
मुंबई : अकरावी प्रवेशासंदर्भात विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात साशंकता असली तरी विद्यार्थ्यांचे नुकसान राज्य शासन होऊ देणार नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या मुलांना प्रवेशात प्राधान्य मिळेल मात्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य मिळणार नाही अशी माहिती व्हायरल होत असल्याने शिक्षणमंत्री तावडे यांनी स्पष्टोक्ती दिली. तसेच अकरावी प्रवेश प्रक्रिया नियमित वेळापत्रकानुसारच सुरु करण्यात येत असून या प्रक्रियेला कोणताही विलंब झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने त्यांना मिळालेल्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. याच पद्धतीने सीबीएसई, आयसीएसई या विद्यार्थ्यांना त्यांच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीत प्रवेश देण्यात यावा, मात्र त्यांचे तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण प्रवेशावेळी ग्राह्य धरण्यात येऊ नये अशी मागणी होत आहे. याबाबत राज्य सरकारच्यावतीने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री, त्याचप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई बोर्ड यांच्याशी चर्चा करण्यात येत असल्याचे तावडे म्हणाले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat