मोदींचा घणाघात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2019
Total Views |

2019 च्या नव्याने गठित लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या समर्थनार्थ बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची अशी काही खरडपट्टी काढली की, सर्वांचीच बोलती बंद झाली! कॉंग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी काही मुद्दे मांडले. आम्ही गेल्या 60 वर्षांत काय काय केले याची जंत्री वाचली. मोदी म्हणाले, आज 25 जून आहे. 25 जूनची ती रात्र, ज्या वेळी देशाचा आत्मा तुडवून टाकण्यात आला होता. लोकशाहीचा गळा आवळला गेला. मीडियावर निर्बंध लावण्यात आले. न्यायपालिकेचा अपमान कसा केला जातो, त्याचे उदाहरण म्हणजे आणिबाणी आहे. (शेम शेम) अनेक लोकांनी त्यासाठी तुरुंगवास आणि हालअपेष्टा भोगल्या. देशातील जनतेने लोकशाहीची बूज राखत कॉंग्रेसचा पराभव केला आणि लोकशाहीला पुनर्स्थापित केले. 1984 च्या शीख नरसंहाराची जबाबदारीही कॉंग्रेसचीच आहे. आज त्याचे दोषी कॉंग्रेसमध्ये उच्च पदावर आहेत. त्यांना शिक्षा झालेली नाही. देश कधीही विसरणार नाही. सोबतच एक धाडसी विधान अधीर रंजन यांनी केले. तुम्ही म्हणता, कॉंग्रेस भ्रष्टाचारी पक्ष आहे.
 
 
मग आतापर्यंत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना जेलमध्ये का टाकले नाही? आता हे विधान त्यांनी केले, की आणखी कुणी सुचविले, हे अजून समोर आले नाही. मोदींनी हाच धागा पकडला आणि म्हणाले, काही लोक आम्हाला यासाठी कोसत आहेत की, आम्ही विशिष्ट लोकांना जेलमध्ये का टाकले नाही. मोदींनी आणिबाणीची आठवण करून देत सांगितले, ही आणिबाणी नाही, कुणालाही जेलमध्ये टाकावे. देशात लोकशाही आहे. आम्ही कायद्याने चालणारे लोक आहोत. न्यायपालिका आपले काम करेल. शिक्षा देण्याचे काम त्यांचे आहे, आमचे नाही. आणि ज्यांना जामीन मिळाला आहे, त्यांनी तो एन्जॉय करावा (एकच हशा). आम्ही बदल्याच्या भावनेतून काम करणार नाही. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यावेळी सभागृहात उपस्थित होते. तथापि, आम्ही भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई लढत आहोत आणि पुढेही ती सुरूच ठेवू, असे मोदींनी ठणकावले.
 
अधीर रंजन आपल्या भाषणात म्हणाले होते, आमची उंची कुणीही कमी करू शकत नाही. त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले, कुणाची रेषा कमी करण्यात आम्हाला काहीही स्वारस्य नाही. आमची रेषा मोठी करण्यासाठी आम्ही जीवनाचा त्याग केला आहे. तुमची उंची आणखी वाढो, आणखी वाढो, आमच्यासाठी ही समाधानाची बाब आहे. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत (हशा). तुम्ही तर इतक्या उंचीवर गेले आहात की, तुम्हाला जमीनच दिसत नाही. आम्हाला तेवढी उंची गाठायची नाही. आम्हाला देशाच्या जनतेच्या मुळापर्यंत पाहोचायचे आहे. हेच आमचे ध्येय आहे. नव्यानेच राज्यमंत्री झालेल्या प्रतापचंद्र सारंगी यांनी आपल्या भाषणात, स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची महती गायिली. त्यांनी मोदींची तुलना त्यांच्याशी केली नाही. पण, अधीर रंजन चौधरी यांनी मोदींवर अतिशय नीचतम भाषेत टिप्पणी केली. त्यावर गदारोळ होणे स्वाभाविक होते. नंतर तो उल्लेख अध्यक्षांनी काढून टाकला.
 
 
 
पण, मोदींनी यावर एक आठवण सांगितली. शाहबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरविण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा कॉंग्रेसच्या एका नेत्याने विधान केले होते. राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचे म्हणणे होते, मुस्लिमांच्या उत्थानाची जबाबदारी कॉंग्रेसची नाही. त्यांना जर घाणेरड्या नालीतच (गटर) राहायचे असेल तर त्यांना तसेच राहू द्यावे. हे विधान केले होते, तत्कालीन कॉंग्रेसचे मंत्री आरिफ मोहम्मद खान यांनी. खान यांनी मोदींच्या भाषणानंतर पत्रकारांशी बोलताना, आपण असे विधान केले होते, हे मान्य केले. मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा करण्याची संधी होती. ती कॉंग्रेसने गमावली. त्यानंतर पुन्हा एक संधी आली होती. ती होती शाहबानो केसची. पण, त्यालाही कॉंग्रेसने अमान्य केले. समान अधिकाराची संधी देण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. आम्ही विधेयक आणले आहे.
 
तिहेरी तलाकला मान्यता देण्याची विनंती मोदींनी केली. मोदींनी सध्याच्या जलसंकटाचा उल्लेख करताना आवाहन केले की, जलसंचय ही काळाची गरज आहे. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी आम्ही जलशक्ती मंत्रालय स्थापन केले आहे. पण, जेवढा पाऊस पडतो, तेवढे पाणी साठविणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व राज्ये, एनजीओ यांनी सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन मोदींनी केले. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधी देश अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत अकराव्या क्रमांकावर होता. आता तो सहाव्या क्रमांकावर आला आहे. जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था व्हावी, अशी सर्वांची इच्छा आहे. याचे स्वागत केले पाहिजे आणि आपले योगदान दिले पाहिजे. आम्हाला देशाने बहुमत दिले आहे. वास्तविक पाहता ही लढाई जनतेनेच लढली आहे. शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांना न्याय देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. आम्ही सर्वांनी आपापल्या पक्षांना बाजूला ठेवून एक नवा भारत, आधुनिक भारत घडवू या आणि देशाला अधिक उंचीवर नेऊ या, असे आवाहन मोदींनी केले.
 
राज्यसभेतही विरोधकांच्या भाषणांना उत्तर देताना मोदींनी कॉंग्रेस नेत्यांची झाडाझडती घेतली. हे नेते म्हणाले होते, मोदी जिंकले पण देश हारला. यावर मोदी संतापाने म्हणाले, हा देशातील मतदारांचा अपमान आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे. ज्यांच्यात आपला विजय पचविण्याचे सामर्थ्य नाही आणि पराजय मान्य करण्याचा मोठेपणा नाही, असे लोकच अशा पद्धतीचे विधान करू शकतात. या देशातील मतदारांनी आम्हाला बहुमत दिले आहे. कुणाला निवडायचे हा मतदारांचा हक्क आहे. त्यांचा अशा पद्धतीने अपमान करणे योग्य नाही. बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींनी एक नवा नारा दिला होता. ‘सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास.’ यात त्यांनी ‘सबका विश्वास’ अशी जोड दिली होती. पण, गुलाम नबी आझाद यांनी एक विधान केले होते, ‘सबका विश्वास’ हा नारा अविश्वसनीय वाटतो. भाजपाने नेहमी अल्पसंख्यकांवर अन्याय केला आहे, असा आरोप त्यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोदी म्हणाले, काही लोकांच्या डोळ्यांत अंधुकपणा आला आहे. उनको सब धुंदलासा नजर आता है। प्रत्येक गोष्ट ते राजकीय चष्म्यातून बघत असतात. त्यामुळे कदाचित असावे. अशा लोकांसाठी गालिब यांनी एक शेर रचला होता-
ताउम्र गालिब ये भूल करता रहा,
धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा...
यावर सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले. मोदींनी शपथ ग्रहण केल्यानंतर सर्वात आधी, पाच कोटी अल्पसंख्य पाल्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना आधुनिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी नवोदय विद्यालयांच्या धर्तीवर शंभर शाळा अल्पसंख्य पाल्यांसाठी बांधण्याचा निर्णयही घोषित केला होता. कॉंग्रेसला भीती अशी वाटत आहे की या योजनेमुळे मोदी, मुस्लिम समुदायाच्या कॉंग्रेसच्या परंपरागत व्होट बँकेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, इच्छा असली की, काम तडीस जातेच, हे मोदींनी दाखवून दिले. एकूणच कॉंग्रेसची आणि भाजपाची रणनीती यापुढे काय राहील, हेही या निमित्ताने अधोरेखित झाले.
@@AUTHORINFO_V1@@