
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित वादग्रस्त तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून तेथे या प्रस्तावित प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. सौदी अरेबियाची अरमाको, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहभागातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात नाणार, सागवे, कात्रादेवी परिसरात आशियातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरणाचा तीन लाख कोटींचा भव्य प्रकल्प होणार होता. पण नाणार येथील स्थानिक लोकांच्या विरोधामुळे हा महातेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडाला हलवण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात या प्रकल्पाला स्थानिकांचा कोणताही विरोध नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लेखी उत्तराच्या माध्यमातून दिली.
तेलशुद्धीकरण प्रकल्पाला प्रस्तावित ठिकाणी अर्थात रायगडमध्ये स्थानिकांचा विरोध आहे का? असा तारांकित प्रश्न काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन चार या तालुक्यांमधील ४० गावातील सुमारे १३ हजार ४०९ हेक्टर जमिनीवर एकात्मिक औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा सिडकोचा मानस आहे. तसेच या भागाच्या औद्योगिक विकासासाठी सिडकोची नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यानी लेखी उत्तरात नमूद केले आहे.
विकास प्राधिकरणांतर्गत अधिसूचित जामिनीच्या भूसंपादनच्या अनुषंगाने भूमी अभिलेख जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयाकडून सिडकोने कागदपत्रे मागवली होती. यात ४० गावातील ग्रामस्थांनी औद्योगिक प्रकल्पाला कोणताही विरोध केल्याची बाब निदर्शनाला आली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या अधिवेशनात तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी नाणारमध्ये अधिग्रहीत करण्यात आलेल्या जमिनीचे भूसंपादन रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat