अफगाणचे आशादायी चित्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2019   
Total Views |



‘स्व’शिक्षणासाठी झगडणाऱ्या मलाला युसुफझाईसारख्या मुलीवर निर्घृणपणे गोळीबार करणारेदेखील तालिबानीच. अशा सर्व विदारक स्थितीचा सामना करत आज अफगाणिस्तानचे चित्र बदलत असल्याचे समोर येत आहे.

 

भारतीय उपखंडातील सर्वात जास्त सामाजिक विदारक परिस्थिती ज्या देशाने अनुभवली तो देश म्हणजे अफगाणिस्तान. भारत आणि पाकिस्तानची सीमा या देशाला लागून आहे. मात्र, भारतात असणारी शांतता, सामाजिक सहृदयता या देशात मागील काही वर्षात पाहावयास मिळाली नाही. ‘९/११’च्या घटनेनंतर अफगाणिस्तानवर महासत्तेची अर्थात अमेरिकेची वक्रदृष्टी पडली. अर्थात, त्याला कारणदेखील तसेच होते. अफगाणिस्तानात वास्तव्यास असणाऱ्या ओसामा बिन लादेन याने अमेरिकेवर भ्याड हल्ला करत तेथे मोठी जीवितहानी घडवून आणली होती. या घटनेनंतर अफगाणिस्तानात मोठी स्थित्यंतरे झाली. तेथील तालिबानी राजवट उलथून टाकण्यासाठी महासत्तेने अफगाण भूमीला आपली भूमी समजूनच कारवाईचे सत्र सुरू केले. यापूर्वीदेखील अफगाणिस्तानची स्थिती काही वेगळी नव्हती. ‘तालिबान’ नावाच्या मोठ्या दहशतवादी समूहाने आपल्या कृष्णकृत्याने तेथील जीवनमान होरपळून काढले होते. तालिबानच्या जाहीर होणाऱ्या फतव्यांचा सर्वात जास्त त्रास हा अफगाणमधील महिलांना सहन करावा लागला. यातूनच तेथील समाजात एक नैराश्य आणि भीती यांचा जन्म झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महिलांचे शिक्षण, आरोग्य, समाजातील वावर या सर्वांवर तालिबानचेच वर्चस्व होते, हे वारंवार प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमधून आपण पाहिले.

 

‘स्व’शिक्षणासाठी झगडणाऱ्या मलाला युसुफझाईसारख्या मुलीवर निर्घृणपणे गोळीबार करणारेदेखील तालिबानीच. अशा सर्व विदारक स्थितीचा सामना करत आज अफगाणिस्तानचे चित्र बदलत असल्याचे समोर येत आहे. नुकतेच अफगाणिस्तानातील काही साहसी स्थानिक मुलींनी जरीफा अबीदा या मुलीच्या नेतृत्वाखाली एकत्र येत ऑर्केस्ट्रा स्थापन केला. आपल्यासाठी ऑर्केस्ट्राची स्थापना हा काही खूप मोठा चर्चेचा विषय नाही. मात्र, अफगाणमध्ये तो महत्त्वाचा विषय ठरतो. कारण, संगीताला ‘हराम’ ठरवत अफगाणमध्ये तालिबानींनी संगीत ऐकण्यास काही वर्षांपूर्वी मज्ज्जाव केला होता. अशा भूमीत संगीत ऐकणे, संगीत सादर करणे आणि तेही महिला वर्गाने हे खूप मोठे सामाजिक बदलाचे परिमाण ठरते. त्यामुळे तयार करण्यात आलेला हा ऑर्केस्ट्रा सामाजिक स्थित्यंतराच्या दृष्टीने एक मोठे पाऊल ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या मुलींच्या ऑर्केस्ट्राने लंडनमध्ये जात आपली कला सादर केली आहे. यामुळे ज्या अफगाणमधील मुलींना घराबाहेर पडण्यासदेखील तालिबानने अटकाव केला होता, त्या मुली आता परदेशात जाऊन आपली कला सादर करत आहेत. हे उदाहरण अफगाणसाठी खूपच प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक आहे. याबाबत आपले मत मांडताना जरिफाने सांगितले की, “आमच्या समाजात संगीताला पाप समजले जाते. पण जग बघितल्यानंतर आम्हाला संगीताचे महत्त्व समजले.” त्यामुळे जरिफाने काश्मीरच्या महिला बँडमधील सदस्यांना लोक काय म्हणतील, याकडे दुर्लक्ष करून आपले स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत करण्याचे आवाहन केले होते. तिच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे ३० मुली एकत्र आल्या व त्यांनी या ऑर्केस्ट्राची निर्मिती केली.

 

काही वर्षांपूर्वी अफगाणमध्ये ज्या महिला संगीतकार, कलाकार किंवा वादक आहेत, त्यांना तालिबानींनी रस्त्यावर जीवंत जाळल्याच्या, दगडाने ठेचून मारल्याच्या घटनादेखील घडल्याचे जरिफा यावेळी नमूद करते. मात्र, अशाही स्थितीत आपली स्वप्नपूर्ती साकारण्यासाठी जरिफाने दाखविलेला पठाणी बाणा हा निश्चितच कौतुकास्पद आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर अफगाण क्रिकेटमय झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे जागतिक स्तरावर असणाऱ्या कलांमध्ये आता अफगाणी कलाकार आणि खेळाडू आपले स्थान निर्माण करू पाहत आहेत. हे बदलणारे अफगाणचे चित्र नक्कीच बोलके आहे. मानवी जीवनाला काळिमा ठरणाऱ्या अनेक घटना अफगाणिस्तानच्या भूमीवर घडल्या आहेत. अशा स्थितीत तेथील भूमीतून केवळ नैराश्य आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडणे सहज शक्य होते. मात्र, काळ्या दिवसांची स्मृती विस्मृतीत परावर्तित करून नवीन आशा आणि त्या आशेला दिशादायी कार्याची जोड देत अफगाणचे नागरिक आज मार्गक्रमण करत आहे. हे मार्गक्रमण जागतिक पटलावरील समस्या कमी करणारे आणि शेजारी म्हणून भारतासाठी डोकेदुखी कमी करणारे नक्कीच आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@