निर्बुद्ध बुद्धिवादी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2019   
Total Views |




इंग्रजांनी काँग्रेसला सांगायला सुरुवात केली, तुम्ही मुसलमानांना बरोबर घ्या. मुसलमान असल्याशिवाय तुमची चळवळ, राष्ट्रीय चळवळ होणार नाही. इंग्रजांनी मुसलमानांना सांगितले की, काँग्रेसमध्ये जाऊ नका, तो हिंदुंचा पक्ष आहे. बहुसंख्य हिंदू तुम्हाला खाऊन टाकतील. तुम्ही विभक्त मतदारसंघ मागा. हे संस्कार घेऊन जे 'काळे इंग्रज' भारतात उभे राहिले त्यांना आपण 'बुद्धिवादी' म्हणतो.

 

संघ, भाजप आणि हिंदू विचारधारेवर चालणार्‍या सगळ्या संस्थांवर जे सतत टीका करतात. त्यांना आपल्याकडे पुरोगामी, सेक्युलर, बुद्धिवादी, रॅशनॅलिस्ट (विवेकवादी), मानवतावादी, आंतरराष्ट्रीयवादी समजले जाते, हे झाले त्यांचे लक्षण. त्यांचे लिखाण गेली २५ वर्षे सतत वाचल्यानंतर त्यांची व्याख्या माझ्या मनात तयार झाली, ती अशी- 'जी मंडळी प्रचंड अहंकारवादी असतात, दुसर्‍या विचारसरणीच्या बाबतीत ज्यांच्या मनात तुच्छताभाव असतो, जे टोकाचे असहिष्णु असतात, जगात जी काही अक्कल आहे, ती आपल्याकडेच आहे, असे ज्यांना सतत वाटत राहते. जे लोक समविचारी मंडळींचा कळप करून राहतात. त्यांना सेक्युलर, बुद्धिवादी.... (वर दिले आहे.) म्हणतात.'

 

यांच्यासारखे निर्बुद्ध, बुद्धिवादी जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. त्यांची पैदास भारतात होते. भारतात एवढ्यासाठी होते की, त्यांची पैदास होण्यासाठी इंग्रजांनी खूप मोठ्या प्रमाणात अनुकूल भूमी तयार करून ठेवली आहे. त्यांनी शिक्षणपद्धती दिली, त्यांनी इतिहासाकडे बघण्याचा एक चश्मा दिला, हिंदू धर्मशास्त्र, हिंदू समाज, हिंदू चालीरिती, यांच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन दिला. शिक्षणपद्धतीतून हे संस्कार घेऊन जे बुद्धिवादी बाहेर पडतात, ते खर्‍या अर्थाने निर्बुद्ध असतात. आपण कोण आहोत, हेच त्यांना समजत नाही. भारत काय आहे, हे त्यांना समजत नाही. खेड्यातून वसणारा भारत, कसा विचार करतो, याचे त्यांना शून्य ज्ञान असते.

 

अशा मंडळींची नावे घ्यायची तर लेखाचे पानच त्यात भरून जाईल. आपल्या महाराष्ट्रातील कुमार केतकर, निखिल वागळे, प्रसन्न जोशी, देशपातळीवरील नावे घ्यायची तर योगेश यादव, प्रणॉय रॉय, अरुंधती रॉय, करण थापर, सीताराम येच्युरी इ. २०१९च्या निवडणुका, त्याचे निकाल, यावर या सर्व मंडळींनी जे भाष्य केले आहे, तसे भाष्य बुद्धिवादी निर्बुद्धच करू शकतो. स्वपनदास गुप्ता यांनी फ्री प्रेस जर्नलमध्ये काही दिवसांपूर्वी एक लेख लिहिलेला. लेखात ते एका ठिकाणी म्हणतात की, एका बुद्धिवाद्याचा त्यांना ई-मेल आला, तो असा- 'म्हणजे आता रानटी लोक केवळ दरवाज्यावर पोहोचले नसून ते आता आत शिरले आहेत. त्यांनी स्वतःला भक्कमपणे प्रस्थापित केले आहे. ते आता मानवजातीवर अधिराज्य गाजविणार आहेत. दि. २३ मे ने प्रोग्रेसिव्ह, सेक्युलर आणि समजूतदार माणसाला अत्यंत वाईट स्थितीत ढकललेले आहे.'

 

या लेखाच्या पहिल्या परिच्छेदात जे म्हटले, ते सिद्ध करणारा हा परिच्छेद आहे - अत्यंत घमेंडी, अत्यंत असहिष्णू आणि अत्यंत विद्वेषपूर्ण हे त्याचे स्वरूप आहे. सीताराम येच्युरी हे मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा धुव्वा उडालेला आहे. केवळ पाच खासदार त्यांचे निवडून आलेले आहेत. ते म्हणतात, “भाजपला विजय मिळाला कारण, भाजपने सांप्रदायिक ध्रुवीकरण घडवून आणले. सांप्रदायिक राष्ट्रवादाचा उदोउदो केला आणि मोदी यांची प्रतिमा आहे त्यापेक्षा मोठी केली. निकालावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे या देशात सांप्रदायिक ध्रुवीकरण झालेले आहे. यामुळे भाजपच्या खासदारात एकही मुसलमान खासदार नाही.”

 

या बुद्धिवादी निर्बुद्धांचा एक आवडता सिद्धांत असा आहे की, ज्या संघटनेत मुसलमान नाहीत, ती संघटना राष्ट्रीय होऊ शकत नाही. ती सेक्युलर होऊ शकत नाही. मुसलमान नसलेले संघटन सांप्रदायिक असते. हा विचार या देशात इंग्रजांनी आणला. इंग्रजांनी काँग्रेसला सांगायला सुरुवात केली, तुम्ही मुसलमानांना बरोबर घ्या. मुसलमान असल्याशिवाय तुमची चळवळ, राष्ट्रीय चळवळ होणार नाही. इंग्रजांनी मुसलमानांना सांगितले की, काँग्रेसमध्ये जाऊ नका, तो हिंदुंचा पक्ष आहे. बहुसंख्य हिंदू तुम्हाला खाऊन टाकतील. तुम्ही विभक्त मतदारसंघ मागा. हे संस्कार घेऊन जे 'काळे इंग्रज' भारतात उभे राहिले त्यांना आपण 'बुद्धिवादी' म्हणतो.

 

ते म्हणतात, “तुमच्या पक्षात मुसलमान नाहीत, तुमच्या खासदारांत मुसलमान खासदार नाहीत, तुम्ही सेक्युलर कसले?” सर्वांना राज्यघटनेचा फार पुळका असतो. यातील किती जण राज्यघटना वाचतात आणि किती जण तिचा आत्मा समजून घेतात, हे सांगणे अवघड आहे. आपली राज्यघटना सांगते की, भारतीय जनतेने लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. राज्यघटना हे सांगत नाही की, मुसलमानांनी मुसलमानांचे, ख्रिश्चनांनी ख्रिश्चनांचे, हिंदूंनी हिंदूंचे प्रतिनिधी निवडून द्यावेत. निवडून आलेला खासदार त्या मतदारसंघाचा खासदार असतो. तो हिंदूंचा, मुसलमानांचा, ख्रिश्चनांचा, दलितांचा किंवा अन्य कोणत्या जातीचा खासदार नसतो. राज्यघटनेचा विचार करता, निवडून आलेले सर्व खासदार जनतेने निवडून दिलेले आहेत. भारतीय जनतेत सर्व धर्माचे लोक येतात. राज्यघटनेप्रमाणे संसद सर्व धर्मांचे प्रतिनिधीत्व करणारी संसद आहे. सांप्रदायिक आणि जातीय विचार करणारे पुरोगामी, सेक्युलर, रॅशनॅलिस्ट असतात, हे वाचकांना समजायला अवघड जाणार नाही.

 

योगेंद्र यादव यांचे वर्णन 'समाजशास्त्री' असे केले जाते. सगळ्याच मराठी वाचकांना त्यांचा परिचय असेलच असे नाही. केजरीवाल यांच्या संगतीत काही काळ ते राहिलेले आहेत. यावरून त्यांची जातकुळी लक्षात येईल. ते म्हणतात,“जर मोदी, सरकार बनविण्यास यशस्वी झाले, तर आम्ही निवडणूक अधिकारितावादाच्या पद्धतीत प्रवेश करू. निवडणूक सोडून लोकशाहीसाठी ज्या अन्य गोष्टी लागतात, त्या नष्ट होतील.” हे योगेंद्र यादव पुरोगामी, बुद्धिवादी असल्यामुळे जगातील ज्ञान आपल्याकडेच आहे, असे त्यांना वाटते. मोदींच्या पूर्वी जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना भाजपपेक्षाही अधिक लोकसभेच्या जागा मिळाल्या. नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळात देशातील बहुतेक राज्यांत काँग्रेसचीच सत्ता होती. तेव्हा यादव शीर्षासन करून उभे होते काय? तेव्हा त्यांना का नाही वाटले की, निवडणूक अधिकारितावाद निर्माण झाला आहे. संघ स्यंसेवकांना पं. नेहरुंनी तुरुंगात डांबले. त्यांचे संसार उद्ध्वस्त केले. तेव्हा यादवांची लोकशाही, झेलमचे पाणी प्यायला गेली होती का?

 

या मालिकेत आणखी एक नाव घ्यायला पाहिजे, ते म्हणजे रुचिरा गुप्ता. मराठी वाचकांना त्यांचा फारसा परिचय नसेलच. परंतु, ही सर्व नावे देशाच्या सत्ता परिघात वावरणारी नावे आहेत. या रुचिरा गुप्ता म्हणतात,“लोकशाही मानस असलेल्या भारतीयांच्या दृष्टीने, पणाला लागलेल्या गोष्टी फार मोठ्या आहेत. मोदी यांचा विजय २० कोटी भारतीय मुसलमानांना धोक्याची घंटा ठरेल.” मुसलमानांच्यावतीने इंग्रजांच्या भाषेत आणि जिनांच्या आवाजात बोलण्याचा अधिकार रुचिरा गुप्ता यांना कोणी दिला? असा प्रश्न जर विचारला तर पुरोगामी बुद्धिवाद्यांच्या स्वभावाप्रमाणे भडकून त्या आपल्याला विचारतील, 'हाऊ डेअर यू आस्क मी धिस क्वेश्चन - हा प्रश्न विचारण्याचे तुम्हाला धाडस कसे झाले?'

 

या प्रश्नाचे उत्तर या देशातील आणि चांगला शब्द वापरायचा तर भारतीय मुसलमानांनी त्याहून चांगला शब्द भारतीय मुसलमान नागरिकांनी मतदान करून दिलेले आहे. राजस्थानमध्ये २७ ते २८ टक्के मुसलमानांनी भाजपला मतदान केले. लोकसभेच्या एका जागेच्या अंतर्गत पाच ते सहा विधानसभेच्या जागा येतात. या सर्व विधानसभेच्या क्षेत्रात भाजपला दहा हजारांहून अधिक मते मिळाली आहेत. दिल्ली, आग्रा, तामिळनाडू आणि वाराणसी येथे भारतीय मुसलमानांनी, मिरवणुका काढून भाजपच्या विजयाचा आनंद साजरा केला. वाराणसीत महिलांनी एकत्र येऊन राष्ट्रगान म्हटले आणि मोदींच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. इंग्रज मानसिकतेतून मुसलमानांची चिंता म्हणजे फुटीरतावाद आणि देशाची पुन्हा फाळणी. आपले सर्व निर्बुद्ध बुद्धिवादी हेच काम जबरदस्त बुद्धिवाद करून करीत असतात.

 

या सर्व लोकांना, आरिफ महम्मद खान नावाच्या बावन्नकशी देशभक्ताने उत्तर दिलेले आहे. करण थापर यांचा टीव्ही शो देशभर खूप गाजत असतो. काही दिवसांपूर्वी त्यांनी आरिफ महम्मद खान यांची मुलाखत घेतली. करण थापर यांच्या प्रश्नाला त्यांच्याच भाषेत आरिफ महम्मद खानने जी उत्तरे दिली आहेत, तो बौद्धिक मेजवानीचा भाग आहे. (वाचकांनी यूट्यूबवर ही मुलाखत अवश्य बघावी.) या लेखाच्या सुरुवातीला ज्या बुद्धिवाद्याचे वर्णन केले आहे, त्यात करण थापर बसतात. करण थापर यांनी, “भाजपला ३०३ जागा मिळाल्या, एनडीएला ३५३ जागा मिळाल्या, आता लोकशाहीचे काय होणार?” असा प्रश्न विचारला. आरिफ महम्मद खान म्हणाले,“भारतीय जनतेने एका पक्षाला निवडून दिलेले आहे, मग प्रश्न येतो कुठे? प्रश्न शासनासंबधीचा असू शकतो, जनतेसंबंधीचा प्रश्न कसा असू शकेल?”

 

करण थापर यांनी पुढचा प्रश्न विचारला,“मुसलमानांना असे वाटते की, ते दुय्यम दर्जाचे नागरिक झालेले आहेत. त्यांना प्रतिनिधीत्व नाही.” आरिफ महम्मद खान म्हणतात,“हे तुमचे मत आहे. मी मुसलमान समाजात खूप फिरतो. मला कधी असे आढळत नाही की, ते असुरक्षित झाले आहेत, भयग्रस्त झालेले आहेत.” भाजपचा नेत्रदीपक विजय झाल्यामुळे 'मुसलमान खतरे में आया हैं' ही ओरड आमच्या निर्बुद्ध बुद्धिवाद्यांची आहे. ४४ सालापासून जिनांनी सांगायला सुरुवात केली, 'इस्लाम खतरे में है, मुसलमान खतरे में है, काँग्रेस हिंदू पार्टी हैं' आणि आता जिनांचे (क्लोन) नवअवतार सांगू लागले आहेत की, भारतातील मुसलमान असुरक्षित झालेला आहे, त्याचे जीवन धोक्यात आलेले आहे, उद्या हेच बुद्धिवादी मुल्ला सांगतील की, इस्लाम खतरे में है, पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या मुस्लीम बांधवांनी ते लक्षात घ्यायला सुरुवात केली आहे की, 'खतरे में ना मुसलमान है, इस्लाम के खतरे का सवालही नही उठता, खतरे में पडा है, निर्बुद्ध बुद्धिवादी.'

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@