मराठी शाळा टिकवण्यासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2019   
Total Views |




आज मराठी माध्यमाच्या शाळा दुर्दैवाने ओस पडत असताना, ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’च्या प्राथमिक विभागाचे(मराठी माध्यम) प्रवेश ‘फुल्ल’ झाले आहेत. याचे कारण काय? तर शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तसेच शालेय समितीच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी राबवलेल्या सतत नावीन्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजना. दि. १८ जून रोजी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, शाळेची बॅग, शालेय साहित्य, वॉटर बॅग, टिफीन वाटप करण्यात आले. कशासाठी? तर विद्यार्थ्यांनी शाळेत यावे, मराठी भाषेतून शिक्षण घ्यावे यासाठी. हे सर्व साहित्य ‘हावरे प्रॉपर्टीज’ने शाळेला दिले होते. या कार्यक्रमाला ‘डेली बजार, खारघर’च्या एमडी नलिनी हावरे आणि ‘हावरे प्रॉपर्टीज’चे सीईओ आणि जॉईन्ट एमडी अमित हावरे उपस्थित होते. श्रीमंत असे मानवी संस्कार अत्यंत आपुलकीने आणि साधेपणाने कसे देता येतील, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम होता.

 

एक लहान मुलगा होता. त्याचे आजोबा काहीतरी लिहीत होते. तुमचे आजी-आजोबा तुम्हाला गोष्ट सांगतात की नाही? सांगतात ना? तसेच ते आजोबाही गोष्ट सांगत असतील. म्हणून मग तो छोटू आजोबांना विचारतो, “आजोबा खरं सांगा, तुम्ही माझ्यासाठी गोष्ट लिहिता ना?” आजोबा क्षणभर थांबून हसतात आणि म्हणतात, “गोष्ट तर आहेच, पण या ‘पेन्सिलची गोष्ट.’ ” असे म्हणून ती पेन्सिल ते नातवाला दाखवतात. ते म्हणतात, “ही जी पेन्सिल आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. तुला माहिती आहे का? पेन्सिलची गोष्ट? बाळा, पेन्सिलला ‘शार्प’ करण्यासाठी कशाचा वापर करतो? ‘शार्पनर.’ ज्यावेळी पेन्सिल थकते, लिहू शकत नाही, त्यावेळी थांबून त्या पेन्सिलला ‘शार्प’ करावे लागते, तसेच आपलेही आहे. थकलो, तर थांबून आपली शक्ती, सकारात्मक विचार वाढवायला हवेत. बरं, या पेन्सिलने काही चुकीचे लिहिले, नको असलेले लिहिले तर आपण काय करतो? ते रबरने खोडतो ना? तसेच आयुष्यात काही चुकले, तर ती चूकही दुरुस्त करायची.

 

तिसरे असे की, बाहेरून पेन्सिल कशीही असली तरी, ती लिहिते तिच्यात असणार्‍या शिशामुळे. ते आत असते. त्यामुळे माणसाने बाह्यरंगरूपापेक्षा अंतर्मनाच्या विकासाला महत्त्व दिले पाहिजे. कारण, ते आतील आहे म्हणून बाहेरच्या रंगरूपाला महत्त्व आहे. चौथे पेन्सिल पुढे पुढे चालताना आपली निशाणी उमटवत जाते. ती आपल्याला काय सांगते की, माणसाने पुुढे पुढे जाताना आपल्या कार्याचा अस्तित्वाचा ठसा उमटवला पाहिजे. तो ठसा समाज आणि देशाच्या विकासासाठीचा असावा. सर्वात महत्वाचे आणि पाचवे पेन्सिल काही स्वत:हून लिहीत नसते. तिच्यापाठी हात असतो. तसेच माणसाच्या चांगल्या कृत्यापाठी परमेश्वर ठाम उभा असतो. श्रद्धा सबुरीचा संदेश देत आपण सकारात्मक काम करत राहायचे. तर अशी ही ‘पेन्सिलची गोष्ट.’ पेन्सिल जर असे वागत असेल, तर आपण पण असे वागू शकतो ना?,” ‘हावरे प्रॉपर्टीज’चे सीईओ आणि जॉईन्ट एमडी अमित हावरेंनी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. त्याबरोबर ‘हो...’ असा जयघोषच शेकडो विद्यार्थ्यांनी आणि अनाहूतपणे त्यांच्या पालकांनीही केला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात मुलांना मार्गदर्शन करताना अमित हावरे बोलत होते.

 


तर याच कार्यक्रमातडेली बजार, खारघर’च्या एमडी नलिनी हावरे यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनी मांडलेल्या मनोगताने त्यांचे व्यक्तिमत्त्व नकळत उलगडत गेले. म्हटले तर, ते मनोगत एका सुसंस्कृत मराठी आईचे होते; म्हटले तर, ते मनोगत एका यशस्वी उद्योगिनीचे होते. समोर बसलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या मातांना नलिनी म्हणाल्या की, “तुम्हाला एक विनंती आहे. मुलांना पिझ्झा, वडापाव, भेळ नका गं देऊ. घरची पोळी-भाजी उत्तम. डब्ब्यात आपली साधी पोळी-भाजी द्या. घरचे साधे सात्त्विक अन्न मनामध्ये सकारात्मकता निर्माण करते. बरं, मुलांना वेळ घालवण्यासाठी काय करता? सांगा?” यावर समोरच्या पालकांनी ‘मोबाईल देतो,’ असे एकासुरात सांगितले. नलिनी म्हणाल्या, “मुलं लहान आहेत, त्यांचे वय खेळण्याबागडण्याचे आहे. त्यांना मैदानात न्या, खेळू द्या. काहीच नाही तर त्यांच्याशी गप्पा मारा. संवाद साधा. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी असे घडवले. तुम्ही जिजाऊंच्या वंशज आहात. मुलांना आपणच घडवणार. आपल्या वेळी आपण काय करायचो, मोठ्या भावंडांचे कपडे लहान भावंडं घालायचो, शाळेचे दप्तर, पुस्तकंही एकमेकांची वापरायचो. ते आता होते का?” यावर समोरच्या पालक महिलांनी नकारार्थी माना डोलावल्या. मात्र, त्या सगळ्याजणींच्या चेहर्‍यांवर त्यांच्या बालपणीच्या आठवणी झळकत होत्या. कित्येक जणींना वाटले, आपणही शालेय साहित्याचा वापर जपून करण्याचे संस्कार मुलांवर करू शकतो.

 

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे प्रधान कार्यवाह मोहन ढवळीकर, शालेय समितीच्या अध्यक्षा भूषणा पाठारे आणि सहकार्यवाह अरुणा शिकारखाने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवणारे शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे यांनी येणार्‍या काळात शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काय उपक्रम केले जाणार आहेत याची माहिती दिली. मराठी भाषा जगण्यासाठी मराठी माध्यमांच्या शाळा जगल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत. त्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी यायला हवेत, असे आग्रहपूर्ण म्हटले. एकंदर हा कार्यक्रम म्हणजे ‘हावरे प्रॉपटीर्र्ज’चा विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम होता. मात्र, त्या अनुषंगाने विद्यार्थी आणि पालकांचे, शाळेच्या सर्व पदाधिकार्‍यांचे स्नेहमिलनही होते.

 

शाळेच्या विद्यार्थ्यांना हे असे मोफत साहित्य वाटप का? यावर विठ्ठल कांबळे म्हणाले की, “मराठी भाषा टिकण्यासाठी मराठी शाळेची पटसंख्या वाढायला हवी, असा आमच्या शाळेतील सर्वांचा ध्यास. मुलांना शाळेत येण्यास आवडेल, असे अभ्यासक्रमाव्यतिरीक्त उपक्रम तर आम्ही सुरू केलेच, पण अभ्यासक्रमसुद्धा अशा पद्धतीने शिकवण्यास सुरुवात केली की, मुलांना मनापासून अभ्यास करायला आवडेल. ही शाळा आपली आहे. आपला विचार करते, असे मुलांना वाटावे यासाठी मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत गणवेश दिला तर? शाळेच्या उपक्रमासाठी नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार्‍या ‘हावरे प्रॉपर्टीज’चे सुरेश हावरे यांना गणवेश मदतीसाठी विचारले. त्यांचा मुलगा अमित यांनीही शालेय शिक्षणाची सुरुवात मराठी माध्यमातूनच केली होती. मुलांना मराठी उत्तम लिहिता-बोलता यावे हा त्यामागचा उद्देश. त्यांच्या चार वर्षांच्या नातवाला आर्यनला मराठी, संस्कृत उत्तमरीत्या यावे यासाठीही हावरे कुटुंब विशेष मेहनत घेते. त्यामुळे मराठी भाषेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना हावरे मदत करतील, असे वाटले.

 

हावरेंनी शांतपणे प्रस्ताव ऐकून घेतला. उपक्रमाची गरज पटल्यावर ते म्हणाले,“गणवेशच का? मुलांना गरजेचे असलेले सगळे साहित्य देऊ. मराठी माध्यमातील मुलांनी शाळेत यायलाच हवे. कोणत्याही कारणांनी त्यांची शाळेतली गळती होता नये.” कल्याण येथे मुठवणे गावातल्या मराठी शाळेमध्ये केवळ चार-पाच मुलं शाळेत जायची. शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती. पण ‘हावरे प्रॉपर्टीज’ने या शाळेमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि शाळेची पटसंख्या वाढली. कदाचित हा अनुभव असल्यानेही हावरेंनी आमच्या शाळेची मागणी मान्य केली. ”

 

गेले चार वर्षे ‘हावरे प्रॉपर्टीज’ या शाळेच्या विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करत आहे. का? यावर उत्तर देताना अमित म्हणाले, “ मला वाटते, शिक्षणासाठीची मदत सगळ्यात महत्त्वाची मदत आहे. कारण, एक गरजू गरीब विद्यार्थी शिकला, तर त्याचे चांगले परिणाम त्याच्या कुटुंबावर, समाजावर आणि देशावरही होतात. कुटुंब, समाज आणि देशबांधणीसाठी, कल्याणासाठी विद्यार्थी घडणे महत्त्वाचे. त्याने शिकणे महत्त्वाचे. कोणत्याही एका कारणासाठी ‘नको शाळेत जायला’ असे त्याला वाटू नये. त्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना शालेय मदत करावी, असे वाटले. तसेच शाळा आणि शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे यांचे मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकवण्यासाठीचे प्रचंड प्रामाणिक कष्ट आहेत. या शाळेत आल्यावर असे दिसते की, इथे मराठी शाळेत प्रवेश घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. खरेच होते, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे यांची मेहनतीचे फळ समोर दिसत होते. शाळेच्या विस्तृत पटांगणावर नजर जाईल तीथे विद्यार्थिच विद्यार्थि होते. मराठी शाळा वाचवा हो.. असा टाहो एकू येत असतानाच चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विभाग(मराठी माध्यम) शाळेने हाऊसफुलकडे वाटचाल करत नवा अध्याय रचला आहे. या शाळेने, या शाळेच्या मुख्याध्यापकांपासून ते सर्वच कर्मचार्‍यांनी, शिक्षकवृदांने आपल्या शाळेमध्ये पटसंख्या कशी वाढेल यासाठी अक्षरश रात्रीचा दिवस केला आहे. त्याचेच हे फळ आहे. चेंबर एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेला, मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांना खरेच मानाचा मुजरा..

९५९४९६९६३८

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@