ताकीद नको, ताकदच दाखवा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019   
Total Views |



तपासणी, शोधमोहिमा, रुग्णवाहिका, श्वानपथक, बॉम्बपथक असा सगळा लवाजमा घटनास्थळी दाखल होतो. पण, नंतर या केवळ पोकळ धमक्या असल्याचे लक्षात येते आणि सुरक्षा यंत्रणांचा सगळा वेळ, पैसा, मेहनत खर्ची पडते. नागरिकांचीच गैरसोय होते ती वेगळी!


आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली नाही किंवा एखादी व्यक्ती वागली नाही म्हणून माथेफिरुंकडून संपूर्ण सार्वजनिक व्यवस्थेला वेठीस धरण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसतात. काही दिवसांपूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये शालिमार एक्सप्रेसच्या एका डब्यात जिलेटिनच्या कांड्या ठेवून धमकीचे पत्र मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण, नंतर आपल्या प्रेयसीच्या मुंबईतील नवऱ्याला अडकविण्यासाठी बुलढाण्याच्या एका २५ वर्षीय तरुणाने हे फाजील कृत्य केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर काल सकाळी अचानक ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याच्या धमकीचे पत्र आढळल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पण, दुपारपर्यंत एकतर्फी प्रेमातून मुलीला आणि तिच्या प्रियकराला फसवण्यासाठी हा खोडसाळपणा एका विक्रोळीच्या तरुणाने केल्याचे पोलिसांच्या अवघ्या काही तासांच्या तपासाअंती निष्पन्न झाले. त्यामुळे अशाप्रकारे कुणावर डूख धरून, केवळ त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकविण्यासाठी सार्वजनिक सुरक्षा यंत्रणेला जेरीस आणणे, हे शुद्ध मूर्खपणाचे, बेजबाबदार लक्षण म्हणावे लागेल. पोलिसांना निश्चितच अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर त्वरित कारवाई करणे भाग पडते. त्यामुळे पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडते, एटीएससारख्या यंत्रणाही त्वरित ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये येतात. या प्रकारच्या बातम्याही वेगाने पसरतात. सोशल मीडियावरही अफवांचे पीक जोरात चालते. संबंधित घटनास्थळाची सुरक्षाव्यवस्था अवघ्या काही मिनिटांत अधिक कडक केली जाते. कुठलाही अनर्थ घडू नये म्हणून तो परिसरही रिकामा केला जातो. तपासणी, शोधमोहिमा, रुग्णवाहिका, श्वानपथक, बॉम्बपथक असा सगळा लवाजमा घटनास्थळी दाखल होतो. पण, नंतर या केवळ पोकळ धमक्या असल्याचे लक्षात येते आणि सुरक्षा यंत्रणांचा सगळा वेळ, पैसा, मेहनत खर्ची पडते. नागरिकांचीच गैरसोय होते ती वेगळी! वैयक्तिक हेवेदाव्यांची समीकरणे मिटवण्यासाठी सार्वजनिक सुरक्षेच्या नावाखाली अशी घबराहट पसरविणारे प्रकार घडू नयेत, म्हणून पोलिसांनी कडक शिक्षेची नियमावली जारी करावी. शाळा, महाविद्यालये, माध्यमे, सोशल मीडियावर यासंबंधीच्या गुन्ह्यांची माहिती द्यावी, जेणेकरून या प्रतिशोधाच्या भावनेत भरकटणाऱ्यांची असले धोकादायक प्रकार करण्याची हिंमत होणार नाही. अशा फुकाच्या धमकीबहाद्दरांना केवळ ‘ताकीद’ देऊन न सोडता पोलिसांनी ‘ताकद’च दाखवून यांची अक्कल ठिकाणावर आणायला हवी.

 

जीव वाचवणारेच जेव्हा जीव देतात

 

मुंबईतील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर शिकाऊ डॉक्टर, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐेरणीवर आला आहे. त्यातच केईएम रुग्णालयामध्येही एका प्रशिक्षणार्थीने राहत्या घराच्या इमारतीवरुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कालच उघडकीस आला. म्हणूनच, इतरांचे जीव वाचवणारे डॉक्टर आपले जीवन असे संपविणार असतील, तर ती वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागेल. एका संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, भारतात वैद्यकीय क्षेत्रातील १२ टक्के पुरुष आणि १९.५ टक्के महिलांना दैनंदिन तणावाला सामोरे जावे लागते. त्यातच १५ ते ३० टक्के वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्यही अत्यंत तणावग्रस्त आहे. म्हणूनच १६ पैकी १ प्रशिक्षणार्थीमध्ये आत्महत्येची लक्षणेही दिसून आली आहेत. डॉक्टरांमधील या ताणतणावाला प्रामुख्याने कारणीभूत ठरतात, त्या त्यांच्या कामाच्या अनियमित वेळा. काहीवेळा डॉक्टरांना चक्क सलग २४ ते ३२ कामही करावे लागते. यामुळे इतरांचे आरोग्य सांभाळणाऱ्या डॉक्टरांचे त्यांच्या आरोग्याकडे साफ दुर्लक्ष होते. तसेच, वैद्यकीय शिक्षण घेताना सुरुवातीला अ‍ॅडमिशनची-फीची चिंता, नंतर राहण्या-खाण्याची व्यवस्था, ज्येष्ठांचे अपुरे मार्गदर्शन, पिळवणुकीचे प्रकार, जातीवाचक शिवीगाळ आणि दुय्यम-तुच्छ वागणूक यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांचे मनोबल खच्ची होते. परिणामी, त्यांची पावलं आपसूकच नैराश्यातून आत्महत्येकडे सरसावतात. सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना रोजच्या रोज विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांची तपासणी करावी लागते. त्यातच काही वेळेला रुग्णांच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या रोषालाही डॉक्टरांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपसूकच एक प्रकारची नकारात्मकता, रोगटता, उपचारांचे दडपण डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याला विचलित करते. परिणामी, काही डॉक्टर मद्यपान, सिगारेट यांसारख्या व्यसनांच्या आहारी गेलेले दिसतात. इतकेच नाही तर मानसिक आरोग्याविषयी इतर डॉक्टरांचा सल्ला घेणे, इलाज करणे हेही काही डॉक्टरांना कमीपणाचे, गैरसोयीचे वाटते. त्यातच ताणतणावावर मात करण्यासाठी डॉक्टरांना औषधेही सहज उपलब्ध होतात, ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर जाणवतो. म्हणून, डॉक्टरांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाच हवे, शिवाय वैद्यकीय संस्थांनाही डॉक्टरांचे समुपदेशन, मानसिक आरोग्य तपासणीला अधिक प्राधान्य दिल्यास ही समस्या काही अंशी का होईना, मार्गी लागेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@