीय. विराट कोहली आणि मधल्या फळीत धोनी आणि हार्दिकच्या फटकेबाजीमुळे भारताने अडीचशेपार धावसंख्या गाठली, पण भारताच्या विजयाचा माझ्यामते खरा शिल्पकार होता तो मोहम्मद शमी. ६ षटकांमध्ये १६ धावांमध्ये ४ गडी बाद आणि एक झेल... बरं, बळी कोणाचा तर पहिलाच बळी ख्रिस गेलचा, त्यानंतर होप, हेटमेयर आणि मग सरतेशेवटी थॉमसचा... गेल म्हणजे एक वादळ, हे घोंघावण्याआधीच शमीने त्याला तंबूत पाठविलं आणि भारताच्या विजयाचा पाया रचला.

 

‘सामनावीर’ म्हणून विराट कोहलीची निवड करण्यात आली, पण त्यावर खरा हक्क शमीचा होता. पराभवाने वेस्ट इंडिज संघ विश्वचषकातून बाद झालाय. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्ताननंतर विश्वचषकामधून बाद होणारी ती तिसरी टीम ठरलीय. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज सारखे मातब्बर संघ स्पर्धेतून बाद होत असताना बांगलादेशने मात्र आपला खेळ कमालीचा उंचावलाय, याबाबत आता कुणाचेच दुमत होणार नाही. सध्या बांगलादेश पाकिस्तान आणि श्रीलंकेला मागे टाकून पाचव्या क्रमांकावर आहे. भारताला आता श्रीलंका, इंग्लंड आणि बांगलादेश यापैकी कोणत्याही एका सामन्यामध्ये विजय मिळविल्यास उपांत्य फेरी गाठता येणार आहे आणि या तिघांना जर भारताने हरवले तर पाकिस्तानची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता वाढणार आहे. थोडक्यात भारताच्या मेहेरबानीवर पाकिस्तानचे विश्वचषकामधील अस्तित्व टिकणार आहे. सध्या तरी भारताची कामगिरी पाहता पुढील तिन्ही लिग सामन्यांमध्ये ‘जय हो’ चा नारा घुमायला काहीच हरकत नाही...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@