सुमितला राग येऊच नये का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2019   
Total Views |

सुसंस्कृत असणे म्हणजे काय? खूप शिकलेली माणसं सुसंस्कृतच असतात, असा एक समज आहे. वास्तवात तसे नसते. आपले वाडवडील, अगदी आजोबा किंवा त्या आधीची पिढी शिकलेली नव्हती, मात्र सुसंस्कृत नक्कीच होती. त्याचे अनेक किस्से आपण आजही मोठ्या अभिमानाने अन् रोमांचित होऊन सांगत/ऐकत असतो. ही अव्यभिचारी, सहज शहाणूक त्यांच्यात कुठून आली होती? त्याचे क्रमिक अभ्यासक्रमाचे धडेही त्यांनी गिरविले नव्हते अन् परीक्षेत गुण मिळवून आपली गुणवत्ताही त्यांनी सिद्ध करून दाखविली नव्हती. प्रमाणपत्रांच्या रूपात त्यांनी ती मिरविलीही नव्हती. कुठल्या रस्त्याने अन् रस्त्याच्या कुठल्या भागातून जायचे, हे त्यांना शिकवावे लागले नव्हते. वातावरणातच ते शिक्षण होते. ‘फळ वोळखल्याविना खाऊ नये, वाट वोळखिल्याविना जाऊ नये, रातीचा प्रवास करू नये एकाएकी...’ असे समर्थ रामदासांनी सांगितले ते काही पदवी घेऊन नव्हे! ‘एक आंधळा जेवायला बोलावला की, दोघांचा स्वयंपाक करायला हवा. कारण आंधळा कधी एकटा येऊ शकत नाही.’ हे ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवले ते शिक्षण त्यांना संस्कारांनी भारलेल्या वातावरणातून मिळाले होते. म्हणून त्यांची शहाणूक माहितीचा बांध ओलांडून ज्ञानाच्या प्रदेशात प्रवेश करती झालेली होती. नंतरच्या पिढ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमातील पदव्यांशी अन् गुणांशी गहाण पडलेले ज्ञान मिळविले अन् जुन्या जीवनातल्या वहिवाटीतून आलेल्या शहाणुकीला आम्ही ‘गावठी’ ठरविले.
संस्कार म्हणजे नैसर्गिक भुकांचे आणि एकूणच जगण्याचे संयमन आणि नियमन. कुठे, केव्हा काय नि कसे करायचे, याचे नियमन आणि संयमन म्हणजे संस्कार! तसे करणारा अन् सहज करणारा म्हणजे सुसंस्कृत. त्या अर्थाने आता आम्ही सुसंस्कृत आहोत का? बगिचात, बीचवर आणि सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना लगडून, नको त्या अवस्थेत बसलेली जोडपी पाहिली, सार्वजनिक ठिकाणी नैसर्गिक विधी करू नयेत अन् त्यासाठी मग पाट्या लावाव्या लागतात, गोदरीमुक्त गावांची चळवळ सुरू करावी लागते, तेव्हा मग आम्ही सुसंस्कृत आहोत का, या प्रश्नाचे घाऊक उत्तर- नाही, असेच द्यावे लागते.
 
हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे परवा नाशकात पुन्हा तेच घडले. नाशिकमध्ये, महाकवी कालिदास कलामंदिरात ‘नॉक नॉक सेलिब्रिटी’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान एका प्रेक्षकाची मोबाईल रिंग वाजल्याने कलाकार सुमित राघवन याने प्रयोग थांबवून राग व्यक्त केला आणि नंतर हेच प्रकार सातत्याने सुरू राहिल्यावर त्याने तो प्रयोग थांबविला. त्यावर आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. असा प्रयोग थांबविणे गैर आहे, असेही काही जणांचे म्हणणे आहे. कलावंतांचा हा उद्दामपणा आहे, असेही मत पडले. तुमच्या कलाकृतीत तितका दम हवा, समरसता साधली जावी. रसिकांचे लक्ष विचलित होते याचा अर्थ, तुमच्या कलाकृतीत दम नाही असा नाही होत का, असाही सवाल विचारण्यात आला. त्यावर एकच उत्तर आहे- तुम्ही नाटक, सिनेमा बघायला किंवा एखाद्या कार्यक्रमाला स्वत:च्या निवडीने जात असता. त्या आधी अमक्या नाटकाला जावे की नाही अन् कुठल्या शोला जावे, हेही तुम्ही ठरवीत असता. नाटकांना प्रेक्षक हवेत, असे कलावंतांना वाटत असते, हे खरेच आहे. त्यासाठी ते प्रयत्नही करत असतात, पण ती जशी सादर करणार्यांची गरज असते तशीच ती प्रेक्षक, रसिकांचीही गरज असते. तुम्ही निवड करून जेव्हा जाता तेव्हा ती तुमचीही जबाबदारी असते. एखादे नाटक नाही आवडत, कुठल्या गाण्यात समरसता नाही साधली जात, समाधी नाही लागत, नाही आवडत आपल्याला ते नाटक. तेव्हा चुपचाप उठून जाणे आणि नापसंती मोठीच असेल तर तसे ते व्यक्त होणे, संबंधित कलावंतांना तुमचे मत कळविणे, हा मार्ग असतोच. ते तसे करायला तुम्हाला कुणी रोखलेले नसते. त्यासाठी सभेचा विक्षेप करण्याचा तुम्हाला कुणीच अधिकार दिलेला नसतो. एखादी कलाकृती, विशेषत: उपयोजित कला तुम्हाला नाही आवडली याचा अर्थ ती इतरांनाही नाहीच पसंत, असा होत नाही. तुम्ही जसे पैसे खर्च करून आलेला असता तसेच इतर प्रेक्षकही तिकिटाला पैसेच देऊन आलेले असतात. त्यांना ते नाटक बघायचे असते आणि वेळी रिकाम्या खुर्च्यांसमोरही कलावंतांना ते सादर करायचे असते.
 
मोबाईल हा प्रकार सार्वत्रिक झाल्यापासून नाटकांचा पडदा उघडण्याच्या आधी विशेष सूचना दिली जात असते- ‘‘आपले मोबाईल आणि लहान मुलं बंद ठेवा.’’ आजकाल त्यात आणखी एका सूचनेची भर पडली आहे- ‘‘नाटकाला मध्यांतर होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे काय खायचे-प्यायचे आहे ते मध्यांतरात करा. मध्यांतरानंतर सभागृहात ते आणू नका.’’ तरीही आम्ही ते अगदी हटकून करतोच. अशी सूचना केली जाणे म्हणजे आमच्या इगोला दुखापत होत असते. प्रत्येकालाच असे वाटते की, आम्ही म्हणजे विशेष व्यक्ती आहोत. खास व्यक्ती तेच ज्यांना कमीतकमी नियम लागू होतात, कायदे पाळावे लागत नाहीत अन् सभागृहात बसलेले सारेच कसे विशेष व्यक्ती, खाशा स्वार्याच असतात. त्यामुळे त्यांना अशा सूचना पाळणे म्हणजे अपमानच वाटतो. मग हमखास तेच प्रकार होतात. रसभंग होतो. नाटक ऐन रंगात आले असताना कुणाचा तरी मोबाईल खणखणतो. त्याने तो म्युट करून ठेवलेला नसतो अन् नेमका कुठे ठेवला आहे, तो पटकन सापडत नाही त्यामुळे तो वाजतच राहतो. सापडल्यावरही तातडीने तो बंद न करता कॉल स्वीकारून तो- ‘‘मी अमक्या नाटकाच्या शोला बसलो आहे, नंतर करतो,’’ असे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. अभ्यागताला ते नीट ऐकू जात नाही. त्यापेक्षा कॉल तोडून संदेश देता येतो, पण मग मी नाटकाच्या प्रयोगाला आलो आहे, (नाटक बघण्याइतकी माझी अभिरुची उच्च आहे.) हे कसे सांगता येईल? नाटकाच्या सुरुवातीपासूनच खाण्याच्या पुड्यांचा जीवघेणा आवाज होत राहतो. मुलांना नको असताना नाटकाला आणलेले असते. त्यांना आवरता येत नाही. त्यांचीही असह्य गडबड सुरू असते. रंगमंचावरचे कलावंत म्हणजे चावी दिलेली खेळणी नसतात. कला म्हणजे केवळ तंत्र नव्हे. कलावंत काही भावना प्रकट करत असतात आणि त्यांची ती लय आपल्या या अशा वागण्याने तुटत असते, हे कुणाच्याच लक्षात येत नाही. आले तरीही तो आमचा विशेषाधिकारच आहे, असाच एकुणात आव असतो. नाटकाचा प्रयोग व्यावसायिक असला तरीही अन् त्या दृष्टीने कलावंतही व्यावसायिकच असले तरीही ते यंत्रमानव नसतात. तुम्ही तिकिटाच्या पैशात त्यांना विकत घेतलेले नसतेच... मग वैतागून प्रयोग बंद केला जातो. परवा तो सुमित राघवन यांनी केला. खरेतर त्याबद्दल संबंधितांनी दिलगिरी व्यक्त करायची, तर सुमितच्या डोक्यात कशी हवा गेली आहे, अशाच प्रकारचे संदेश समाजमाध्यमांवर सोडले गेले. माध्यमांमध्येही बातम्या तशाच आल्या. त्यानंतर सुमितने फेसबुकवर ‘मी प्रयोग का थांबविला’ त्याचे स्पष्टीकरण दिले. त्याचसोबत आम्ही नाटक अपमान करून घेण्याकरिता करावे का, असा संतप्त सवालही त्याने विचारला आहे.
 
 
‘‘त्या प्रयोगाला वेगवेगळ्या लोकांचा मोबाईल वाजला. त्यात एका गृहस्थाने दरवाजा उघडून आत-बाहेर केलं. तसं करण्याला अजीबात आक्षेप नाही; पण ते दार दरवेळी आदळायचं आणि मोठा आवाज व्हायचा. पुढे एक वयस्कर बाई दुसर्या बाईला, ‘अहो हळू बोला,’ असं बोलली. त्यावर ती बाई दाराच्या बाहेर जाऊन बोलू लागली आणि ते बोलणं स्टेजवर ऐकू येत होतं. शेवटी पहिल्या रांगेतील एका प्रेक्षकाचा फोन वाजला आणि मी चिडून नाटक बंद केलं...’’ असं सुमितने फेसबुकवर लिहिलं.
असाच आणखी एक किस्सा त्याने सांगितला- ‘‘नाशिकमध्येच ‘एक शून्य तीन’ नावाच्या नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि एका प्रेक्षकाचा फोन वाजला. तो फोनवर बोलू लागला. मी प्रयोग थांबवून त्या व्यक्तीकडे बघितलं तर त्याने हाताच्या इशार्याने, ‘तुमचं चालू द्या,’ असं केलं आणि मी स्तब्ध झालो.’’
आम्ही, शाळेच्या वर्गात शिक्षक शिकवीत असताना भलत्याच व्यवहारात असतो. अगदी संसदेतही जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे व्यवहार सुरू असताना आम्ही मोबाईलवर पोर्न फिल्म बघतो नाहीतर झोपलो असतो... तरीही सुमितला राग येऊ नये, असेच आम्हाला वाटते...
@@AUTHORINFO_V1@@