जगातील सर्वात मोठ्या कालमेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन

    21-Jun-2019
Total Views |


 


तेलंगणातील कालेश्वरम प्रकल्पाचा गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांना मिळणार लाभ


मुंबई : तेलंगणा राज्यातील विविधोपयोगी लिफ्ट पाणीपुरवठा योजनांचा समावेश असणाऱ्या कालेश्वरम प्रकल्पाचे (मेडीगट्टा बॅरेज) उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या प्रकल्पातील चार उपसा सिंचन योजनांमुळे गडचिरोलीतील ७११८ हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार आहे. तसेच या प्रकल्पाचा भाग असलेल्या प्रस्तावित तुमडीहेट्टी बॅरेजमुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील २५ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधा मिळणार आहेत. तेलंगणा राज्याच्या जयशंकर भुपालपल्ली जिल्ह्यातील मेडिगट्टा येथे या प्रकल्पाचे उद्घाटन झाले.


जगातील सर्वात मोठी उपसा पाणीपुरवठा योजना

 

विविध पातळ्यांवरील प्रकल्पांचा समावेश असणारी ही जगातील सर्वात मोठी उपसा पाणीपुरवठा योजना मानली जात आहे. या प्रकल्पामुळे दोन राज्यांतील ४५ लाख एकर क्षेत्राला वर्षातून दोन पिकांसाठी पाणीपुरवठा होणार आहे. या प्रकल्पांतर्गत असलेल्या मेडीगट्टा बॅरेजचा महाराष्ट्राला फायदा होणार असून या पाण्याचा वापर करून चार उपसा सिंचन योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पेंटीपाका (३२१६ हेक्टर), रंगय्यापल्ली (८४८ हेक्टर), टेकाडा (२००० हेक्टर) आणि रेगुंठा (२०५२ हेक्टर) यांचा समावेश आहे. या चारही योजनांद्वारे ७४.३४ दलघमी (२.६३ टीएमसी) पाण्याच्या वापरातून जिल्ह्यातील ७११८ हेक्टर सिंचन क्षेत्रास फायदा होणार आहे. या प्रकल्पाच्या पाण्यावर दोन्ही राज्यांमध्ये मच्छीमारी व नौकावहन करण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat