डोकं फिरलंया... बयेचं डोकं फिरलंया...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019   
Total Views |



. बंगाल हे राज्य भारतीय संघराज्याचा एक भाग असल्याचे ममता बॅनर्जी विसरतात कसे? राजकीय हिंसाचार आणि त्या राज्यात वैद्यकीय आंदोलनामुळे निर्माण झालेली स्थिती याबद्दल केंद्राने विचारणा केल्यास ममता बॅनर्जी डोके फिरल्यासारखे उत्तरे कशी काय देऊ शकतात? राज्यात अनागोंदी कारभार चाललेला असताना केंद्राने बघ्याची भूमिका घ्यावी, अशी ममता बॅनर्जी यांची अपेक्षा असली तरी केंद्रास तसे वागून चालणार नाही.


पश्चिम बंगालमध्ये सध्या जे काही चाललेलं आहे, ते पाहता तेथील तृणमूल काँग्रेसच्या सरकारला आणि त्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या ममता बॅनर्जी यांना आपल्या राज्याचा कारभार चालविणे अजिबात जमत नसल्याचेच दिसून येते. प. बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराच्या घटना घडत आहेतच. प. बंगालमध्ये, ज्युनिअर डॉक्टरांवर एका मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी जो भीषण हल्ला केला, त्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला संप मागे घेतला असला तरी, त्यामुळे राज्यातील वैद्यकीय सेवेवर मात्र विपरीत परिणाम झाला. या आंदोलनाला देशभरातील डॉक्टरांनी आणि त्यांच्या संघटनांनी पाठिंबा दिल्याने देशातील जनतेलाही त्याची झळ पोहोचली. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने दिलेल्या २४ तासांच्या संपाच्या आदेशाने देशभरातील रुग्णांचे सोमवारी अपार हाल झाले, हे उघडच आहे. पण, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हटवादी, हेकेखोर भूमिकेमुळे तेथील संपाबाबत लवकरात लवकर मात्र तोडगा निघाला नाही. प. बंगालमध्ये घडणारा राजकीय हिंसाचार आणि तेथील डॉक्टरांच्या संपामुळे निर्माण झालेली परिस्थिती याबद्दल केंद्र सरकारने त्यांच्याकडे विचारणा केली असता, केंद्र सरकारला नीट उत्तर देण्याचीही ममतादीदींची तयारी नाही. “कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा प्रश्न असल्याने, त्याबद्दल आम्हास जाब विचारणा करणारे तुम्ही कोण?” असे ममता बॅनर्जी यांना वाटत आहे.

 

ममता बॅनर्जी यांची ही आक्रस्ताळी वृत्ती काही आजची नाही. प. बंगालमधील मार्क्सवादी राजवटीची सत्ता झुगारून दिल्यानंतर, त्या राज्याचे तारणहार केवळ आपणच असल्याच्या थाटात त्या वागत होत्या. पण, प. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्यापुढे आव्हान उभे केल्याने भाजपविरुद्ध त्यांचा आक्रस्ताळेपणा चालू आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी, तेथे ज्या पंचायत निवडणुका झाल्या होत्या, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जी जोरदार मुसंडी मारली, ते पाहून त्या हादरल्या होत्या. लोकसभा निवडणुकीमध्ये तर भाजपने लोकसभेच्या 18 जागा जिंकल्याचे पाहून त्यांचा तीळपापड झाल्याचा अनुभव देशातील जनता घेत आहे. विरोधकांच्या यशामुळे त्या राज्यात गेल्या काही वर्षांपासून राजकीय हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होण्याचे प्रकार घडत आहेत. पण, त्यास पायबंद न घालता, या घटनांना राजकीय रंग देऊन त्यात आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेस करीत आहे. केंद्र सरकारला आपण जुमानत नसल्याचेच त्यांच्या वर्तनातून दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी पंतप्रधान मोदी यांची आपण भेट घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. आपण नव्या पंतप्रधानांनाच भेटू, असे त्या म्हणाल्या होत्या. पण, त्यांच्या दुर्दैवाने देशात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले आणि नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान झाले. जनतेने दिलेला कौल लक्षात घेऊन आपल्या वर्तनात सुधारणा करतील तर त्या ममता बॅनर्जी कसल्या? मध्यंतरी नीती आयोगाची बैठक योजण्यात आली असता, त्या बैठकीत आपण सहभागी होणार नसल्याचे जाहीर करून एकप्रकारे देशाच्या संघराज्यीय चौकटीस आपण कस्पटासमान लेखत असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. केंद्र आणि राज्य यांचे संबंध कितीही बिघडले तरी, अशा प्रकारची भाषा या आधी कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याने उच्चारली नव्हती. पण, भाजपला सातत्याने उपदेशाचे डोस पाजणाऱ्या एकाही विरोधी पक्षाच्या नेत्याने ममता बॅनर्जी यांना, तुम्ही चुकीचे वागत असल्याचे सांगितले नाही. भाजप लोकशाही भक्कम करण्याचा प्रयत्न करीत असताना, मोदी सरकार लोकशाही मोडीत काढण्यास निघाले असल्याचा अपप्रचार करण्यातच या विरोधी नेत्यांनी धन्यता मानली. झाले काय? जनतेने या खोटारड्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि आज ते सर्व अडगळीत पडल्यासारखे दिसत आहेत!

 

ममता बॅनर्जी यांनी नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकून आपण किती अपरिपक्व आहोत, हे दाखवून दिले. तशीच अपरिपक्वता त्या सातत्याने दाखवत आहेत. ‘जय श्रीराम’ घोषणा देणाऱ्या जनतेविरुद्ध त्या जी कारवाई करीत आहेत ते कशाचे द्योतक आहे? नेहमी अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करण्याची सवय झालेल्या ममता बॅनर्जी यांनी आता ‘जय श्रीराम’ घोषणेचा धसका घेतला असल्याचे दिसते आहे. पण, ‘जय श्रीराम’ घोषणा देणाऱ्यांचा आवाज दाबून टाकणाऱ्यांची काय गत झाली, हे ममता बॅनर्जी यांच्या कोणी तरी लक्षात आणून द्यायला हवे! ममता बॅनर्जी यांनी असाच एक मुद्दा उगाळला आहे आणि तो म्हणजे इव्हीएमचा. प. बंगालमध्ये भाजपला जे प्रचंड यश मिळाले, ते या यंत्रामध्ये काही गडबड केल्याने, असे त्यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी भाजपच्या नेत्यांनी, मिळणाऱ्या जागांबाबत जे अंदाज व्यक्त केले होते, ते खरे ठरल्याचे लक्षात घेऊन ममता बॅनर्जी मतदान यंत्रांवर घसरल्या. मतदान यंत्रांमध्ये जी गडबड करण्यात आली, त्याची भाजपला कल्पना असल्याने त्यांच्याकडून जे अंदाज व्यक्त करण्यात आले, ते अचूक निघाल्याचे तर्कट त्यांनी लढविले. ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणे इव्हीएमबद्दल आक्षेप घेणारे शरद पवार यांच्यासह अन्य अनेक विरोधी नेतेही आहेत. आपल्या पराभवाचे खापर फोडण्यासाठी त्या यंत्रांना त्यांच्याकडून लक्ष्य केले जात आहे, इतकेच याबद्दल म्हणता येईल.

 

राज्यातील हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या ममता बॅनर्जी यांनी आता ‘बंगाली’ आणि ‘बिगर बंगाली’ असा भेद करून तेथील जनतेला आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण, त्यांच्या अशा अपप्रचारावर बंगालमधील जनता विश्वास ठेवणार नाही. केंद्र सरकारने, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबद्दल विचारणा केली असता, हा राज्याचा विषय असल्याचे सांगून त्याकडे त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही. तसेच उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेकडे केंद्राने लक्ष द्यावे, असे म्हणून त्यास बगल देता येणार नाही. प. बंगालमध्ये २०१६ मध्ये राजकीय हिंसाचाराच्या ५०९ घटना घडल्या होत्या. २०१८ मध्ये ही संख्या १०३५ पर्यंत पोहोचली. २०१९ मध्ये आतापर्यंत हिंसाचाराच्या ७७३ घटना घडल्या आहेत. या हिंसाचारात २०१६ मध्ये ३६ जण ठार झाले होते, तर २०१८ मध्ये हा आकडा ९६ पर्यंत पोहोचला. २०१९ मध्ये आतापर्यंत राजकीय हिंसाचारात २६ जणांचा बळी गेला आहे. याबद्दल केंद्रास जाब विचारण्याचा अधिकार नाही? प. बंगाल हे राज्य भारतीय संघराज्याचा एक भाग असल्याचे ममता बॅनर्जी विसरतात कसे? राजकीय हिंसाचार आणि त्या राज्यात वैद्यकीय आंदोलनामुळे निर्माण झालेली स्थिती याबद्दल केंद्राने विचारणा केल्यास ममता बॅनर्जी डोके फिरल्यासारखे उत्तरे कशी काय देऊ शकतात? राज्यात अनागोंदी कारभार चाललेला असताना केंद्राने बघ्याची भूमिका घ्यावी, अशी ममता बॅनर्जी यांची अपेक्षा असली तरी केंद्रास तसे वागून चालणार नाही. ममता बॅनर्जी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासूनचे एकंदरीत वर्तन, त्यांचा आक्रस्ताळेपणा हे सर्व पाहिले की, ‘डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया...’ असे म्हटले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@