विज्ञानासंगे करू निसर्गाची जोपासना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2019   
Total Views |



डोंबिवलीतील शाळांमधून 'न्यास'ने आपल्या कार्याची माहिती देण्यास सुरुवात केली. निसर्ग आणि विज्ञान या मानवाला मिळालेल्या देणग्या आहेत. विज्ञान प्रगती देतं, तर निसर्ग प्रगल्भता! डोंबिवलीमधील हुशार आणि 'हटके' काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली 'न्यास ट्रस्ट' म्हणजे निसर्ग आणि विज्ञानाच्या संगमाचं अनोखं उदाहरण.


विज्ञानाची कास धरत पुस्तकाबाहेरचे आणि पुस्तकापेक्षा सोपे विज्ञान सामान्य आणि विद्यार्थ्यांना कळावे यासाठी डोंबिवली शहरात राहणारे विश्वास भावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्यावरण आणि विज्ञान विषयक कार्य करण्याचे ठरवले. १९९७ साली 'न्यास'ची स्थापना करण्यात आली. डोंबिवली येथील एकमेकांचे मित्र असलेला एक छोटा गट- किशोर सावंत, विश्वास भावे, सचिन शेठ आणि वासंती भावे. किशोर सावंत हे फुटबॉल खेळाडू, सचीन शेठ हे इंजिनिअर आणि विज्ञाननिष्ठ विचाराचे. किशोर सावंत हौस म्हणून भागशाळा मैदानावर फुटबॉल खेळायचे. बघता बघता खेळामध्ये मुले सामील होऊ लागली. त्यांना शिकवता शिकवता संघ तयार झाला. स्वखर्चाने जिल्हास्तरीय स्पर्धा भरवणे असे उपक्रम सुरू असताना मुले म्हणू लागली एक क्लब पाहिजे... इथून थोडी सुरुवात होऊन हळूहळू त्याचे रूपांतर एका संस्थेत झाले. या ग्रुपला बांधणारी हौस म्हणजे 'ट्रेकिंग.' मात्र, यानंतर ग्रुपला वाटू लागले की, आपल्याला विज्ञानाची आवड आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन विकासित केला पाहिजे. मग आपण फुटबॉलच्या जोडीने विज्ञानाचे उपक्रमसुद्धा करायचे का? तरुण रक्ताबरोबर राहायचं आणि ज्या दिवशी आपल्याला वाटेल की, आपल्यामध्ये मुलं नाहीत, त्या दिवशी समजायचं की, आपल्याला जमवून घेता येत नाही. आपली क्षमता संपली. तोपर्यंत 'नॅशनल युथ असोसिएशन फॉर स्पोर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स' या नावाने एक संस्था उभी करायची आणि काम करायचे, निधीसाठी अडून बसायचं नाही. आपल्याला जमेल तेवढा निधी आपणच उभा करून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवायचे. हे सर्वांना मान्य झाले आणि एका क्लबचे रूपांतर एका संस्थेत झाले.

 

पहिला उपक्रम होता शहापूर तालुक्यातील हिव येथील एका निसर्गरम्य फार्मवर. ३० मुलांसाठी एक निसर्ग शिबीर आयोजित केले गेले. यामध्येच ठरले की, आपण विज्ञानावर आधारित 'विज्ञान महोत्सव' दरवर्षी आयोजित करायचा. सचिन शेठ यांनी पुढाकार घेतला आणि अतिशय चांगला उपक्रम सुरू आला. त्यात वैज्ञानिक प्रश्नमंजुषा, प्रयोग मेळावे आणि पेपर प्रेझेन्टेशन असे विविध उपक्रम अंतर्भूत झाले. शाळांशी ओळख झाली. संस्थेचे काम वाढत होते. मात्र, संस्थेचे नाव इतके मोठे न घेता 'स्नेह' आणि आपुलकीने लोक संस्थेला 'न्यास' म्हणून ओळखू लागले. त्यातच वर्तमानपत्रातून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची माहिती मिळाली. काही मुले एका प्रकल्पाच्या मार्गदर्शनासाठी आली. त्यांना संस्थेने मार्गदर्शन केले.मुलांच्या मेहनतीने तो प्रकल्प राज्यस्तरावर निवडला गेला. एकूणच या उपक्रमाबाबत उत्सुकता वाढली. हा केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने साहाय्य केलेला, पण विविध संस्थांतर्फे देशभर चालणारा उपक्रम होता. गावागावापर्यंत पोहोचणारा एक व्यापक उपक्रम होता. एक प्रमुख विषय घ्यायचा, त्यावर विख्यात तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांची मदत घेऊन मार्गदर्शक पुस्तिका तयार करून घ्यायची आणि मग शासनाच्या यंत्रणेच्या साहाय्याने पण सेवाभावी संस्थांनी आणि उपक्रमशील शिक्षकांनीच हा उपक्रम प्रथम जिल्हा मग राज्य आणि शेवटी राष्ट्रीयस्तरावर पोचवायचा. मुलांनी त्या वर्षीच्या प्रमुख विषयावर कृतीशील प्रकल्प करायचे आणि ते राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये सादर व्हायचे. या उपक्रमामध्ये ठाणे जिल्हा समन्वयक, विभागीय समन्वयक ते राज्य समन्वयक म्हणून 'न्यास'चे योगदान उल्लेखनीय राहिले. या सर्वांमुळे संस्थेला ग्रामीण महाराष्ट्र कळला आणि विज्ञान शिक्षकांच्या गरजासुद्धा कळल्या. तसेच राज्यभर विज्ञान शिक्षक आणि विविध विषयातील तज्ज्ञ यांचे एक नेटवर्क तयार झाले. १९९८ ते २०१३ 'न्यास'ने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत विविध भूमिका निभावल्या. विविध कार्यशाळा, सेमिनार्स, सादरीकरणे यातून या मुले मुलांमध्ये कौशल्ये विकसित झाली आणि व्यापक दृष्टिकोन तयार झाला.

 

मध्यंतरी 'न्यास'ने दर वर्षी 'विज्ञान महोत्सव' भरवणे, डोंबिवली-कल्याण येथील शाळांमध्ये 'सायन्स क्लब नेटवर्क' तयार करून विविध कार्यक्रम राबवणे, छोटी-छोटी निसर्ग शिबिरे, ट्रेल्स आयोजित करणे, कमी खर्चातील प्रयोगातून अभ्यासक्रम हा उपक्रम 'जलसाक्षरता अभियानां'तर्गत पिण्यायोग्य पाण्याच्या चाचण्या करून घेणे असे अनेक उपक्रम राबवले. २००४ मध्ये 'विज्ञान प्रचिती' नावाचे मुलांनी मुलांसाठी चालवलेले त्रैमासिक 'न्यास'ने सुरू केले. हे सर्व सुरू असताना 'न्यास'च्या क्रीडा विभागात दोन उपक्रमांनीसुद्धा जोर पकडला होता. फुटबॉल आणि ट्रेकिंग. मैदानांची सुविधा शहरात नसताना असेल त्या परिस्थितीत, कमी शुल्क घेऊन, भागशाळा मैदान आणि महापालिकेच्या क्रीडासंकुलातील मैदानात 'न्यास'ने मुलांसाठी कोचिंग सुरू केले. शाळांना भेटून प्रशिक्षण देऊन त्यांचे संघ तयार केले. डोंबिवली ऑलिम्पिक या रोटरी क्लबच्या कार्यक्रमात फुटबॉलचे आयोजन 'न्यास'कडे असायचे. आज 'न्यास'तर्फे जवळजवळ पाच ते सहा शाळांसाठीप्रशिक्षण दिले जाते. मैदाने अपुरी असल्याने 'सेवन-अ-साईड' सामने आयोजित करण्यास सुरुवात केली. 'मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन'च्या लीग स्पर्धेत आपले संघ संस्थेने उतरवण्यास सुरुवात केली. डोंबिवली शहरामध्ये फुटबॉलसाठी हक्काचे मोठे मैदान नाही. या परिस्थितीत 'न्यास'ने सातत्याने संघ तयार करून मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम केले. स्वीडन येथील 'युथ फुटबॉल चषका'साठी मुलांना सतत संधी दिली जाते. एवढी धडपड करूनसुद्धा मैदान नसणे ही मात्र संस्थेची खंत आहे.

 

२००१ साली 'न्यास'ने विविध तज्ज्ञ मंडळींना घेऊन 'अरण्यवाचन' हा उपक्रम सुरू केला आणि तेव्हापासून ते २०१९ पर्यंत लहान मुलांची शिबिरे विविध राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, व्याघ्रप्रकल्प येथे आयोजित केली गेली. त्यात नुसते प्राणी न बघता जंगलवाटेवरील पाऊलखुणा, इतर खुणा, जंगल कसे 'वाचावे,' सर्व ज्ञानेंद्रिये वापरून जंगलातील घटनांचा कसा मागोवा घ्यावा हे शिकवले जाते. २००६ मध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या 'विज्ञान प्रसार' या स्वायत्त संस्थेने सहावी ते बारावीतिल मुलांच्या विज्ञान शिक्षणासाठी आयआयटी, कानपूरच्या डॉ. एच. सी. वर्मा यांनी तयार केलेल्या भौतिकशास्त्रातील नावीन्यपूर्ण प्रयोग या कार्यशाळा राज्यस्तरावर घ्याव्या, असा प्रस्ताव दिला. डोंबिवली जिमखाना येथे ६ डिसेंबर, २००६ रोजी हा दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला आणि नंतर राज्यातील नऊ ठिकाणी अशा कार्यशाळा आयोजित केल्या. शिक्षकांची उत्सुकता, आवड बघितली, पण काही अडचणीसुद्धा अनुभवाला आल्या. वर्गात विज्ञान कसे शिकवावे, याविषयात काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. साधने तर होती, पण त्या साधनांची कार्यवाही कशी करावी, याचा शोध घेत असताना एक संधी आली. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानेसुद्धा प्रथम स्थानिक पातळीवर 'न्यासा'ला पथदर्शी प्रकल्प करायला सांगितला. त्याच्या यशानंतर महाराष्ट्र शासन नियंत्रित शाळांमध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत 'विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षण' या विषयाला मिशनचे स्वरूप देऊन या मिशनसाठी 'न्यास'ची सहयोगी संस्था म्हणून नियुकी केली. 'मिशन छउऋ' या नावाने २०१६ मध्ये अत्यंत यशस्वीपणे हे प्रशिक्षण पार पडले आणि त्यांमुळे राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील एकूण एक हजार शिक्षक लाभार्थी ठरले आणि ३०० ते ५०० विज्ञान शिक्षकांची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून फळी तयार झाली. वर्गात विज्ञान शिकवताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती देणे हे 'ज्ञानरचनावादा'त अपेक्षित असलेली पद्धत प्रत्यक्ष वर्गात कशी वापरायची, याचे प्रशिक्षण या प्रकल्पात दिले गेले. २०१७-१८ या काळात महाराष्ट्रातील १२ हजार शाळांनी याचा लाभ घेतला. हे सर्व करत असताना समांतर काळात 'विज्ञान प्रचिती' या मासिकाचे काम, शाळांना त्यांच्या उपक्रमासाठी मार्गदर्शन करणे, निसर्ग अभ्यास या क्षेत्रात चांगली सादरीकरणे तयार करणे, हिवाळी पाहुणे पक्ष्यांसाठी शहर आणि आसपासचा परिसरामध्ये छोटे 'नेचर ट्रेल्स विंटर विथ न्यास' या उपक्रमांतर्गत आयोजित करणे, हिवाळी शिबिरे असे उपक्रम सतत चालू असतात.

 

मुंबईमध्ये काही पक्षीनिरीक्षकांनी २००५ मध्ये एक छान उपक्रम सुरू केला. 'मुंबई बर्ड रेस' यामध्ये हौशी पक्षीनिरीक्षकांनी एक भाग निवडून त्यातील पक्ष्यांबाबात सर्वतोपरी माहिती संकलन नोंद करायची आणि 'महाराष्ट्र नेचर पार्क'मध्ये त्याचे सादरीकरण करायचे. 'न्यास'ने लहान वयोगटातील मुलांना यात उतरवायला सुरुवात केली. हौशी पक्षीनिरीक्षकांना शास्त्रोक्त नोंदी ठेवायचा अनुभव मिळावा म्हणून बक्षीस मिळवण्याचा उद्देश न ठेवता यात भाग घेण्यास उद्युक्त केले. त्याचप्रमाणे एका शहराच्या सीमेमधील पक्ष्यांची नोंद व्हावी म्हणून त्या धर्तीवर 'डोंबिवली बर्ड रेस' सुरू केली. वृक्षसंपदेचीसुद्धा नोंद व्हावी म्हणून 'डोंबिवली ग्रीन रेस'सुद्धा सुरू केली. कल्याण-डोंबिवली महापालिकेने 'न्यास' आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करून या कार्यक्रमाला चांगला आधार दिला. यानिमित्ताने डोंबिवली येथील पक्ष्यांची चांगली नोंद झाली आणि बऱ्याच हौशी पक्षीनिरीक्षकांचे रूपांतर तज्ज्ञ पक्षीनिरीक्षकांमध्ये झाले. शासनाचे वर उल्लेख केलेले काही उपक्रम, स्थानिक पातळीवरील उपक्रम,राज्यस्तरीय उपक्रम यामुळे आता आवाका वाढलेला आहे. याशिवाय 'न्यास'चे विश्वास भावे यांनी संपूर्ण 'न्यास ग्रुप'च्या मदतीने जगप्रसिद्ध निसर्गतज्ज्ञ जिम कोर्बेट यांची चार पुस्तके, बीली अर्जन सिंघ यांचे 'टायगर हेवन' हे पुस्तक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसासयटीच्या दोन पुस्तकांची तसेच 'महाराष्ट्रातील महत्त्वाची पक्षीक्षेत्रे' आणि'महाराष्ट्रातील संकटग्रस्त पक्षी' ही दोन भाषांतरे इ. साहित्याचीनिर्मिती केली. उल्लेख केलेल्या पुस्तकांशिवाय अनुपम मिश्र यांचे 'आजभी खरे है तालाब' या अतिशय सुंदर आणि उपयुक्त पुस्तकाचे भाषांतर केले. २००५ साली संस्थने 'जलसाक्षरता अभियान' या नावाखाली पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी एक सर्वेक्षण केले आणि अगदी पायाभूत चाचण्या घेतल्या. यानंतर संस्थेला वाटले की, पाण्याच्या प्रश्नावरसुद्धा काम सुरू केले पाहिजे. महाराष्ट्रात विविध भौगोलिक विभाग आहेत आणि हवामान, पर्जन्यमान, भूगोल, इतर अनेक गोष्टी यामुळे प्रत्येक विभागाची पाण्याच्या बाबतीत वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक विभागात वेगवेगळ्या संस्था, व्यक्ती काही चांगली कामे करत आहेत. भीषण दुष्काळ सुरूच आहेत. याचे सर्वकष चित्र उभे करून त्यासाठी एक व्यासपीठ देण्यासाठी दि. २ जून रोजी 'जलजागर २०१९' या नावाखाली एक चर्चासत्र आयोजित केले होते. यात एकत्रितपणे बऱ्याच महत्त्वाच्या माहितीचे संकलन एकत्रितपणे झाले आहे. 'पाण्याचा प्रश्न' हा फक्त पर्जन्य या एकाच गोष्टींशी निगडित नसून धोरणे, विकासाच्या संकल्पना, कृषी, वने, सामाजिक मानसिकता अशा अनेक पैलूंशी निगडित आहेत, याचे सुंदर चित्र उभे राहिले. हे सर्व करताना 'न्यास'ने बैठका, पदांची उतरंड, निधी गोळा करणे, लांबलचक निर्णय प्रक्रिया, कार्यालये वगैरे गोष्टीत न अडकता सतत तरुणांना नेतृत्व देण्यावर संस्थेने भर दिला आहे. सतत तरुण पिढी समोर आहे. पुढील काळातसुद्धा विज्ञान जागृती, विज्ञानाचे शालेय शिक्षण, अरण्यवाचन शिबिरे, पर्यावरण जागरूकता, आणि क्रीडा विभागात अर्थातच फुटबॉल या क्षेत्रात सतत काम करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. संस्थेला एक गोष्ट मात्र जाणवली आहे की, सेवाभावी संस्था, प्रसिद्धी माध्यमे, शासन यंत्रणा या जर चांगला उद्देश ठेवून एकत्र आल्या, तर छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये सुरू असलेली विविध संस्थांची छोटी-छोटी कामे मोठे स्वरूप घेऊ शकतात.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@