पराभूत विरोधकांची अस्तित्वासाठी धडपड!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2019   
Total Views |



काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलुगू देसम, समाजवादी पक्ष, बसप, तृणमूल काँग्रेस आदी अनेक पक्ष पराभवाच्या धक्क्यातून कसे सावरायचे, याचा विचार करण्याच्या मागे लागले आहेत. काँग्रेस पक्ष तर सध्या संभ्रमावस्थेत असल्यासारखा दिसत आहे.

 

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची जी 'त्सुनामी' आली, त्यामध्ये देशातील प्रमुख विरोधी पक्ष पूर्णपणे भुईसपाट झाले. भाजपच्या हातून सत्ता खेचून घेण्याच्या फुशारक्या मारणारे विरोधी पक्ष आणि त्या पक्षाचे नेते पराभवाच्या या धक्क्यातून अजून सावरलेले नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलुगू देसम, समाजवादी पक्ष, बसप, तृणमूल काँग्रेस आदी अनेक पक्ष पराभवाच्या धक्क्यातून कसे सावरायचे, याचा विचार करण्याच्या मागे लागले आहेत. काँग्रेस पक्ष तर सध्या संभ्रमावस्थेत असल्यासारखा दिसत आहे.

 

विरोधी पक्षांमध्ये ऐक्य साधण्याच्या कामात पुढे असलेले तेलुगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांची अवस्था तर अत्यंत वाईट झाली आहे. आंध्र प्रदेशची सत्ता त्यांच्या हातातून तर गेलीच, पण पंतप्रधान बनण्याचे जे स्वप्न ते बाळगून होते, तेही पूर्णपणे विरून गेले. चंद्राबाबू यांच्या पक्षात फूट पडली. पक्षातील चार खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करून चंद्राबाबू नायडू यांना हादरा दिला. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आणि राष्ट्रीय व राज्याच्या राजकारणात लक्ष घालण्याची संधी नाकारण्यात आल्यानंतर युरोपच्या दौर्‍यावर गेलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी तेथून, आपल्या पक्षातील पडझड रोखण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तेलुगू देसमचे एक नेते म्हणतात, “आमच्या पक्षावर असे प्रसंग याआधीही आले आहेत. त्यातून आम्ही पुन्हा उभे राहिलो आहोत. त्यामुळे चार खासदार भाजपमध्ये गेल्याची चिंता करण्याचे कारण नाही.”

 

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. तसेच, “आपला किंवा आपल्या कुटुंबातील कोणाचाही या पदासाठी विचार करू नये,” असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ही पोकळी भरून कशी काढायची, हा मोठा प्रश्न काँग्रेसपुढे उभा आहे. नेहरू-गांधी घराण्याशिवाय ज्या पक्षाचे पानही हलत नाही, तो पक्ष त्या घराण्याशिवाय काम करील का, याची कल्पना करवत नाही. काँग्रेसचे वादग्रस्त नेते मणिशंकर अय्यर यांनी यावर उपाय सुचवला आहे. गांधी-नेहरू घराण्याबाहेरची व्यक्ती काँग्रेसचे नेतृत्व करू शकते. पण, या घराण्याने सक्रिय राजकारणात राहिलेच पाहिजे, असे अय्यर यांनी म्हटले आहे. भाजपला 'गांधीमुक्त काँग्रेस' आणि 'काँग्रेसमुक्त भारत' बनवायचा आहे. पण, काँग्रेसने भाजपच्या जाळ्यात फसता कामा नये.

 

यु. एन. ढेबर, ब्रह्मानंद रेड्डी यांच्यासारख्या, नेहरू-गांधी घराण्याच्या बाहेरील व्यक्तींनी यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे, याकडेही मणिशंकर अय्यर यांनी लक्ष वेधले आहे. असे सर्व सांगूनही त्यांनी हरिदासाची कथा मूळ पदावर आणली आहे. ते म्हणतात, “असे असले तरी राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदावर राहणे हेच पक्षाच्या दृष्टीने अधिक हिताचे आहे.” मणिशंकर अय्यर यांचे हे वक्तव्य लक्षात घेता, नेहरू -गांधी घराण्याला दूर करण्याची काँग्रेसची तयारी नसल्याचे दिसून येत आहे. राहुल गांधी यांना पर्याय कोण होऊ शकतो, याची चर्चा माध्यमांमधून सुरू असली तरी नेहरू-गांधी घराण्याशिवाय काँग्रेस हा विचार त्या पक्षाच्या मुळी पचनीच पडणार नाही, असे दिसून येत आहे.

 

दुसरीकडे, काँग्रेसचे अन्य एक नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी पक्षाच्या दारूण पराभवाबद्दल जे जाहीर भाष्य केले आहे, ते पाहता त्या पक्षास पराभवाचा धक्का किती जबरदस्त बसला आहे, याची कल्पना यावी. ते म्हणतात की, “लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या रूपाने जी 'त्सुनामी' आली होती, त्यापुढे कोणाचाच टिकाव लागला नाही. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेस तोंड देण्यास कोणालाही जमले नाही. नशीब इतकेच म्हणायचे की, या 'त्सुनामी'त सर्व काही वाहून गेले. पण आम्ही जिवंत राहिलो आणि आपल्याशी आम्ही बोलू शकत आहोत...!”

 

काँग्रेसची अशी अवस्था तर माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या पक्षाचा कर्नाटकमध्ये जो पराभव झाला, त्यामुळे त्यांना पक्षाच्या आणि कर्नाटक सरकारच्या भवितव्याबद्दल चिंता वाटू लागली आहे. देवेगौडा यांचे चिरंजीव आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राज्यकारभार चालविणे कर्मकठीण असल्याचे मध्यंतरी डोळ्यात पाणी आणून म्हटले होते. आता देवेगौडा यांनी राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता असल्याचे केलेले भाकीत लक्षात घेता कर्नाटक सरकारचे काही खरे नाही, हे यावरून दिसून येत आहे.

 

अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची किंवा मायावती यांच्या बसपाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. सगळेच पक्ष पराभवाच्या धक्क्यामधून अजून सावरत आहेत. मायावती, चंद्राबाबू, राहुल गांधी , शरद पवार, ममता बॅनर्जी, देवेगौडा आदी नेत्यांनी पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहिली होती. पण, लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे त्यांची ही स्वप्ने हवेतच विरून गेली आहेत.

 

. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तर नरेंद्र मोदी यांना पाण्यात पाहिल्यासारखेच वागत आहेत. केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या बैठकीवर त्यांचा बहिष्कार टाकणे चालूच आहे. निवडणुकांचे निकाल घोषित होऊन महिन्याभराचा कालावधी लोटून गेला तरी तेथे अजून राजकीय हिंसाचाराच्या घटना घडतच आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांसह अन्य विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या ही त्या राज्यातील नित्याची बाब झाली आहे. त्या हत्या रोखण्यासाठी प. बंगाल सरकार ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.

 

प. बंगालमध्ये हिंसाचार चालू असतानाच ममता बॅनर्जी यांच्या कारकिर्दीत त्या राज्यात, अनेक बाबतीत 'कट मनी' किंवा 'कमिशन' कसे घेतले जाते, याची चर्चा सध्या जोरदारपणे चालू आहे. विविध कल्याणकारी योजना राबविताना 'कमिशन' घेण्याचा प्रकार राजरोस चालत असल्याचे, ज्या बातम्या प्रसृत होत आहेत त्यावरून लक्षात येत आहे. आता तृणमूल काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी असे 'कमिशन' वा 'कट मनी' घेतला आहे, तो संबंधितांना परत करावा, असे ममता बॅनर्जी यांनी पक्षातील आपल्या एका गटास सांगितले आहे.

 

ज्या गरीब जनतेकडून हे कमिशन घेतले गेले ते तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून परत केले जाईल, असे ममता बॅनर्जी यांना वाटते काय? या 'कट मनी' चा हिस्सा कोणापर्यंत पोहोचला आहे, हे ममता बॅनर्जीच जाणोत! 'कट मनी' घेताना काही लाजलज्जाही बाळगली जात नव्हती. अंत्यसंस्कारासाठी कोलकाता महापालिकेकडून जी दोन हजार रुपयांची मदत दिली जायची, त्यातील २०० रुपये तृणमूल काँग्रेसचे काही नेते 'कट मनी' म्हणून घ्यायचे, असा आरोप दस्तुरखुद्द ममता बॅनर्जी यांनी कोलकाता महापालिका कर्मचार्‍यांच्या सभेत बोलताना केला होता. या 'कट मनी'वरून चर्चा होऊ लागल्याने, आमच्या पक्षाचे ९९.९९ टक्के पदाधिकारी, लोकप्रतिनिधी प्रामाणिक, कठोर परिश्रम करणारे आहेत, असा खुलासा त्या पक्षाचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांना करावा लागला! एकूणच विरोधकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यात त्यांची कुलंगडी बाहेर पडू लागल्याने तोंड लपवायला जागा नाही, अशी त्यांची अवस्था होऊ लागली तर आश्चर्य वाटायला नको!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@