मुंबईचे स्पिरीट इथेही दाखवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019   
Total Views |



पाऊस अनुभवांच्या कडू-गोड आठवणींच्या सागरात भिजवून टाकतो. पण ही अनुभूती मुंबईबाहेरची बरं का. कारण, मुंबईचा पाऊस आठव रे... असे एखाद्या मुंबईकराला म्हणून पाहा. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव पाहा. चिंता, भीती, काळजी वगैरे वगैरेचे संमिश्र भाव चेहर्‍यावर आणि डोळ्यातही दाटून येतील. असे नाही की, त्याला पाऊस आवडत नाही किंवा मुंबईत दुसर्‍या शहरांपेक्षा वेगळा पाऊस पडतो. पण तरीही पाऊस म्हटले की बंद पडलेल्या रेल्वेगाड्या, रस्त्यावर साचलेले कंबरभर पाणी, त्या पाण्यामध्ये एखादा मेनहोल असेल आणि तो उघडा असेल काय? एक ना अनेक चिंताग्रस्त प्रश्न मुंबईकरांच्या मनात येतात. मात्र, यंदाचा पावसाळा सुसह्य करण्यासाठी महानगरपालिकेने चंग बांधलेला दिसतोय. मागच्या पावसात अनेकांनी खड्ड्यात रस्ते शोधले होते. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक अपघात झाले होते, त्यामुळे कित्येक मुंबईकरांनी महानगरपालिकेला दोष दिला होता. नालेसफाई होत नाही वगैरे वगैरेंचा हवालाही दिला होता. या सर्व गोष्टींचा विचार करून यावेळी मुंबईकरांचे हाल होणार नाहीत, यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. आपण पाहतोच की, मुंबईमध्ये कुठे ना कुठे तरी नालेसफाईचे काम सुरू असतेच. नाला रूंदीकरणाचेही काम सुरू असतेच असते. ही कामे गेली अनेक वर्षे होताना मुंबईकर पाहतो आहे. कदाचित यावर्षी या कामाचा फायदा होईल आणि मुंबईच्या तुंबलेल्या नाल्यामुळे मुंबई बंद होणार नाही, असा आशावाद मुंबईकर दरवर्षी बाळगतो. तसा तो आशावाद यावर्षीही मुंबईकराने बाळगला आहे. अर्थात कोणताही प्रश्न प्रशासकीय स्तरावर सुटूच शकत नाही. त्यासाठी लोकसहभागही आवश्यक आहेच. नाले का तुंबतात, याचा शोध घेत महानगरपालिकेने शक्कल लढवली आहे. प्रत्येक नाल्याला जाळी बसवली जात आहे. जिथे कचरा अडेल, तिथूनच नाल्यात कचरा टाकला जातो, हे स्पष्ट होईल. त्या परिसरामध्ये मग नाल्यात कचरा टाकला म्हणून त्या परिसरावर, दोषी व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे. छानच... अर्थात ही प्रक्रियाही कितीतरी मोठी असेल. पण स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन कचर्‍याला नाल्यात न टाकता कचर्‍याच्या ठिकाणी टाकायचे ठरवले तरीही कितीतरी प्रश्न मिटतील व स्वच्छतेसाठी तेही पूरकच ठरेल. चला मुंबईकर, याबाबत दाखवा तुमचे स्पिरीट !

 

'तुंबई'ला जबाबदार कोण?

 

२६ जुलैच्या पावसाचे मानगुटीला बसलेले भूत.. मुंबईकर तो दिवस कधीतरी विसरतील का? कचर्‍यांमुळे गटार, नाले तुंबून मुंबईच्या अंगाखांद्यावर त्या सांडपाण्याचे राक्षस नाचू लागतात, परिणामी मुंबईच्या रस्त्यावर पाणी साचते, मुंबईच्या रेल्वे रूळावर पाणी आक्रमण करते. आमची ठप्प पडलेली मुंबई कचर्‍याकुचर्‍याने आणि इतस्ततः वाहणार्‍या सांडपाण्याने बरबटून जाते. कुजलेला कचरा, रस्त्यावर उंच उंच पातळी गाठणारे सांडपाणी यामुळे लाडक्या आणि सुंदर मुंबईचे रूप विद्रूप होते. वाईट वाटते पण पावसाळ्यात तुंबलेली मुंबई फुगून गेलेल्या प्रेतासारखी दिसते. तिचे चैतन्य तुंबलेल्या सांडपाण्यात आणि कचर्‍यात अक्षरश नासले जाते. या अशा वेळी मुंबईमध्ये प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करणे. तसेच प्रवास करताना आपण माणूस आहोत, आपल्याला वेदना, त्रास वगैरे होतो, हे विसरून जाऊन प्रवास करणे. पूर्वीची एक म्हण आहे, पावसाने झोडपले आणि नवर्‍याने मारले तर दाद कुणाकडे मागायची? याला जोडून म्हणता येईल, पावसात मुंबई तुंबली तर दाद कुणाकडे मागायची? म्हणजे आम्हा मुंबईकरांना मुंबई तुंबण्याची इतकी सवय झाली आहे की, एखाद्या पावसाळ्यात ४-५ वेळा मुंबई तुंबलेल्या कचर्‍यामुळे बंद झाली नाही, तर आम्ही विचार करतो की, पावसाळा असून मुंबई बंद कशी झाली नाही? असो, आता जे कट्टर आणि अट्टल मुंबईकर आहेत, त्यांना ही गोष्ट अजिबात अतिशयोक्तीची वाटणार नाही. कारण खर्‍या मुंबईकराने तुंबणार्‍या मुंबईचा त्रास आयुष्यात एकदा ना एकदा तरी भोगलेलाच असतो. असो, तर मुंबई का तुंबते? उत्तर सोपे आहे की कचर्‍यामुळे. मग कचरा काय पावसातून पडतो? तो मुंबईकरांच्या घरातूनच येतो. घरात कचरा नको, दारात कचरा नको, कचर्‍याच्या गाडीत किंवा कचरापेटीत कचरा टाकायची तसदी नको. मग हा कचरा टाकला जातो तो गटारात, नाल्यात. त्या नाल्याचा कचर्‍यामुळे श्वास कोंडला की, नाल्याचे पाणी कुठूनतरी उसळी घेऊन बाहेर येतेच आणि मुंबईचा, मुंबईकरांचा घात करते. तसेही मुंबई तुंबण्यासाठीच्या अनेक सवयी मुंबईकरांच्या अंगवळणी पडल्यात त्यांचे काय? घराबाहेर नाल्यात कचरा फेकताना, मुंबईची तुंबई आपण करत आहोत, हे मुंबईकरांनी लक्षात घेतले तरी थोडा फरक पडेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@