उमद्या मनाचा वनाधिकारी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2019
Total Views |


 

 

गेल्या ३१ वर्षांपासून वनविभागाच्या सेवेत कार्यरत असलेला एक उमद्या मनाचा वनाधिकारी म्हणजे सुनील लिमये. त्यांची नुकतीच राज्याच्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्चिम (वन्यजीव) या पदावर बदली झाली. त्यानिमित्ताने...


मुंबई ( अक्षय मांडवकर) :  वनविभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या फळीमध्ये 'या' अधिकाऱ्याचा समावेश आहे. मात्र, आपल्या पदाचा मोठेपणा न मिरवता तळागाळातील लोकांसोबत काम करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. आजच्या घडीला वनविभागातील अत्यंत सक्षम आणि धडाडीने काम करणारे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. महत्त्वाचे म्हणजे, वनविभागातील काही अधिकाऱ्यांप्रमाणे वातानुकूलित कार्यालयामध्ये ते रेंगाळत बसत नाहीत. याउलट वनमजुरांसोबत प्रत्यक्ष जंगल पिंजून काढत काम करणे, त्यांच्या अधिक पसंतीस उतरते. वन्यजीव संवर्धनामधील त्यांचे काम वाखाखण्याजोगे आहे. गेल्या ३१ वर्षांपासून ते वनविभागाच्या सेवेत कार्यरत आहेत. असा उमद्या मनाचा वनाधिकारी म्हणजे नुकतीच राज्याच्या 'अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्चिम' (वन्यजीव) या पदावर बदली झालेले सुनील लिमये.
 
 

 
 

२०१०-११च्या सुमारास बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या संचालक पदावर सुनील लिमये कार्यरत होते. त्यावेळी मानव-बिबट्या संघर्षाचा प्रश्न चिघळण्याच्या वळणावर पोहोचला होता. लिमये यांनी तातडीने काही लोकचळवळी सुरू केल्या. याविषयी माध्यमातील प्रतिनिधींचे प्रबोधन करण्यासाठी त्यांनी एका पत्रकार परिषदेचेही आयोजन केले होते. त्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने 'आम्हाला सांगण्याऐवजी तुम्ही तुमच्या हल्लेखोर बिबट्यांवर नियंत्रण मिळवा,' असा खोचक प्रश्न लिमयेंना विचारला. त्यावर लिमये यांनी देखील, "लेका, मी बिबट्यांना या पत्रकार परिषदेचे आमंत्रण देऊ शकत नसल्यामुळे तुम्हाला माझी बाजू समजावून सांगतोय," असे हजरजबाबी उत्तर दिले. त्यावरुन परिषदेत एकच हशा पिकला. मात्र, लिमये यांचे हे उत्तर मानव-बिबट्या संघर्षाच्या उपययोजनांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. बिबट्या हा प्राणी 'समस्या' नसून आपणच त्याच्या क्षेत्रात वावरताना योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे, ते या उत्तरातून सांगू पाहत होते. लिमये यांच्या जन्म १४ सप्टेंबर, १९६२ साली कोल्हापूरमध्ये झाला. वडील कृषी विभागात कामाला असल्याने कुटंबाचे एका ठिकाणी बस्तान नव्हते. त्यामुळे लिमयेंचे शालेय शिक्षण जळगाव, नाशिक व कोल्हापूर येथे झाले. शालेय जीवनापासूनच त्यांना जंगलाची ओढ होती. पुढे महाविद्यालयीन वयात 'ट्रेकिंग-हायकिंग' केल्यामुळे निसर्गाप्रतीची त्यांची ओढ अधिक घट्ट झाली. त्यावेळी लिमये यांची सैन्यामध्ये भरती होण्याची इच्छा होती. पण, पुढे त्याचे फारसे काही न झाल्यामुळे त्यांनी 'भारतीय वनसेवेत' रुजू होण्याचा प्रयत्न केला. 'युपीएससी'ची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी भारतीय वनसेवेत प्रवेश मिळविला.

 

 
 

लिमये हे १९८८च्या बॅचचे 'आयएफएस' अधिकारी. त्यांनी विज्ञान शाखेतून 'जियोलॉजी' या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 'फॉरेस्ट्री' या विषयातून पदव्युत्तर शिक्षण आणि १९९१ साली डेहराडूनच्या 'भारतीय वन्यजीव संस्थान' मधून 'वाईल्डलाईफ' या विषयामधून 'एमएससी' पूर्ण केले. १९९३ साली लिमये मंत्रालयात 'स्पेशल ड्युटी ऑफिसर' म्हणून कार्यरत होते. त्याचदरम्यान ते कोल्हापूर वन परिक्षेत्राच्या उपवनसंरक्षक (वन्यजीव) या पदावर रुजू झाले. आता हे पद 'मुख्य वनसंरक्षक' या नावाने ओळखले जाते. कोल्हापूरमध्ये कार्यरत असताना त्यांनी राधानगरी, सागरेश्वर आणि कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या वन्यजीव व्यवस्थापनाला शास्त्रीय कामांची जोड दिली. त्यांनी राधानगरी वन्यजीव अभयारण्यात सुरू असणाऱ्या अवैध खाणकामावर बंदी आणली. १९९७ ते २००३ या कालावधीत कोल्हापूर, अलिबाग आणि सातारा वनक्षेत्रात उपवनसंरक्षक पदावर कार्यरत असताना त्यांनी येथील अतिक्रमणावर धडक कारवाई केली. या ठिकाणी साहसी खेळ आणि निसर्ग पर्यटन सुरू करून स्थानिकांना रोजगार निर्माण करून दिला.

 

 
 
 

पुढे 'अतिरिक्त आदिवासी आयुक्त' या पदावर नियुक्ती झाल्यानंतर लिमये यांनी आदिवासी मुले आणि स्त्रियांचे आरोग्य व शिक्षणासंबंधीच्या प्रश्नांवर मूलभूत काम केले. आदिवासी आणि पारधी समाजातील लोकांकरिता रोजगार निर्मितीचे अनेक उपक्रम सुरू केले. मुंबईतील 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या संचालकपदी असलेला त्यांचा कार्यकाळ विशेष करून गाजला. त्यांनी राष्ट्रीय उद्यानाला पोखरणारे मालाड, कांदिवली आणि गोरेगाव येथील अतिक्रमण जमीनदोस्त केले. महत्त्वाचे म्हणजे चिघळत जाणारा मानव-बिबट्या संघर्षाचा प्रश्न थोपविण्यासाठी त्यांनी 'मु्ंबईकर फॉर एसजीएनपी' ही मोहीम सुरू केली. यामध्ये वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे कार्यकर्ते, स्थानिक लोक आणि माध्यमातील प्रतिनिधींना समाविष्ट करून घेण्यात आले. या मोहिमेने मानव-बिबट्या संघर्षाच्या जनजागृतीला नवी दिशा दिली. लिमये यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही मोहीम आजही कार्यरत आहे. या मोहिमेचा आदर्श घेत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल आणि राजस्थान वनविभागाने अशा प्रकारच्या लोकचळवळींना सुरुवात केली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून ते नागपूर येथील 'अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पूर्व' (वन्यजीव) या पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर विदर्भ आणि त्यामधील ताडोबा, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा व बोर या पाच व्याघ्र प्रकल्पांच्या वन्यजीव व्यवस्थापनाची जबाबदारी होती. नुकतीच त्यांची बदली मुंबईतील 'अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्चिम' (वन्यजीव) या पदावर झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वन्यजीव व्यवस्थापन आणि संवर्धनासाठी लिमये आता काम करतील. येत्या सोमवारपासून ते आपला पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या बदलीने पश्चिम वनक्षेत्रात वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. लिमये यांना पुढील वाटचालीसाठी दै. 'मुंबई तरुण भारत'कडून शुभेच्छा!

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 


 
@@AUTHORINFO_V1@@