दादा एक गुड न्युज आहे !

    19-Jun-2019
Total Views |



भाऊ बहिणीला आणि बहीण भावाला एकमेकांना आई बापाच्या जागेवरचे असतात. बहीण ही भावासाठी दुसरी आई आणि बहिणीसाठी भाऊ दुसरा बापचं.


बहीण भावाचं नातं हे नेमकं काय असतं ? ते कसं असतं ? कसं दोघांच्या मनामध्ये येऊन आयुष्यभरासाठी अलगद येऊन बसतं. हे नातं किती नाजूक असतं. किती गोड असतं. त्याला कशी आनंदाची जोड असते. प्रत्येक वेळोवेळी त्याला वेगळेवेगळे मोड असतात. भाऊ बहिणीला आणि बहीण भावाला एकमेकांना आई बापाच्या जागेवरचे असतात. बहीण ही भावासाठी दुसरी आई आणि बहिणीसाठी भाऊ दुसरा बापचं. दादा एक गुड न्यूज आहे! या नाटकात ही असंच हटके नातं भाऊ बहिणीचं दाखवण्यात आलंय जे की सध्या हारवत चाललंय. विनीत म्हणजेच उमेश कामत हा घरच्यांच्या म्हणजे वडिलांच्या सोबत झालेल्या वादावादी किंवा न पटणाऱ्या स्वाभाविक वातावरणामुळे तो २० व्या वर्षीच घर सोडून मिथिला (आरती मोरे) नावाच्या त्याच्या मैत्रिणीच्या घरी भाड्याने राहत असतो. एक दिवस मन्या (ऋता दुर्गुळे ) ही अचानक भावाच्या घरी येते. व भावाला म्हणजेच विनीत ला प्रेग्नेंट आहे असं कळवते. ऐन तारुण्यात ज्या बहिणीला शिकण्याची, सुधारण्याची खरी गरज आहे तिच्या बाबतीत असं घडलेलं ऐकून विनीत व मिथिला ची भलतीच तारांबळ उडते. घरचे काय म्हणतील ? लोक काय म्हणतील ? समाजाचं काय ? असे अनेक गोष्टींची विनितला भीती वाटते. नंतर मन्या ज्या मुला मुळे प्रेग्नेंट झाली त्याला घरी घेऊन येते. त्याचं नाव बॉबी (ऋषी मनोहर) हा नंतर त्याच्या घरच्यांना समजल्यानंतर तिथंच विनीत च्या घरी राहतो. मिथिला ही तिथेच शेजारी अपार्टमेंट मध्ये राहत असते. मिथिला ला विनीत खूप आवडतं असतो. मग मन्या च्या अंगावर आलेलं हे अवकाळी ओझं ! बॉबी-मन्या ह्या दोघांनी विनीत च्याच घरी राहणं. मिथिला चं विनीत ची जवळीक नकळतपणे वाढणं. विनितला बहिणीची काळजी वाटणं. जुन्या आठवणी नव्या आठवणीत साठवणं. अश्या निरागसता भावनेनं रंगभूमीवर आलेलं एक उत्तम नाटक आहे. या नाटकात एकूण चार पात्र आहेत. चारही पात्रांची कामे खुप सटल झाली. उमेश कामतने वेगळ्या धाटणीचा भाऊ साकारला. त्याची भूमिका पाहून भावानं किती गोड, समजून-उमजून घेणारा, मदतीला बाप बनून धावून जाणारा आणि अश्या कित्येक व्याख्येत न मावणारा भाऊ उमेश कामत ह्या अभिनेत्यांन उत्तम वठवला.

 

मिथिलाचं पात्र आरती मोरे ,बॉबी चं पात्र ऋषी मनोहर आणि बहिणीचं पात्र ऋता दुर्गुळे या सर्वांनी खूप निरीक्षण, समजूतदारपणे आणि भूमिकेचा अभ्यास करून ही पात्र रंगमंचावर सादर केलीत.पण फक्त मिथिला च्या पात्राची भूमिका करणारी अभिनेत्री चांगलं काम करतेच पण तिच्या बॉडी लँग्वेज ने समर्पक वाटत नाही. नेपथ्य हे नाटकाच्या कथेच्या स्थळाला पूर्णपणे न्याय देतं. नाटक हे निरागस विनोदी पद्धतीने रंगमंचावर आणलेली कलाकृती आहे.फक्त विनोदपद्धत वापरताना काही वेळा कलाकार जाऊन बुजून विनोद निर्माण करतात की काय ? असं ही वाटत होतं. हे वजा केलं तर बाकी नाटक लेखन ,दिग्दर्शन ,नेपथ्य ,अभिनय, प्रकाश योजना या सर्वच अंगानी पूर्णपणे जोरकस रित्या रंगमंचावर सादर होत आहे. कल्याणी पठारे या लेखिकेनं लिहिलेलं हे छान निरागस विनोदबुद्धीने साकारलेलं नाटक खऱ्या रूपांनं रंगभूमीवर वेगळा विषय म्हणून सध्या गाजत आहे. अद्वैत दादरकर यांचं दिग्दर्शन ही खूप साधं सरळ ,निरागस,आणि तितकंच उत्तम आहे. emotional attachment वापरून उभा केलेलं नाटक हे नाट्यसृष्टीला व प्रेक्षकांना खूप काही देणं लागत आहे. प्रिया बापट यांच्या सोनल प्रॉडक्शन ने ह्या नाटकाची निर्मित केली आहे. संस्कृती कलादर्पण, व्यवसायीक राज्यनाट्य स्पर्धा, झी, मटा गौरव सन्मान ही ह्या नाटकाला मिळालेला आहे. बहीण भावाच्या प्रेमळ ,निरागस नात्यावर हलकं फुलक्या पद्धतीने भाष्य करणाऱ्या "दादा एक गुड न्यूज आहे !" या नाटकाला पाहायला सर्वांनी नक्की जा. नात्याचं गोतं फाटकं पोतं होण्यापासून वाचवण्यासाठी हे नाटक नक्की पहा.

 

लेखक - कृष्णा विलास वाळके

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat