... म्हणून आणिबाणीचे स्मरण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2019
Total Views |

 
आजपासून 44 वर्षांपूर्वी, 25 जून 1975 च्या मध्यरात्री भारताच्या लोकशाहीवर स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घाला घालण्यात आला होता. ज्या इंदिरा गांधींना कॉंग्रेसी लोक डोक्यावर घेत असतात, त्याच इंदिरा गांधींनी देशात आणिबाणी लागू करून, जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. विरोधकांना तुरुंगात डांबून त्यांचा अनन्वित छळ केला होता. न्यायपालिका तर त्यांनी स्वत:च्या पदरालाच बांधली होती. ज्या कॉंग्रेस पक्षाने देशावर आणिबाणी लादली, त्याच पक्षाचे नेते आज बेशरमासारखे तोंड वर करून स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या गप्पा मारत दिसत आहेत. ज्या पत्रकारितेने (काहीच अपवाद होते) इंदिरा गांधींसमोर गडबडा लोटांगणे घातली होती, त्या वृत्तपत्रांचे आजचे संपादक गळ्याभोवती लाळेलं लावून लोकशाहीच्या बाता मारताना आपण बघत आहोत. नव्या पिढीला तर काही आठवतच नसणार. कारण, त्यांना ते शिकविलेच नाही. आणिबाणीचा काळा कालखंड आणि इंदिरा गांधींची क्रूर हुकूमशाही यांचा इतिहास केवळ पुस्तकातूनच नाही, तर भारतीय जनमानसातूनच पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणून भारताच्या इतिहासातील या सर्वात काळ्या कालखंडाचे स्मरण प्रत्येक भारतीयाने सतत करणे आज आवश्यक झाले आहे.
देशात आणिबाणी लावून जनतेचे लोकशाही अधिकार काढून घेण्याचे तसे काहीच कारण नव्हते. पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले होते आणि म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत, त्यांची निवडणूक रद्द ठरविली होती. इतकेच नाही, तर त्यांना सहा वर्षे कुठलीही निवडणूक लढविण्यास मनाई केली होती. इंदिरा गांधींना न्यायालयाचा निर्णय मान्य होणे शक्यच नव्हते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जायला हवे होते. पण, तिथेही निकाल त्यांच्या बाजूने लागेल याची शाश्वती नव्हती. एकच सभ्य मार्ग होता व तो म्हणजे पंतप्रधानपदावरून दूर होणे आणि आपल्याच एखाद्या लायक सहकार्याला गादीवर बसविणे. लोकशाही मनोवृत्तीसाठी आवश्यक एवढी साधी मानसिकताही नसलेल्या भारतरत्न इंदिरा गांधी यांनी, देशात आणिबाणी लावून, जनतेच्या सर्व अधिकारांचा संकोच करून टाकला आणि आपण न्यायालयाचा किती आदर करतो हे सर्व जगाला दाखवून दिले. खरेतर, इंदिरा गांधींविरुद्ध जनमानसात असलेल्या आक्रोशाला जयप्रकाश नारायण (जेपी) यांनी संघटित केले होते. जेपींना सर्व विरोधी पक्षांचा (भाकपासोडून) पािंठबा होता. स्वातंत्र्यानंतर प्रथमच कॉंग्रेस पक्षाविरुद्ध एक जबरदस्त आंदोलन उभे झाले होते. परंतु, लोकशाहीवादी म्हणून ज्यांचे फोटो नाचविले जातात त्या जवाहरलाल नेहरू यांच्या सुपुत्री आणि ज्यांना घामदेखील लोकशाहीचाच येतो अशी ज्यांची स्तुती केली जाते त्या इंदिरा गांधींना जनमताचा आदर करणे जमले नाही. वाघाचे कातडे पांघरलेला कोल्हा संकटात सापडताच आपले खरे रूप दाखवतोच.
 
25 जून 1975 नंतर देशात अंधारयुग सुरू झाले. कॉंग्रेसजनांना तर संजय गांधींच्या नेतृत्वात देशभरात माकडचेष्टा करण्याला मोकळे रानच मिळाले. लाखो विरोधकांना कुठलेही कारण न सांगता तुरुंगात डांबण्यात आले. जी वृत्तपत्रे सत्य बातम्या छापत होती, त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यात येत होती. या अंधारयुगाचा शेवट आहे का, याची कुणालाच काही कल्पना नव्हती. अशा या अत्यंत विपरीत परिस्थितीत भारताची लोकशाही वाचविण्याचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचविण्याचे महत्कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले, हे कुणालाही विसरता येणार नाही. कितीही वैचारिक मतभेद असोत वा कितीही राजकीय किंवा आर्थिक स्वार्थ असोत, संघाचे हे श्रेय मिटविण्याचा कुणीही प्रयत्न करता कामा नये. तो या देशाशी, या संविधानाशी केलेला द्रोह ठरेल. आणिबाणीविरुद्ध झालेल्या संघर्षात सर्व विरोधी पक्षांचा सहभाग असला, तरी तो तोंडी लावण्यापुरताच होता. खरा संघर्षनायक तर संघच होता! त्यामुळे इंदिरा गांधींच्या पोलिसांच्या अत्याचाराचा पूर्ण कहर संघ स्वयंसेवकांवरच बरसला. ज्या संघाला लोकशाहीविरोधी, संविधानविरोधी म्हणून लाळ गळेपर्यंत हिणवले जात होते, त्याच संघाच्या स्वयंसेवकांनी आणिबाणीतील अमानुष अत्याचार केवळ भारतमातेच्या प्रेमापायी सहन केले. त्या काळी संघाने हा पुढाकार घेतला नसता, तर भारतात लोकशाही कायम राहिली असती की नाही, शंकाच होती.
1977 साली इंदिरा गांधींनी घेतलेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचा बोर्या वाजला आणि विरोधी पक्षांचे कडबोळे असलेला जनता पक्ष सत्तेत आला. त्यानंतर झालेल्या तृतीय वर्षाच्या संघशिक्षा वर्गात, तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना एक शिक्षार्थ्याने (तो केरळचा होता आणि सर्वाधिक अत्याचार याच प्रांतात झाले होते) प्रश्न विचारला होता की, आणिबाणीच्या काळात कॉंग्रेसने केलेले अनन्वित अत्याचार आपण भोगले असतानाही तुम्ही, ‘झाले गेले विसरून जा. त्यांना क्षमा करा’ असे कसे काय म्हणता? बाळासाहेबांचे या प्रश्नाला जे उत्तर होते ते सर्वांनीच आणि विशेषत: संघद्वेषाने पिवळे पडलेल्यांनी विशेष लक्षात ठेवले पाहिजे. बाळासाहेब उत्तरले- आपण अत्याचार सहन केले, हे खरेच आहे. परंतु, काहीही झाले तरी ते (म्हणजे कॉंग्रेसवाले) आपलेच आहेत. दाताखाली जीभ चावली म्हणून कुणी दात पाडत नसतात. त्यांच्या हातून चूक झाली, जनतेने त्यांचा पराभव करून त्यांना शिक्षा दिली. आता त्यांना क्षमा केली पाहिजे. ‘चड्डीवाल्यांना’ काय समजते, या तोर्यात वावरणार्या समाजवाद्यांना, बाळासाहेबांच्या या उत्तरातील मथितार्थ त्या काळी समजला असता, तर भारताच्या राजकारणाचे चित्र वेगळेच राहिले असते.
 
आज नरेंद्र मोदींवर देशात आणिबाणीसदृश परिस्थिती निर्माण केली म्हणून आरोप लावले जात आहेत. हे आरोप लावणारेही कोण आहेत? जयप्रकाश नारायण यांना बंगालमध्ये प्रवेश करता येऊ नये म्हणून त्यांच्या कारवर चढून नाचणार्या भडक डोक्याच्या ममता बॅनर्जी आता हा आरोप लावत आहेत. त्या मुख्यमंत्री असलेल्या राज्यात त्यांच्याच पक्षाचे गुंड कार्यकर्ते दिवसाढवळ्या विरोधकांचे खून पाडत आहेत. हिंसाचार करत आहेत. ममता बॅनर्जींची ही लोकशाही आहे का?
 
 
 
 
आणिबाणीत जिवावर उदार होऊन ज्या सेनानींनी संघर्ष केला व भारतात लोकशाही कायम ठेवली, त्यांचे कृतज्ञतेने स्मरण करताना आपण विचार केला पाहिजे की, आज लोकशाहीचे जे स्वरूप आपण बघत आहोत, तेच त्यांना अभिप्रेत होते का? ज्याची छटाकभरही लायकी नाही तो उठतो आणि लोकशाहीच्या नावाने गळे काढत आहे. ज्यांचा संपूर्ण इतिहास हुकूमशाहीने भरलेला आहे, तेच लोकशाहीचे समर्थक म्हणून भले मोठे पदक गळ्यात लोढण्यासारखे अडकवून इकडेतिकडे फिरत आहेत. केवळ भाजपा सत्तेत येऊ नये म्हणून, तोंडाने सतत लोकशाहीचा जप करत, अनेक जण कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळू बघत आहेत. हेच जर यांचे लोकशाही वाचविणे असेल तर मग, इंदिरा गांधींनाही कशाला दोष द्यायचा? आज न्यायपालिका काय, राजकीय पक्ष काय, ठेकेदार एनजीओज काय, दरबारी पत्रकार काय, लाचार विचारवंत काय, सर्वच लोकशाहीचे झेंडे घेऊन बिथरल्यासारखे घुमत आहेत. या सर्वांना खडसावून, पुन्हा एकदा आणिबाणीचे स्मरण करून द्यावे लागणार आहे. त्या आणिबाणीत लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी संघासारख्या संस्थांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांची आठवण करून द्यावी लागणार आहे. तरच 25 जून हा लोकशाही पुनर्स्थापना दिन म्हणून साजरा करण्याचे सार्थक होईल.
@@AUTHORINFO_V1@@