
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वन विभागाच्या 'अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्चिम' (वन्यजीव) या रिक्त पदावर वनाधिकारी सुनील लिमये यांची बदली झाली आहे. सद्या ते नागपूर येथे 'अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पूर्व' (वन्यजीव) या पदावर कार्यरत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ते मुंबईतील आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. अत्यंत सक्षम आणि धडाडीने काम करणारे अधिकारी म्हणून लिमये सर्वपरिचित आहेत. त्यांच्या बदलीने राज्याच्या पश्चिम वनक्षेत्रात वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या महिन्यामध्ये मुंबईतील 'अप्रर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्चिम' (वन्यजीव) या पदावर कार्यरत असणारे वन अधिकारी एम.के.राव यांची नागपूर येथे बदली झाली होती. त्यामुळे महिन्याभरापासून हे पद रिक्त होते. मात्र या पदावर वन अधिकारी सुनील लिमये यांची पदस्थापना झाल्याचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध झाला आहे. ते नागपूर येथील 'अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पूर्व' (वन्यजीव) या पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे विदर्भ आणि त्यामधील ताडोबा, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा व बोर या पाच व्याघ्र प्रकल्पांच्या वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी होती. आता त्यांची बदली पश्चिम महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनासंबंधीच्या पदावर झाली आहे. लिमये यांच्या गाठीशी वन सेेवेत काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या संचालकपदी काम केले आहे.
लिमये हे १९८८ सालच्या बॅचचे 'आयएफएस' अधिकारी आहेत. त्यांनी विज्ञान शाखेतून 'जियोलाॅजी' या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर 'फाॅरेस्ट्री' या विषयातूून पदव्युत्तर शिक्षण आणि १९९१ साली देहरादूनच्या 'भारतीय वन्यजीव संस्थान' मधून 'वाईल्डलाईफ' या विषयामधून 'एमएससी' पूर्ण केले. १९९३ साली लिमये मंत्रालयात 'स्पेशल ड्युटी आॅफिसर' म्हणून कार्यरत होते. त्याचदरम्यान ते कोल्हापूर वन परिक्षेत्राच्या उपवनसंरक्षक (वन्यजीव) या पदावर रुजू झाले. आता हे पद 'मुख्य वनसंरक्षक' या नावाने ओळखले जाते. कोल्हापूर मध्ये कार्यरत असताना त्यांनी राधानगरी, सागरेश्वर आणि कोयना अभ्ययारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील वन्यजीव संवर्धनाला शास्त्रीय कामांची जोड दिली. त्यांनी राधानगरी वन्यजीव अभयारण्यात सुरू असणाऱ्या अवैध्य खाणकामावर बंदी आणली. १९९७ ते २००३ या कालावधीत कोल्हापूर, अलिबाग आणि सातारा वनक्षेत्रात उपवनसंरक्षक पदावर कार्यरत असताना त्यांनी येथील अतिक्रमणावर धडक कारवाई केली होती. 'अतिरिक्त आदिवासी आयुक्त' या पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आदिवासी मुले आणि स्त्रीयांचे आरोग्य व शिक्षणासंबंधीच्या प्रश्नांवर मुलभूत काम केले.
वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...
facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat