
मुंबई : “सध्या व्यवहारांचे डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे वाढले आहेत. या आव्हानाला सामोरे जाण्याच्या सज्जतेमुळे महाराष्ट्र पोलीस देशात सायबर पोलिसिंगमध्ये अव्वल आहेत,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले. वांद्रे (पश्चिम) येथील सायबर क्राईम पोलीस स्थानक व पोलीस उपायुक्त सायबर क्राईम कार्यालय व निवासस्थानांचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “व्यवहारांच्या डिजिटायझेशनमुळे आता सायबर हल्ले वाढण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. फिशिंगच्या माध्यमातून सामान्यांची लुबाडणूक होऊ शकते. त्यामुळे एकीकडे अशा बाबतीत जागृती करण्याची गरज आहे. तर यातूनही कुणी आमिषाला बळी पडलेच तर त्याला रक्कम परत मिळवून देण्यासाठी आणि संबंधित गुन्हेगाराला पकडण्याची सज्जता पोलिसांना ठेवावी लागणार आहे. शिवाय सायबर गुन्ह्यांना भौगोलिक सीमांकन नसते. जगाच्या एखाद्या कोपऱ्यात बसूनही गुन्हेगार कार्यभाग साधू शकतो. त्यामुळे या आव्हानाला तोंड देण्यासाठीची अत्याधुनिक तंत्रप्रणाली आणि व्यवस्था उभी करावी लागते.
महाराष्ट्राने सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने उभी केलेली व्यवस्था देशात अव्वल असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मिळून अशा ४० सायबर लॅब स्थापन करण्यात आल्या आहेत. सायबर स्पेसमधील युद्धासाठी मायक्रोसाफ्टने सायबर व्हार्रियरस तयार केले आहेत. भारतातही सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढू शकते. धार्मिक भावना भडकावणारे, सामाजिक स्वास्थ बिघडवणारे प्रकार घडल्यास त्यांना तत्काळ रोखावे लागते. सायबर स्पेसवरून संबंधित मजकूर हटवावा लागतो. सायबर हल्ले रोखण्यासाठी सक्षम फायरवॉल्स तयार कराव्या लागतील. या व्यवस्थेमुळे सायबर गुन्ह्यांना आळा घालता येईल. अन्य गुन्ह्यांच्या तपासातही सायबर सेलची मदत महत्त्वपूर्ण ठरू लागली आहे. यापुढे एकविसाव्या शतकातील आव्हाने समजावून घेत आता पोलिसिंग करावे लागेल. त्यादृष्टीने राज्याने पोलिसिंगमध्ये देशात पहिले आणि महत्त्वाचे पाऊल टाकले आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस तसेच मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेच्या अनावरणाद्वारे पोलीस स्थानक, उपायुक्तालय, प्रकार-४ निवासस्थानांच्या बांधकामासाठी भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खा. पूनम महाजन, आ. आशिष शेलार, महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख, फिल्म सिटीचे उपाध्यक्ष अमरजित मिश्र, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, महासंचालक (पोलीस गृहनिर्माण) बिपीन बिहारी उपस्थित होते.
CM @Dev_Fadnavis performed BhumiPujan for cyber crime office & police housing by Maharashtra State Police Housing & Welfare Corporation in Mumbai, this morning. Minister Deepak Kesarkar, MP Poonam Mahajan, MLA Ashish Shelar, Mumbai CP were present. pic.twitter.com/YlPifhch8s
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 15, 2019
“वांद्रे पश्चिम येथे उभे राहत असलेले अद्ययावत सायबर पोलीस स्थानक हे देशातील सर्वात अद्ययावत ठरेल,” अशा शब्दात या उपक्रमाचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची स्वतंत्र सायबर आर्मी उभी करणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली. त्यासाठी राज्यात सुमारे एक हजार अधिकारी-कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. वांद्रे पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गावर सायबर क्राईम पोलीस स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे पोलीस स्थानक या भूखंडावर उभे राहावे म्हणून मुंबई भाजप अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी गेली चार वर्षे सातत्याने पाठपुरावा केला त्याला अखेर यश आले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat