सेनापती राधेय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2019
Total Views |


 


भीष्म आणि द्रोण प्राण पणाला लावून लढले, पण त्या दोघांचाही अन्यायकारकरीत्या वध झाला. ते नि:शस्त्र असताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्या दोघांना पांडवप्रिय होते आणि पांडवांना इजा व्हावी, अशी त्यांची इच्छा नव्हती.



 
 

युद्धाच्या पंधराव्या दिवशी सेनापती द्रोण यांचे निधन झाले होते. कौरवांसाठी ही अतिशय दु:खद घटना होती. त्या रात्री कौरवांच्या शिबिरात सभा भरली आणि दुर्योधनाने सर्वांनाच हा प्रश्न केला की, “आता या संकटातून पुढे कसे जाता येईल?” अश्वत्थामा सरसावून म्हणाला, “दुर्योधना, तुझ्यावर प्रेम करणारा, आम्हा सर्वांना समजून घेणारा, कर्तबगार, समर्थ, असा सेनापती आम्हाला हवा आहे. तोच तुला विजय मिळवून देईल. इथे जमलेले सारे योद्धे तसे योग्य आहेतच, पण माझ्या मते राधेय जर सेनापती झाला तर विजय आपलाच आहे. राधेय अजिंक्य आहे.” त्याची ही सूचना दुर्योधनाला खूप आवडली. आता दुर्योधनाने आपल्या सर्व आशा राधेयवर केंद्रित केल्या. तो त्याला म्हणाला की, “राधेया, तू थोर योद्धा आहेस, हे मी जाणतो आणि माझ्याविषयी तुझ्या मनात अपार प्रेम आहे, हेसुद्धा मला माहिती आहे. या संकटातून आता तूच आम्हाला पुढे नेशील, अशी माझी खात्री आहे. भीष्म आणि द्रोण प्राण पणाला लावून लढले, पण त्या दोघांचाही अन्यायकारकरीत्या वध झाला. ते नि:शस्त्र असताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्या दोघांना पांडवप्रिय होते आणि पांडवांना इजा व्हावी, अशी त्यांची इच्छा नव्हती. द्रोणांचे तर अर्जुनावर खूपच प्रेम होते. परंतु, तू तसा नाहीस. या युद्धात प्रथमच असा माणूस मला मिळतो आहे, जो माझ्याइतकाच पांडवांचा द्वेष करतो. तू सेनापती होऊन आम्हाला विजय मिळवून दे, अशी मी तुला विनंती करतो आणि ही मोठी जबाबदारी तुझ्यावर टाकतो.” दुर्योधनाचे हे बोलणे ऐकून राधेयला खूपच आनंद झाला. आपल्यावरील दुर्योधनाचे प्रेमाचे ऋण फेडण्याची संधी आता मिळत आहे म्हणून तो मनातून खूप सुखावला. तो म्हणाला, “महाराज, तुमची अशी सेवा करण्याची संधी मला प्राप्त होते आहे याहून अधिक चांगली गोष्ट नाही. उद्या मी युद्धात अर्जुनाचा वध करून हे जग तुमच्या चरणाशी आणून ठेवीन. त्या सर्वांशी युद्ध करण्यास आणि अर्जुनाचा वध करण्यास मी खूप उत्सुक आहे. मी हे नक्कीच करू शकेन, अशी मला खात्री आहे.”

 

 
 

दुर्योधनाने जाहीर केले की, आजपासून राधेय हा कौरवांच्या सैन्याचे सेनापतिपद भूषवेल. यासाठी त्याच्यावर अभिषेक करण्यात आला. कौरवांच्या सैन्यात उत्साह पसरला. आनंद द्विगुणित झाला. दुर्योधनालातर सर्व जग मुठीत आल्यासारखे वाटत होते. सोळाव्या दिवशी राधेय अग्रभागी होता. नुकत्याच उदय पावलेल्या सूर्यासारखा तो तेज:पुंज भासत होता. त्याने ‘मकरव्यूह’ रचला होता. ‘मकरव्यूहा’च्या तोंडाशी स्वत: राधेय होता, शकुनी आणि त्याचा मुलगा उलूक हे मकरव्यूहाच्या दोन डोळ्यांजागी आणि डोक्याच्या जागी अश्वत्थामा होता. दुर्योधन मकराच्या केंद्रस्थानी होता. डाव्या पुढच्या पायाशी कृतवर्मा आणि उजव्या पुढच्या पायाशी राधेयपुत्र सुसेन होता. मागील डाव्या पायशी शल्य होता, तर मागच्या उजव्या पायाशी कृप होते. युधिष्ठिराने अर्जुनाला सांगितले की, “कौरवांचे सैन्य आता खूप रोडावल्यासारखे भासत आहे. त्यांना भीती वाटावी असा फक्त एकच योद्धा आहे तो म्हणजे राधेय ! तू जर त्याचा वध केलास तर विजय आपलाच आहे.” अर्जुनाने आपले सैन्य ‘चंद्रकोरी’त उभे केले होते. डाव्या टोकास भीम आणि उजव्या टोकास धृष्टद्युम्न होता. केंद्रस्थानी अर्जुन व त्याच्या पाठीशी युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव होते. दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली. भीमाने क्षेमधृती या मदोन्मत्त राजाला ठार केले. राधेय कडाडून पांडवांवर चालून आला. त्याला नकुलाने आव्हान दिले.

 

- सुरेश कुळकर्णी

  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@