ऑक्टोबरपर्यंत सुधारा, नाहीतर काळ्या यादीत समावेश!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2019
Total Views |



दहशतवादाप्रकरणी ’एफएटीएफ’ची पाकिस्तानला तंबी

फ्लोरिडा : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीयस्तरावर एकटे पाडण्यासाठी भारताकडून होणाऱ्या प्रयत्नांना शनिवार, दि. 22 जून रोजी मोठे यश मिळाले. दहशतवादाबाबतचे ’नापाक’ धोरण पुढच्या चार महिन्यांत म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत न बदलल्यास काळ्या यादीत टाकण्याची तंबी आर्थिक कारवाई कृती दलाने शनिवारी (एफएटीएफ) दिली.

 

जानेवारी 2019 पर्यंत देण्यात आलेली मुदत मे 2019 पर्यंत वाढवण्यात आली होती. परंतु, अजूनही पाकचे शेपूट वाकडेच असल्याचे दिसते. म्हणूनच आता ’एफएटीएफ’ने त्यांना शेवटची संधी दिली आहे. फ्लोरिडामध्ये झालेल्या बैठकीत पाकला ऑक्टोबरची ’डेडलाईन’ देण्यात आली. भारताच्या याबाबतच्या प्रस्तावाला अमेरिका आणि ब्रिटनने समर्थन दिले. पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यास फक्त तुर्कस्थानने विरोध केल्याचे समजते. त्याचप्रमाणे पाकिस्तानचा पाठराखण करणाऱ्या चीनने या बैठकीपासून दूर राहणेच पसंत केले.

 

जगभरातील ’मनी लाँड्रिंग’ची प्रकरणे आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या विविध माध्यमांवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम ’एफएटीएफ’ ही आंतरराष्ट्रीय संस्था करते. जून 2018 मध्ये या संस्थेने पाकिस्तानला ’ग्रे लिस्ट’मध्ये टाकले होेते. या यादीतून बाहेर येण्यासाठी पाकला 27 निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे. परंतु, दहशतवादी संघटनांना पाकिस्तानमधून होणारा अर्थपुरवठा सुरूच आहे. इस्लामिक स्टेट, लष्कर-ए-तोयबा, जैश, जेयुडी, एफआयएफ या दहशतवादी संघटनांना होणारा अर्थपुरवठा थांबावा, यासाठी पाकिस्तान सरकारने ठोस पावले उचलल्याचे दिसत नाही, असे दि. 22 फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले होते.

 

पाकिस्तानलाब्लॅक लिस्टपासून वाचवण्यासाठी चीनसारखे काही मित्र प्रयत्न करणार असले, तरी पाकसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. इस्लामाबादचे नाव ’ब्लॅक लिस्ट’मध्ये आल्यास, आधीच कर्जाच्या विळख्यात अडकलेला पाकिस्तान पार खड्ड्यात जाऊ शकतो. कारण, कुठल्याही देशाकडून कर्ज घेणे त्यांना महाकठीण होऊ शकते. वर्ल्ड बँकेकडून मिळणाऱ्या मदतीतही लक्षणीय घट होऊ शकते. दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानचे जगात वस्त्रहरण झाले आहेच. आता आर्थिक नाड्या आवळल्या जाणे त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे ‘ब्लॅक लिस्ट’च्या संकटापासून वाचण्यासाठी पाक सरकारला हातपाय मारावे लागतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@