क्रिकेट अफगाणचे, संधी भारताची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2019   
Total Views |



मागील आठवड्यात विश्वचषकाच्या सराव सामन्यावेळी अफगाण संघाने पाकचा पराभव केला असता अफगाणी नागरिकांनी घराबाहेर येत बंदुकीच्या फैरी हवेत झाडत आपला आनंद साजरा केला. अफगाणी नागरिक पाकला त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि राजकीय शत्रू मानत असल्याने पाकवरील सराव सामन्याचा विजयदेखील त्यांच्यासाठी महत्त्वाचा आणि मोलाचा ठरला आहे.


भारतात अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा खेळ म्हणजे क्रिकेट विश्वचषक २०१९ला नुकतीच मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. जागतिक स्तरावरील पारंपरिक संघ आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी यांची होणारी भिडंत हा तर या स्पर्धेतील कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असणारा मुद्दा. विश्वचषक नाही जिंकला तरी चालेल, मात्र पाकिस्तानला हरवले पाहिजेच किंवा पाकला हरवले यातच विश्वचषक जिंकला, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया भारतात आपण दर चार वर्षांनी नेहमीच ऐकत असतो. यंदाच्या विश्वचषकात पाक आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे आणि त्याला मैदानावर पराभूत करणे म्हणजे रणांगणावर पराभूत केल्यासारखेच आहे, अशी धारणा घेऊन अजून एक संघ सामील झाला आहे आणि तो म्हणजे अफगाणिस्तान. भौगोलिकदृष्ट्या पाक आणि भारत यांचा शेजारी देश असे अफगणिस्तानचे स्थान आहे. अंतर्गत अशांतता, तालिबानी राजवट, मानवी मूल्यांची अवहेलना होईल, असे तालिबानी कायदे यांच्या सावटाखाली अफगाणिस्तान गेले काही वर्ष होता. अमेरिकेने आपले घराचे अंगण समजून येथे ९/११ च्या घटनेनंतर घातलेला हैदोस जगाने अनुभवला आहेच. अशा सर्व स्थित्यंतरांचा सामना करत अफगाणिस्तानने स्वतःच्या हिमतीवर आपला विकास साधण्याचे धोरण सध्या अवलंबिले आहे. मानवी हृदय हेलावून टाकणाऱ्या घडमोडींचा सामना केल्यावर नवी आशा, नवी दिशा उराशी बाळगून सध्या मार्गस्थ होत असलेल्या अफगाणी नागरिकांसाठी विरंगुळ्याचा आणि ब्रह्मानंदी आनंदाची अनुभूती देणारा विषय म्हणून क्रिकेट समोर येत आहे.

 

गेल्या काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिजावर अफगाण क्रिकेट संघाचा उदय झाला. पदार्पणातच पठाणी कडवी झुंज देत या संघाने जागतिक क्रिकेट विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडले. मागील आठवड्यात विश्वचषकाच्या सराव सामन्यावेळी अफगाण संघाने पाकचा पराभव केला असता अफगाणी नागरिकांनी घराबाहेर येत बंदुकीच्या फैरी हवेत झाडत आपला आनंद साजरा केला. अफगाणी नागरिक पाकला त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि राजकीय शत्रू मानत असल्याने पाकवरील सराव सामन्याचा विजयदेखील त्यांच्यासाठी महत्त्वाचा आणि मोलाचा ठरला आहे. या सराव सामन्यात का होईना प्राप्त झालेल्या यशप्राप्तीमागे दोन महत्त्वाची कारणे दिसून येतात. त्यातील १) अफगाण नागरिकांनी अतिशय गांभीर्याने घेतलेला क्रिकेट हा खेळ आणि त्याचे आत्मसात केलेले तंत्र आणि २) जागतिक पटलावर आपले नाव कायम असावे आणि जगाच्या नजरेत आपण विस्मृतीत जाऊ नये यासाठी क्रिकेटला दिलेले महत्त्व. “अफगाण संघाने फक्त विजयच नव्हे, तर आमच्या संघाने प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत भरीव कामगिरी केली तरीही संपूर्ण देशाचा उर अभिमानाने भरून येतो,” अशा शब्दांत अफगाणी नागरिकांनी व्यक्त केलेली ही भावना याचेच द्योतक आहे, असे वाटते. तसेच अफगाणी नागरिकांच्या दृष्टीने पाकवरील विजय हा जास्त महत्त्वाचा आहे. कारण त्यांच्या मते, अफगाणिस्तानातील सुरक्षा आणि आर्थिक संकटास सर्वस्वी शेजारी देश पाकिस्तान कारणीभूत आहे.

 

अफगाणिस्तानचा हा विजय आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची घटना म्हणूनदेखील पाहण्याचा विषय ठरू शकतो. केवळ सराव सामन्यात पाकवर विजय मिळवला तर अफगाण नागरिक आनंद साजरा करतात. याचा अर्थ अफगाणी नागरिकांच्या मनात पाकबद्दल द्वेष किती ठासून भरला आहे, याचेच हे द्योतक आहे. भारतासारख्या देशासाठी ही नक्कीच एक संधी आहे. कारण दोन्ही देशांच्या सीमा भारताला लागून आहेत. तसेच, पाक व अफगाण यांच्यादेखील सीमा एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे पाकच्या नापाक इराद्यांना भविष्यात तोंड देण्यासाठी अफगाण भूमीचा वापर नक्कीच करता येऊ शकतो. तसेच, पाकच्या दोन्ही बाजूला त्याचे शत्रूराष्ट्र असल्याने पाकची कोंडी करणे आणि त्याला पळता भुई थोडी करण्याची नीती आखण्याकरिता ही घटना निश्चितच बोलकी ठरू शकते. हा जरी एक खेळच असला तरी, त्याबाबत उमटणारी प्रतिक्रिया ही नवीन राजकीय समीकरणांची बिजे ठरू शकतात. फक्त संधी शोधता येणे आवश्यक आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@