सावरकरांच्या विरोधकांची अवस्था भुंकणार्‍या कुत्र्यासारखी : सच्चिदानंद शेवडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2019
Total Views |




कल्याण : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ओळख भारतीय राजकारणात अकारण अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून निर्माण केली जात आहे. मात्र, सावरकरांवर आक्षेप घेणार्‍या विरोधकांची अवस्था विशाल हत्तीवर भुंकणार्‍या कुत्र्यासारखी आहे. सावरकरांपेक्षा आपण किती हुशार आहोत, हे दाखवून देण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न या माध्यमातून दिसत असल्याची घणाघाती टीका, ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी रविवारी केली.

 

कल्याणमधील सी. एम. गांधी सभागृहात सावरकर संमेलन उत्साहात पार पडले. डॉ सच्चिदानंद शेवडे या संमेलनाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकर गोखले, स्वागताध्यक्ष आ. नरेंद्र पवार, महापौर विनिता राणे यांचीही उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शेवडे म्हणाले, “सावरकरांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य एवढे मोठे आहे की, “त्यांना खरे तर विश्वरत्न द्यायला हवे. सरकारने विनाविलंब भारतरत्न पुरस्कार द्यावा. याचबरोबर पोर्ट ब्लेअरला वीर सावरकर नगर असे नाव देण्यात यावे. सावरकरांचे लंडन येथील निवासस्थान केंद्र व राज्य सरकारने ताब्यात घेऊन तिथे स्मारक निर्माण करावे. जयोस्तुते सारखे मंगलगीत शालेय अभ्यासात अंतर्भूत करावे, शालेय अभ्यासक्रमात किमान एक वर्ष सैनिकी शिक्षण अंतर्भूत करावे, राष्ट्रपुरुषांची आणि क्रांतिवीरांची कोणत्याही माध्यमातून होणारी बदनामी थांबवावी,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

 

यावेळी शेवडे यांनी शक्तीप्रधान हिंदू समाजाची कल्पना सावरकरांनी मांडली. ते म्हणाले, “निव्वळ शांती किंवा निवळ शक्तीप्रधानता असून चालणार नाही. या दोघांचा सुवर्णमध्य साधणे गरजेचे आहे. प्रत्येक राष्ट्रपुरुष हा त्यांच्या काळाशी सुसंगत असतो. त्यांनी उच्चारलेले वाक्य ब्रह्मवाक्य मानणे म्हणजे भक्तीची परिसीमा झाली. त्यामुळे त्यांच्यात तारतम्य व समन्वय साधणे गरजेचे आहे. कोणत्या काळात, कोणी, काय भूमिका घेतली व का घेतली, याचा सुसंगत अभ्यास करून आजच्या काळात उत्तरे शोधावी लागतात. असे केले तर राष्ट्रपुरुषाची आजच्या काळातील मते पुढच्या काळात विसंगत ठरू शकतात. त्यामुळे गांधी, सावरकर आणि मार्क्स यांच्या विचारांतच सर्व उत्तरे मिळतात, हा निव्वळ भाबडेपणा ठरतो,” असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

संमेलनाचे आयोजन करण्यामागचा उद्देश सावरकरांचे विचार समाजापर्यंत व घरोघरी पोहोचविण्याचा असल्याचे मत स्वा. सावरकर साहित्य मंडळाचे अध्यक्ष शंकर गोखले यांनी मांडले. सावरकरांचे कार्य व त्यांच्या विचारांशी मी बालपणापासून प्रभावित होतो व ते खर्‍या अर्थाने महानायक होते. त्यामुळे त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यासाठी शाळांमधून जयोस्तुते गीत गायले जावे, असे मत आमदार व स्वागताध्यक्ष नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

 

संमेलनात निषेधाचा ठराव

 

राजस्थानच्या राज्य सरकारने सावरकरांच्या नावाने विपर्यस्त माहिती इतिहासाच्या पुस्तकात प्रकाशित केली आहे. तसेच त्यांची ‘वीर’ ही उपाधीदेखील काढण्याचे दुःसाहस केले. सावरकरांचा असा अपमान खपवून न घेण्यासारखा आहे. तसेच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने खोडसाळपणा करून अवमानस्पद शिर्षकाचा वापर करून चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. त्याबद्दल स्पष्ट क्षमाही मागितली नाही, याकडेही लक्ष वेधत त्यांचा निषेधाचा ठराव या संमेलनात यावेळी मंजूर करण्यात आला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@