पटणा : बिहारच्या मुझफ्फर आणि नजीकच्या परिसरात चमकी तापाने मृत झालेल्या मुलांचा आकडा ११२ वर पोहोचला आहे. मात्र, राष्ट्रीय जनता दलाचे नेता आणि माजी मुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेपासून दूरच आहेत. बिहारमध्ये सुरू असलेल्या मृत्यूच्या थैमानात त्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, पक्षातील अन्य नेत्यांनी त्यांच्याबद्दल माहीती नसल्याची प्रतिक्रीया दिली आहे. वरिष्ठ नेते रघुवंश प्रसाद यांनी सांगितले कि ते कदाचित विश्वचषक पाहायला गेले असावेत.
रघुवंश प्रसाद यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहीतीनुसार, त्यांना तेजस्वी यादव कुठे आहेत, याबद्दल त्यांना ठोस माहीती नाही. कदाचित ते क्रिकेट विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी गेले असावेत. मात्र, त्याबद्दलही त्यांना पूर्ण माहीत नसल्याचे ते म्हणाले. राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे उत्तराधिकारी मानले जाणारे तेजस्वी यादव हे लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर सार्वजनिकपणे कुठेही फिरकलेले नाहीत.
२८ मे रोजी तेजस्वी त्यांच्या मातोश्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी लोकसभा निवडणूकीतील पराभवानंतर चिंतन बैठकीला उपस्थित होते. मात्र, त्यानंतर ते दिसले नाहीत. २ जून रोजी राबडी देवी यांनी ठेवलेल्या इफ्तार पार्टीलाही ते उपस्थित नव्हते. ११ जून रोजी लालूप्रसाद यादव यांच्या जन्मदिनालाही ते उपस्थित नव्हते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat