
मुंबई : राज्यात मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. नुकतीच दिल्ली येथे झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत पुढील पाच वर्षात 'हर घर को नल से जल' ही योजना राबविण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
परभणी शहराला पाणी पुरवठा करण्याबाबत सदस्य जयप्रकाश मुंदडा यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारच्या निकषानुसार गाव आणि शहरांमध्ये पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागात प्रती व्यक्ती २० लिटर पाणी दिले जाते. त्यामध्ये वाढ करण्यासाठी आढावा घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या पाच वर्षात अमृत योजनेच्या माध्यमातून बहुतांश शहरांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजना ४० टक्के पूर्णत्वास आल्या आहेत. लातूर मधील अमृत योजनेचे काम ९० टक्के झाले असून ऑगस्ट अखेर काम पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अजित पवार, गणपतराव देशमुख, विजय वडेट्टीवार, संजय सावकारे, जयकुमार गोरे, बच्चू कडू, अमित देशमुख, यशोमती ठाकूर यांनी भाग घेतला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat