काकांपेक्षा पुतण्याच निघाला समजदार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2019
Total Views |
 
 
 
म्हातार्या लोकांनी राजकारणातून निवृत्त व्हावे असे जे म्हटले जाते, ते राजकीय पक्षांच्या हिताचेच असते, याची दिवसेंदिवस खात्री पटू लागली आहे. कारण, वृद्ध झालेल्या नेतृत्वात, पराभवानंतर पुन्हा उभे होण्याची उभारी नसते. तो नेता थकलेला असतो. म्हणून त्याला वाटते आपले कार्यकर्तेही थकलेले आहेत. आणि मग, पराभवाची मीमांसा करताना, सर्वप्रथम पराभव मान्य करावा लागतो हे विसरून, ही वृद्ध नेतेमंडळी याला-त्याला दोष देत पराभवापासून काही धडा शिकण्यास नकार देत बसतात. हे सर्व सांगायचे कारण की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात, या पक्षाचे संस्थापक व अजूनही सर्वेसर्वा शरद पवार यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या पक्षाच्या पराभवाचे खापर पुन्हा एकदा इव्हीएम मशिनवर फोडले. परंतु, नेतृत्व तरुण असेल तर ते कसा विचार करते, याचा वस्तुपाठ त्याच ठिकाणी राकॉंचे नेते व शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी दाखवून दिला. याच कार्यक्रमात अजित पवार उपस्थितांना म्हणाले की, तीन महिन्यांपूर्वी छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थानात कॉंग्रेस पक्ष जिंकला. तेव्हा इव्हीएम चांगले होते. एवढेच नाही, तर तेलंगणात दणदणीत विजय प्राप्त करून सत्तारूढ झालेल्या चंद्रशेखर राव यांची मुलगी मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झाली. मग आता असे म्हणायचे का, की आम्ही जिंकलो तर इव्हीएम छान आणि नातलग वा मुलगी हरली तर इव्हीएममध्ये गडबड! त्यामुळे यावर चर्चा करत न बसता, आपल्या चुका सुधारून पुन्हा जोमाने पक्षाचे काम करण्याची गरज आहे.
 

 
 
वयाचा किती फरक पडतो बघा! गलितगात्र झालेला नेता दुसर्यांकडे बोट दाखवत आहे, तर त्याचाच तरुण पुतण्या पराभवाच्या फुसक्या कारणांवर विसंबून न राहता, पुन्हा कंबर कसून कामाला लागण्याचे आवाहन करत आहे. गंमत म्हणजे, अजित पवार यांच्या या आवाहनाला कार्यकर्त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. परंतु, शरद पवारांनी इव्हीएमवर पराभवाचे खापर फोडताच, सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. नेत्यांमध्येच निरुत्साह असेल, तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कुठून येणार? या सर्व घडामोडीत, अजित पवार यांनी, आपण आपल्या काकांपेक्षा किती सकारात्मक मानसिकतेचे आहोत, हे मात्र दाखवून दिले आहे. खरा नेता असाच असला पाहिजे.
 
 
 
 
हा जो इव्हीएमचा वाद उभा करण्यात आला आहे, तोच मुळात कार्यकर्त्यांना नाउमेद करणारा आहे, याची पुसटशीही कल्पना या नेत्यंना येत नाही की काय, असे वाटते. 2014 सालीदेखील भाजपाला केंद्रात बहुमत मिळाले, तेव्हाही कुठल्याच विरोधी पक्षाने आत्मिंचतन न करता, इव्हीएमला दोष दिला. नरेंद्र मोदींना ‘मार्केटिंग’ उत्तम साधले, आम्ही त्यात कमी पडलो, अशी मनाची समजूत घालून हातावर हात ठेवून शांत बसून राहिले. 2019 मध्येही तेच घडले. आतातरी विरोधी पक्ष जागे होतील आणि 2024 सालच्या निवडणुकीसाठी आतापासूनच कंबर कसून सिद्ध होतील, असे वाटत होते. परंतु, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. बंगालमध्येही सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसमध्ये हीच नकारात्मक मानसिकता दिसून येत आहे. तृणमूल कॉंग्रेसचे एक विचारी नेते सौगत रॉय यांनी आपल्या पक्षाच्या पराभवाचे विश्लेषण करताना हाच आरोप केला आहे. ते म्हणतात की, इव्हीएममध्ये गडबड करून निवडणुका जिंकता येतात, याचा कुठलाही पुरावा आमच्याकडे नाही. तो मिळाला की आम्ही जाहीर करू. परंतु, इव्हीएममध्ये गडबड होते, याचा आम्हाला दाट संशय आहे. त्यावर प्रश्नकर्त्याने विचारले की, 2011 व 2016 साली याच इव्हीएमच्या माध्यमातून तुम्ही सत्तेवर आलात. तेव्हा अशी शंका आली नाही का? सौगत रॉय म्हणाले, तेव्हा केंद्रात दुसरे (म्हणजे संपुआ) सरकार होते. यानंतर पुढचा प्रश्न आला की, 2014 साली तर केंद्रात संपुआ सरकार होते. मग भाजपाचा कसा विजय झाला? या प्रश्नावर सौगत रॉय यांनी दिलेले उत्तर जगातील सर्व तर्कवादी लोकांना निरुत्तर करणारे आहे. ते म्हणाले, केंद्रात मजबूत सरकार असले की ते निवडणूक आयोगाला हाताशी धरून हवे ते करू शकते. 2014 साली केंद्रात कमकुवत सरकार होते. त्यांना काही ते जमले नाही. म्हणून भाजपा निवडून आली.
 
 
 
 
प्रश्नकर्ता जिद्दीला पेटला होता. तो म्हणाला, 2016 साली तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे केंद्रात भाजपाचे मजबूत सरकार होते. मग तरीही 2016 साली तुम्ही बंगालमध्ये प्रचंड बहुमतांनी कसे निवडून आलात? आता मात्र सौगत रॉय मौन झाले. हे सर्व सविस्तर सांगायचे कारण म्हणजे, ज्या लोकांना पक्षात विचारवंत मानले जाते, ती मंडळी एका पराभवाने कशी सैरभैर होतात आणि किती विसंगत कारणमीमांसा सर्वांसमोर उघड करतात, हे कळून यावे. आम्हाला तर असे वाटते की, ज्या पक्षांमध्ये हे असले विचारवंत आहेत, हे असले नेते आहेत, ते पक्ष यापूर्वीच्या निवडणुका खरेच प्रामाणिकपणे जिंकल्या असतील, यावर विश्वास बसत नाही. लाटेवर जे पक्ष निवडून येतात, ते पक्ष लाट ओसरल्यावर कुठे दिसूनही पडत नाहीत. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर ही मंडळी त्या लाटेलाच समुद्र मानू लागतात आणि त्या लाटेलाच धरून बसतात. परंतु ते हे विसरतात की, लाटांचा समुद्र नसतो, समुद्राची लाट असते. तुमचा मतदाररूपी समुद्रच आटत चालला असेल तर, तुम्हाला शिखरावर नेणारी लाट शिल्लक कशी राहील?
 
 
 
 
जनादेशाला अपरिपक्व म्हणणे, लोक भूलथापांना बळी पडले, निवडणूक आयोगानेच काही गडबड केली, असली वक्तव्ये मतदारांचा अपमान करणारी आहेत. हीच मंडळी उदारता, सहिष्णुता, खिलाडुवृत्ती इत्यादी संकल्पनांवर आमची बांधिलकी असल्याचे संविधानाची शपथ घेत सांगत असतात. या देशातील प्रत्येक भाजपाविरोधक सर्वसामान्य लोकांच्या मनात, इव्हीएबद्दलची तसेच निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. आम्ही जिंकलो नाही म्हणजे जग बुडाले, अशी अहंमन्य वृत्ती विरोधी पक्षांमध्ये ठासून भरली आहे की काय, असा प्रश्न मनात येतो.
 
 
 
 
थोडक्यात काय, आमचे काहीच चुकले नाही. आम्ही बरोबरच होतो. पण अंगणच वाकडे होते! आम्हीच जिंकणार होतो. सर्वकाही बरोबर होते, पण इव्हीएमनेच घात केला. भाजपाचे काहीच काम नसताना, तो पक्ष इतक्या प्रचंड प्रमाणात कसा काय निवडून येऊ शकतो? हेच या लोकांचे तर्कशास्त्र आहे. असे तर्कशास्त्र असलेल्या राजकीय पक्षांनी आता यापुढे आपल्याला उभारी मिळेल, याची आशा सोडून दिली पाहिजे. यावेळी जनतेला नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरूढ झालेले हवे होते आणि म्हणून या जननेते कुणाचेही न ऐकता, नरेंद्र मोदींच्या पक्षाला भरघोस मतदान केले आहे. हे जो समजून घेईल, त्यालाच भविष्य आहे. मरणाचे वेध लागलेला रोगी औषध घेण्याचे नाकारतो. या सर्व विरोधी पक्षांची स्थिती मरणोन्मुख रोग्यासारखी झालेली आहे. आणि म्हणून या सर्व आत्ममुग्ध गोंधळात, अजित पवार यांचे व्यक्तिमत्त्व उजळून निघत आहे. नेत्यांकडून पराभवाचे संतुलित विश्लेषण केले गेले, तरच त्या पक्षाला पुढे काही आस आहे, असे समजावे. त्या दृष्टीने पाहिले असता, आता शरद पवारांनी नेतेपदाची सूत्रे अजित पवार यांच्याकडे सोपविली पाहिजे. अजित पवारांनीही आपण नेतृत्व देण्याच्या लायकीचे आहोत, हे काकांनाच नाही, तर खुद्द काकांसमोर लोकांनाही दाखवून दिले आहे. काकांपेक्षा पुतण्याच समजदार निघाला म्हणायचे!
@@AUTHORINFO_V1@@