काशी विश्वनाथ कॉरिडोर येथे मोक्ष केंद्र स्थापणार

    20-Jun-2019
Total Views |
 

वाराणासी : भारतीय संस्कृतीचा वारसा असणाऱ्या वाराणसी या प्रमुख शहराला हिंदू धर्मात वेगळी मान्यता प्राप्त आहे. गंगेच्या काठावर प्राण त्याग करणाऱ्याला मोक्ष प्राप्ती होते आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्याची मुक्तता होते, अशी इथे भेट देणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे. देशभरातील भाविक आपल्या अखेरचा काळ इथल्या मोक्ष केंद्रात घालवतात. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेत, केंद्र सरकार आता काशी विश्वनाथ कॉरिडोर येथे अत्याधूनिक मोक्ष केंद्र स्थापन करणार आहे. यासाठी ६८३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात असलेल्या या शहरात खासदारकीच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी काशी-विश्वनाथ कॉरिडोअर प्रकल्पाचे भूमीपूजन केले होते. मोक्ष केंद्रात राहणाऱ्यांची संख्या आणि त्यासाठी येणाऱ्या अर्जांची संख्या लक्षात घेता वाराणसी येथे मोक्ष केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. काशी विश्वनाथ कॉरीडोअर प्रकल्पाअंतर्गत ही केंद्र स्थापित करण्यात येणार आहेत. महिला आणि पुरुषांना राहण्यासाठी समसमान केंद्र येथे असणार आहेत.

 

काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीतील मोक्ष केंद्र हे दाम्पत्यासाठी आहे. मात्र, काही लोक वृद्धावस्थेत असणाऱ्यांना यात सहभागी होता येत नाही. नव्याने निर्माण केल्या जाणाऱ्या मोक्ष भवनात असा कोणताही नियम असणार नाही. हे मोक्ष केंद्र काशीविश्वनाथ मंदिर आणि मणिकर्णिका येथे निर्माण केले जाणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat