'मोहम्मद मोर्सी' - असंतोषाचा बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2019   
Total Views |



२०११ साली इजिप्तमध्ये क्रांती झाल्यानंतर लोकशाही मार्गाने निवडून आलेले पहिले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांना जनमत मिळूनही न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या. नेमका हा कोणता संघर्ष होता? हे समजून घेणं गरजेचं आहे.


जगातील सर्वांत प्राचीन लोकसंस्कृती असलेल्या इजिप्तमध्ये नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली. इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे न्यायालयातील सुनावणीदरम्यानच निधन झाल्याची बातमी येऊन धडकली. मोर्सी न्यायालयीन सुनावणीसाठी न्यायालयात दाखल झाले होते. या सुनावणीनंतर मोर्सी यांना भोवळ येऊन ते न्यायालयातच बेशुद्ध पडले व त्यांचा मृत्यू झाला. २०११ साली इजिप्तमध्ये क्रांती झाल्यानंतर लोकशाही मार्गाने निवडून आलेले पहिले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचा अशाप्रकारे करुण अंत झाला. नेमकं काय कारण होतं की, मोर्सी यांना जनमत मिळूनही न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या. नेमका हा कोणता संघर्ष होता? हे समजून घेणं गरजेचं आहे.

 

एककेंद्री सत्ता व जुलमी राजवटीला कंटाळून इजिप्तमध्ये २०११ साली मोठा जनक्षोभ उफाळून आला. इजिप्तमधील ऐतिहासिक 'तेहरीर' चौकात लाखो लोकांनी देशहितासाठी व नागरिकांच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी एकजूट दाखवत हुकूमशहा होस्नी मुबारक यांना सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडले. तब्बल तीन दशकं होस्नी मुबारकने इजिप्तवर आपली सत्ता गाजवली. इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अन्वर अल सादात यांची १९८१ मध्ये हत्या झाल्यानंतर होस्नी मुबारक यांनी सत्तेची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. त्यानंतर २०११ पर्यंत होस्नी मुबारकने लष्कराच्या जोरावर इजिप्तमधील सत्ताकेंद्रे स्वतःभोवती ठेवली. होस्नी मुबारकनंतर इजिप्तमध्ये प्रथमच निवडणुका झाल्या आणि २९ मार्च, २०१२ साली मोर्सी यांनी तेहरीर चौकातल्या लाखो जनतेसमोर राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. मोर्सी यांचा हा प्रवास खरंच अपघात मानावा लागेल. कारण, मोर्सी यांचे सहकारी व 'मुस्लीम ब्रदरहूड' या धर्मांध संघटनेचे नेते खैरात एल-शातर यांना इजिप्तच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविल्याने मोर्सी यांची राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वर्णी लागली. कोणताही निवडणुकीचा पूर्वानुभव नसताना येथील जनतेने मोर्सींना आपला नेता मानत विजयी केले. मोर्सींनीही शपथ घेताना, आपण धर्मनिरपेक्षतावादी विचारांचा पाठपुरावा करत लोकहिताचा कारभार करू, लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करू, अशी ग्वाही दिली. विशेष म्हणजे, ही शपथ घेताना मोर्सी बुलेटप्रूफ जॅकेट न घालता जनतेला सामोरे गेले. देशाचा पूर्व हुकूमशहा होस्नी मुबारक हा बुलेटप्रूफ जॅकेटशिवाय बाहेर पडत नसे. त्यामुळे मोर्सींच्या या पहिल्याच कृतीने लोकांची मने जिंकली. देशात लोकहितवादी सरकार येईल आणि काहीतरी वेगळी क्रांती घडेल, असे वाटत असतानाच मात्र धर्मांध संघटनेचे नेते असलेल्या मोर्सिींनी लोकअपेक्षांना पायदळी तुडविण्यास सुरुवात करत लष्कराच्या मदतीने सत्ता अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला.

 

लोकशाही मार्गाने निवडून आल्यावर सत्तेचा अमर्याद वापर करीत हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करणाऱ्या मोर्सीं विरोधात इजिप्तच्या नागरिकांची तळपायाची आग मस्तकात गेली. इजिप्तच्या चौकाचौकात मोर्सींविरुद्ध निदर्शने करण्यासाठी लोक पुन्हा रस्त्यावर उतरले, पुन्हा तेहरीर चौक निदर्शकांच्या घोषणांनी दणाणून गेला. २०११च्या जनक्षोभापेक्षाही २०१३चा जनक्षोभ अधिक तीव्र होता. अखेर लष्कराने पुन्हा एकदा पुढाकार घेत मोर्सींना नजरकैदेत ठेवत देशाची सूत्रे आपल्या हातात ठेवली. मोर्सींच्या अटकेनंतर त्यांच्या व 'मुस्लीम ब्रदरहूड'च्या समर्थकांविरोधात लष्कराने मोहीम हाती घेतली. यानंतर मोर्सींसह त्यांच्या समर्थकांविरुद्ध न्यायालयात खटला चालवला गेला. तुरुंग फोडून कैद्यांना मुक्त करणे, पॅलेस्टाईनमधील मुस्लीम गट 'हमास'साठी हेरगिरी करणे, 'हमास', 'हिजबुल्ला' आणि अन्य दहशतवादी संघटनांच्या मदतीने इजिप्तमध्ये दहशतवाद पसरविणे, दहशतवादी संघटनांना अर्थसाहाय्य करणे, 'ब्रदरहूड'चे आंतरराष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लष्करी प्रशिक्षण यंत्रणेचा वापर करणे व सार्वजनिक संपत्तीची नासधूस करणे, असा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होता. यानंतर त्यांच्यासह १०४ जणांना देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तेव्हापासून अगदी कालपर्यंत मोर्सींची मृत्यूशी झुंज सुरूच होती. मात्र, त्यांच्या मुलाने व 'मुस्लीम ब्रदरहूड' पक्षाने त्यांचा मृत्यू झाला नसून त्यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. यामागील सत्य लवकरचं समोर आलं तरी जनतेचा अपेक्षाभंग हा पर्यायाने सत्ताच्युत करुन जातो, हेच खरं.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@