चमकीच्या प्रकोपाचे निष्पाप बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2019
Total Views |



बिहारमध्ये मुजफ्फरपूर जिल्ह्यात सध्या ‘चमकी’ तापाचा कहर सुरू आहे. यात आतापर्यंत १३६ लहान मुलांचा बळी गेला आहे. यात बिहारच्या १६ जिल्ह्यांत या तापाने ६०० हून अधिक मुले आजारी आहेत. मुझफ्फरपूर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ११७ मृत्यू झाल्याची नोंद आहे. याशिवाय भागलपूर, पूर्वी चंपारण, वैशाली, सीतामरी व समस्तीपूर या जिल्ह्यांमधूनही मुलांचे मृत्यू झाले. या सर्वच प्रकारांत उत्तर प्रदेशमधील आरोग्य विभागाने अतिशय गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले. या निष्पाप मुलांचे बळी जात असताना आरोग्य विभागाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. यामुळेच अनेक लहान मुलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार तब्बल तीन दिवसांनी बालकांची चौकशी करण्यास आले. इतके अंवेदनशील, पाषाण हृदयाचे सरकार असल्यावर सामान्य जनतेने आपले दुःख कुणाला सांगायचे? त्या निष्पाप मुलांच्या मारण्यापेक्षा या उलट्या काळजाच्या आरोग्यमंत्र्याला भारत-पाकिस्तानच्या मॅचच्या स्कोअरची पडली होती. अरे, त्या लहानग्यांच्या मरणाचे दुःख करणाऱ्या त्या आई-बापाला बघून कुणालाही स्वतःचे अश्रू आवरणे कठीण होईल. इतके बळी जाताना काहीतरी धडपड केली का तुम्ही? या भेकड राजकारण्यांच्या बेपर्वाईमुळेच हे सगळं झालं आहे. बिहारमधील ही पहिलीच घटना नाही. या अगोदरही या तापाच्या साथीने अनेक मुलांचे बळी घेतले आहेत. यात मुझफ्फरपूर २०१३ मध्ये १४३ मृत्यू, २०१४ मध्ये ३५५ ,२०१५ मध्ये ११, २०१६ मध्ये चार, २०१७ मध्ये ११ आणि २०१८ मध्ये ७९ अंतर यावर्षी २०१९ मध्ये हा आकडा १३६ आहे. या आकड्यांवरून हा ’चमकी ताप’ पाहिल्यापासूनच इथे थैमान घालत आहे, हे लक्षात येईल. मग इतक्या वर्षांत प्रशासनाने कोणत्याही आरोग्यदायी योजना लहान मुलांसाठी राबविल्याच नाहीत का? राबविल्या असल्यास चमकीसारख्या आजारावर अजूनही आरोग्य यंत्रणेकडे ठोस उपाययोजना का नाहीत? कुपोषण आणि अस्वच्छता याबद्दल जनजागृती अत्यंत महत्त्वाची होती, किंबहुना अजूनही आहे. सरकारने याप्रकरणी योग्य निर्णय घेऊन आरोग्य विभागातील सुविधा आणि उपचार पद्धतीवर काम करणे महत्त्वाचे आहे.

 

ढिसाळ आरोग्य व्यवस्था

 

मुझफ्फरपूर जिल्ह्यातचमकी ताप’ या रोगाची साथ पुन्हा एकदा पसरली आहे. पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण की, गेली अनेक वर्षे हा रोग या भागात थैमान घालतो आहे. अचानक येणारा ताप, त्यानंतर आकडी आणि काही तासांतच मृत्यू असे स्वरूप असलेला हा चमकी ताप म्हणजे मेंदूला सूज येण्याचा आजार. या आजारामागे अनेक कारणे आहेत. कुपोषण, उन्हाचा तडाखा आणि त्यात लिचीसारख्या फळाचे सेवन केल्याने हा रोग बळावतो. या मोसमात या भागात लिचीचे पीक येते. आधीच काही खायला नसल्याने कुपोषित मुले लिचीची फळे खातात. लिचीमधल्या एका घटकामुळे रक्ताची शरीरात साखर ग्रहण करण्याची ताकद कमी होते. आधीच ही मुलं कुपोषित असतात. लिचीमुळे रक्तात साखर कमी उतरते. हे साखर कमी असलेले रक्त मेंदूची साखरेची मागणी पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे मेंदूला सूज येऊन मुलांना आकडी येते. यानंतर मेंदूने आपले काम करण्याचे थांबविल्याने मुलांचा मृत्यू होतो. बिहारच्या या भागात ही साथ पहिल्यांदा आली आहे, असे नाही. याला इथले वातावरणसुद्धा जबाबदार आहे. येथे दिवसभरात सतत ३८ अंशापेक्षा जास्त तापमान आणि बाष्पाचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक वाढते. त्यामुळे या दिवसांत हा रोग बळावताना दिसतोे. आजारी पडलेली मुलं हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी लागणारा वेळ हीदेखील एक चिंतेची बाब आहे. हा ताप सर्वसाधारणपणे संध्याकाळी ४ ते ७ च्या दरम्यान येतो. येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचता-पोहोचता ६ ते ७ तासांचा उशीर झालेला असतो. हाच उशीर रुग्णाच्या जीवावर बेततो. राज्यातील सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचे व्यवस्थापन अत्यंत खराब आहे. इस्पितळात अनेक रुग्णांना सामावण्यासाठी अपुरी जागा, कमी औषधसाठा, कर्मचाऱ्यांची कमतरता या सर्वांमुळेच बालमृत्यू झाले आहेत. यासाठी राज्य सरकारकडून कुपोषण प्रश्नावर ठोस उपाययोजना राबवायला हव्यात. यानंतर आरोग्यसेवेसाठी लागणारे अतिआवश्यक निर्णय घेऊन या आजाराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

 

- कविता भोसले

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@