शाबासकी आहेच...मात्र अपेक्षादेखील आहेच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2019   
Total Views |



आधुनिक युगात शहरांचा होणारा विस्तार आणि वाढणारे नागरिकीकरण हे जसे नागरी समस्यांना आमंत्रण देत असतात, तसेच शहरांचे बदलणारे चित्र गुन्हेगारीलादेखील सुपीकता प्रदान करत असतात.


सध्या, या सुपीकतेच्या पटलावर गुन्हेगारीरूपी त्रासदायक पिकाचा अनुभव नाशिककर नागरिक घेत आहेत. याचे मुख्य कारण, मुंबई आणि गुजरात यांच्याशी असणारी भौगोलिक निकटता हे असण्याची दाट शक्यता आहे. नाशिकमध्ये गुन्हा करून मायानगरी मुंबईत आणि राज्य पोलिसांच्या हद्दीबाहेर थेट गुजरातमध्ये पलायन करणे सहज शक्य होत असल्याने गुन्हेगार नाशिकमध्ये डोके वर काढत आहेत का? हा प्रश्न यामुळे सध्या पुढे येत आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहेच. मात्र, नागरिकस्नेही पोलिसिंग होणेही गरजेचे आहे.

 

दि. १४ जूनपासूनच्या कालावधीचा विचार केला तर, नाशिक शहरात गुन्ह्यांची मालिकाच बघावयास मिळते.

 

घटना क्र. १ - मुथ्थुट फायनान्सवर दरोड्याचा प्रयत्न आणि दरोडेखोरांच्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू,

घटना क्र. २ - पंचवटीत गुंडांचा धुमाकूळ, सहा वाहनांची तोडफोड,

घटना क्र. ३ - आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी आणि त्याच आरोपींकडून घटनेच्या २५ दिवस आधी खून,

घटना क्र. ४ - शहराच्या मध्यवर्ती भागात पाच महिन्यांपासून एका युवतीवर अत्याचार.

घटना क्र. ५- पोलीस पित्याकडून आपल्याच मुलांची सर्व्हिस रिव्हॉल्वरने हत्या,

घटना क्र. ६ - आंब्याच्या गाडीत १३ लाखांच्या विदेशी मद्यसाठ्याची वाहतूक दुर्घटना

घटना क्र. ७ - पोलीस आयुक्तांचेच फेसबुकवर बोगस अकाऊंट,

घटना क्र. ८ - शहराच्या विविध भागांतून दुचाकींची चोरी,

घटना क्र. ९ - रिक्षाचालकाने महिला प्रवाशाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता महिलेची चालत्या रिक्षेतून उडी. महिला गंभीर जखमी,

घटना क्र. १० - कारमध्ये साडेसात लाखांचा गुटखा जप्त. या घटना संख्येने केवळ १० च नमूद करण्यात आल्या आहेत. इतर किरकोळ घटना या वेगळ्याच आहेत. शांत, आध्यात्मिक वारसा पुढे नेणारे नाशिक शहर अचानक गुन्ह्यांचे अंगण का झाले असावे? हाच प्रश्न सध्या नाशिककर नागरिकांना सतावत आहे.

 

गुन्हा रोखणे, हे केवळ पोलिसांचे काम नाही तर, ते सर्वसामान्य नागरिकांचेदेखील काम आहे. पोलिसांसमक्ष कुणीही गुन्हेगार गुन्हा करण्यास धजावत नाही. मात्र, तरीही नाशिकमध्ये झालेले गुन्हे निर्जनस्थळी घडलेल्या नाहीतच. त्यामुळे नाशिकला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी नाशिककरांनीदेखील सजग होत या कृत्यांना मज्जाव करण्याची आणि पोलिसांना वेळीच माहिती देण्याची गरज आहे. मात्र, यासाठी नागरिकस्नेही पोलिसिंग होणेदेखील आवश्यक आहेच. माजी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांच्या काळात पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद हा खूपच सुधारला होता. पोलीस जर माहिती देणाऱ्यासच आरोपी म्हणून वागणूक देत असतील तर कोणता नागरिक पुढे येऊन माहिती देईल? तसेच, सामान्य स्थितीत पोलीस जर नागरिकांशी आपुलकीने संवाद साधत नसतील तर, कोणीही नागरिक पोलिसांप्रती आपुलकी का दर्शवतील? याचा विचारदेखील नाशिक पोलीस प्रशासनाने करणे आवश्यक आहे. पोलीस हा समाजाचा मित्र असतो, ही भावना जरी गृहीत धरली तरी, तो मैत्र भाव दोन्ही बाजूने जपणे आवश्यक आहे.

 

वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांना माजी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, रवींद्रकुमार सिंघल, एस. जगन्नाथ यांच्या कार्यकाळाचे स्मरण होत आहे. या पोलीस आयुक्तांच्या काळात शहराचा गुन्हेगारी आलेख बऱ्याच अंशी खाली आला होता. सामूहिक जबाबदारीच्या तत्त्वास अनुषंगून या अधिकाऱ्यांनी शहरात गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले होते. तसेच, या काळात असणाऱ्या सीपी गणेश शिंदे, हेमराजसिंग राजपूत, उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी, वरिष्ठ निरीक्षक बाजीराव शिंदे यांसारख्या कर्तव्यकठोर पोलीस अधिकाऱ्यांची या आयुक्तांना साथ लाभली होती. सध्या विश्वास नांगरे-पाटील यांनीही गुन्हेगारी रोखण्यासाठी कंबर कसली आहे. शहरातील पोलीस किती संवेदनशील आहेत आणि ते नागरिकांना किती महत्त्व देतात, यावरच पोलीस दलाची आणि त्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची कारकीर्द यशस्वी की अयशस्वी याचे मापन होत असते. पोलीस हा जर आपला माणूस वाटला तर, त्याच्यापर्यंत लवकर माहिती पोहोचते किंवा आपल्या माणसासाठी नागरिक स्वतःच गुन्हेगार पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात देतात. त्यामुळे गुन्हेगारांवरदेखील समाजाचे दडपण निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे नाशिकमधील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नाशिक पोलिसांना समाजाभिमुख होत आपले कार्य करणे आवश्यक असल्याचे या घटना सांगत आहेत.

 

असो, तरीही सध्या गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास लावण्यात आणि गुन्हेगारांना जेरबंद करण्यातदेखील नाशिक पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्याबाबत नाशिककर नक्कीच नाशिक पोलिसांना शाबासकी देत असल्याचेदेखील दिसून येते. कोणताही धागादोरा, पुरावा हाताशी नसताना केवळ गाडीच्या एका केबलच्या माध्यमातून नाशिक पोलिसांनी मुथ्थुट फायनान्स दरोडा प्रयत्नाचा आणि गोळीबाराचा छडा लावला. तसेच थेट मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या. हे शास्त्रीय पद्धतीने आणि एकात्मता साधत केलेल्या तपासाचे फलित आहे. तसेच, इतर गुन्ह्यातदेखील पोलिसांनी आरोपी जेरबंद केले आहेतच. त्यामुळे आपल्या तपासी कामात वाकबगार असणाऱ्या नाशिक पोलिसांनी सामाजिक सहृदयता जोपासली तर, गुन्हे घडण्याच्या संख्येत कमतरता आणि गुन्हेगार ताबडतोब पकडण्याच्या संख्येत वृद्धी होण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे नाशिककर नागरिकांची सध्या नाशिक पोलिसांना शाबासकी आहेच. मात्र, त्यांच्याकडून सन्मानजनक आणि आपुलकीच्या वागणुकीची आणि त्याचबरोबर शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याची अपेक्षासुद्धा आहेच.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@