नीरा डाव्या कालव्यावरून उदयनराजेंचा पवारांना घरचा आहेर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |



नीरा डाव्या कालव्याचा अध्यादेश काढण्यासाठी उशीर झाल्याची प्रतिक्रिया


सातारा : बारामतीकडे बेकायदा वळवलेले नीरा देवघर धरणाचे पाणी पुन्हा दुष्काळी भागाला वळवण्यात आल्याचा महत्वपूर्ण निर्णय काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मनाला जातो. ही जखम ताजी असतानाच पवार यांना याच प्रकरणावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घरचा आहेर दिला आहे. राजेंनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे कौतुक करत नीरा डाव्या कालव्याचा अध्यादेश काढण्यासाठी उशीरच झाला असल्याची प्रतिक्रिया दिली. माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांनी या बाबत पाठपुरवठा केला होता. या निर्णयामुळे सांगोला, माळशिरस, पंढरपूर व फलटण भागातील दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.

 

काय आहे प्रकरण

 

नीरा देवघरचे १९५४ साली वाटप करताना पुणे बारामती पाणी घेत असलेल्या डाव्या कालव्यात ४३ टक्के तर सांगोला, फलटण, माळशिरस आणि पंढरपूर पाणी घेत असलेल्या उजव्या कालव्याला ५७ टक्के पाणी देण्याचा निर्णय झाला होता. पुढे २००९ मध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री झाल्यावर त्यांनी करार बदलत दुष्काळी उजव्या कालव्याचे जवळपास ११ टीएमसी पाणी बारामतीकडे डाव्या कालव्यात वळवले होते. मात्र आता सरकारच्या आजच्या निर्णयामुळे बारामतीला वळवलेले दुष्काळी भागाच्या हक्काचे पाणी पुन्हा एकदा या भागाला मिळणार असल्याने या भागातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून त्यांची तहान भागणार आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी दबाव झुगारला

 

राष्ट्रवादीच्या 'माझे ते माझे पण तुझे तेही माझे' या हेकेखोर धोरणामुळे हा पाणी प्रश्न निर्माण झाला होता. मात्र डाव्या कालव्यात वळवलेले हे ११ टीएमसी पाणी दुष्काळी भागात आणण्यासाठी माढ्याचे खासदार रणजित नाईक-निंबाळकर यांनी ताकद पणाला लावली होती. सरकार निर्णय घेणार याची कुणकुण लागताच खुद्द शरद पवार, अजित पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीतून मिळणारे पाणी पुन्हा वळवले जाऊ नये, अशी मागणी केली होती. यासाठी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी गळफास आंदोलनाचा इशारा देत मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र या दबावाला झुगारून देत आता पुन्हा एकदा १९५४ च्या कायद्यानुसार हे पाणीवाटप करण्याचा मोठा निर्णय भाजप सरकारने घेतला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@