'कर्ता कोण?' प्रश्नाची उकल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2019
Total Views |




जाणीवरूप आत्मा' हा अंतरातील 'देव' असून हे 'शरीर' म्हणजे 'देवालय' आहे. सामान्य माणसाला हे न समजल्याने तो देवाचे ध्यान करण्याऐवजी देवालयाचे, शरीराचे ध्यान करतो. याचा अर्थ साधकाची देहबुद्धी कमी न झाल्याने तो देहालाच महत्त्व देतो. ते त्याच्या ध्यान लावण्याच्या आड येते, असे स्वामी म्हणतात. ते आपण मागील लेखात पाहिले. देह, देऊळ आणि त्यातील आत्मा हा परमेश्वर हे रूपक आधुनिक मराठी वाड्मयात पाहायला मिळते. उदाहरणच द्यायचे झाले, तर एका नाटाकातील पुढील गीत बहुतेकांना आठवेल -

 

देह देवाचे मंदिर ।

आत आत्मा परमेश्वर ।

जशी उसात हो साखर ।

तसा देहात परमेश्वर ॥

 

आचार्य अत्रे यांच्या नाटकातील या कल्पनांचे मूळ स्वामींच्या दासबोधात सापडते. खर्‍या देवाचे आत्मरूप लक्षात आल्यावर देवाचे अनन्यभावे भजन करून साधकाने 'अखंड ध्यान' साधावे. 'ध्यान' शब्दावरून वाचकांना पतंजली मुनींच्या 'अष्टांग योग' साधनेचे स्मरण होणे, स्वाभाविक आहे. 'पातंजल योगसूत्रा'तील 'साधनपाद'मधील २९व्या सूत्रात योगाची आठ अंगे मुनींनी सांगितली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी ही आठ अंगे आहेत. त्यापैकी पहिली पाच अंगे शरीराच्या अंतर्बाह्य, सूक्ष्म सूचितेकरिता सांगितली असून शेवटची तीन धारणा, ध्यान आणि समाधी यांची सिद्धता आंतरिक मानसिक विकास करून साधता येते. त्यासाठी मनोनिग्रह, मन:संयम, मनोविकास हे आवश्यक असतात. 'पातंजल योगशास्त्रा'नुसार ध्येयाचा विचार करून वृत्ती ध्येयाकर होऊ लागली की, त्या क्रियेला 'धारणा' असे म्हटले जाते. असे वारंवार होऊन ध्येयविषयाचे सूक्ष्म मनन करण्याच्या क्रियेला 'ध्यान' असे म्हटले आहे.

 

तरीही येथे 'ध्यान' करणारा मी ध्येय वस्तू आणि 'ध्यानक्रिया' ही त्रिपुटी शिल्लक राहते. ही त्रिपुटी नाहीशी होऊन 'ध्यानी' व 'ध्यानवस्तू' जेव्हा एकच होऊन जातात, तेव्हा 'समाधी' साधते. म्हणजे, 'ज्याला जाणायचे तो' आणि 'जाणून घेणारा मी' हे वेगळे असत नाहीत. थोडक्यात, एखाद्या वस्तूवर अथवा परमेश्वर शक्तीवर मन स्थिर करण्याची क्रिया म्हणजे 'धारणा.' 'धारणा' केलेल्या वस्तूवर शक्तीवर सतत मनन करण्याच्या क्रियेला 'ध्यान' म्हटले आहे आणि 'समाधी' ही तद्रुपतेची अवस्था आहे. सर्वसामान्य श्रोत्यांच्या दृष्टीने 'पातंजल योगशास्त्रा'चा भाग क्लिष्ट आहे, असे समर्थांना वाटले असावे. म्हणून स्वामी पातंजलमुनींच्या योगशास्त्रात शिरले नाहीत, असे वाटते. तथापि, स्वामींनी ध्यानाचे तत्कालीन प्रकार, त्यासंबंधी सर्वसामान्यांच्या मनातील कल्पना, खर्‍या ध्यानाची लक्षणे याचे सविस्तर विवरण दासबोधात केले आहे. ते करीत असताना तत्त्वज्ञानातील काही मूलभूत प्रश्नांची चर्चाही दासबोधात केली आहे.

 

ध्यानाचे सविस्तर विवरण करण्याअगोदर स्वामींनी तत्त्वज्ञानातील काही प्रश्नांचा ऊहापोह दासबोधात केला आहे. जगातील सर्व धर्मसंस्थापकांना व तत्त्वज्ञांना हे विश्व कसे निर्माण झाले आणि या विश्वाचा 'कर्ता' कोण, याची उत्तरे शोधावी लागतात. अशा प्रश्नांची चर्चा स्वामींनी दासबोधातील दशक १३, समास ८ मध्ये केली आहे. दृश्य जगातील सर्वसाधारण नियम असा की, क्रिया घडण्याच्या आधी कर्ता हा अस्तित्वात असतो. नंतर त्याच्या कार्यनिर्मितीतून निर्मित वस्तू पुढे येतात.

 

ही संपूर्ण सृष्टी पंचमहाभूतांनी बनलेली आहे, हे सिद्ध करता येते. या पंचमहाभूतापासून पुढे अनेक दृश्य वस्तू तयार होतात. यासाठी या सृष्टीचा कर्ता शोधण्यासाठी पंचमहाभूतांच्याही पलीकडे जाऊन शोध घेतला पाहिजे. याचा अर्थ ही पंचमहाभूते ज्याने निर्माण केली, तो या सृष्टीचा, जगाचा कर्ता असला पाहिजे, हे उघड आहे. या पंचमहाभूतांचा निर्माणकर्ता शोधत शोधत लोक 'देव' या कल्पनेशी येऊन थांबतात, पण प्रत्येकाचा 'देव' वेगळा असतो आणि प्रत्येकला वाटत असतो की, तो ज्या देवाला मानतो तो देव या सृष्टीचा कर्ता असला पाहिजे. या समासात स्वामींनी अनेक देवनामांची लांबलचक यादी दिली आहे. त्यापैकी आपला 'देव' हाच कर्ता असे प्रत्येक जण मानत असतो. त्यामुळे या अनेक देवांच्या गलबल्यात लोकांच्या मनातील गोंधळ वाढतच जातो.

 

जेहिं जो देव मानिला ।

कर्ता म्हटती तयाला।

ऐसा लोकांचा गल्बला।

वोसरेना (दा. १३.८.२२)

 

आपण 'मानलेला देव' हाच खरा 'कर्ता' असून त्याने या विश्वाची निर्मिती केली, असे मानणारे अनेकजण आहेत. आत हे देव कसे निर्माण झाले, याचाही शोध घेतला पाहिजे; तर 'खरा कर्ता' कोण, हे ठरवता येईल. या संबंधीचे विवरण स्वामींनी दासबोधाच्या दशक ९, समास ५ मध्ये केले आहे. या समासात स्वामींनी असे मांडले आहे की, ज्यात देव-देवतांना आपण मानतो, ते सर्व काल्पनिक आहेत.

 

कल्पून निर्मिले मंत्र। देव ते कल्पना मात्र॥

देव नाही स्वतंत्र्य। मंत्राधेन॥ (९.५.२१)

 

स्वामींच्या मते, कोणीतरी मंत्ररचना करतो. त्या मंत्राची देवता कल्पनेतून तयार होते. लोक मंत्रांच्या साहाय्याने त्या देवतेची प्राणप्रतिष्ठा करतात. याचा अर्थ देवांना स्वतंत्रपण नसून ते मंत्राच्या अधीन आहेत. अशा कल्पनानिर्मित देवदेवतांचे अस्तित्व खरे मानले तर त्यातून अनेक तार्किक प्रश्न उपस्थित होतात आणि त्यांची उत्तरे सापडत नाहीत. आता हेच पाहा- ब्रह्मदेवाने हे सारे विश्व निर्माण केले हे खरे मानावे, तर या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केले, हा प्रश्न उरतो; तसेच विष्णू सर्वांचा सांभाळ करतो असे मानले, तर या विष्णूला सांभाळणारा कोण, हे शोधता येत नाही. शंकर या विश्वाचा संहार करतो असे म्हटले, तर विश्वाच्या अंतकाळी या रूद्राचा संहार कोण करणार, हा प्रश्न शिल्लक राहतोच. 'काळ' हा या विश्वातील घटनांचे नियमन करतो असे मानले, तर 'काळाचा नियंता' कोण हे समजत नाही.

 

ब्रह्माने सकळ निर्मिले । ब्रह्मास कोणे निर्माण केले

विष्णूने विश्व पाळिलें ।

विष्णूस पाळिता कवणू ॥(९.५.२४)

रूद्र विश्वसंव्हारकर्ता।

परी रूद्रास कोण संव्हारिता।

कोण काळाचा नियंता।

कळला पाहिजे॥(२५)

 

स्वामींच्या तर्कशास्त्र विचाधारेत प्रचितीला महत्त्वाचे स्थान असल्याने हे प्रश्न त्यांनी मनाच्या श्लोकांमध्ये उपस्थित केले आहेत.

 

विधी निर्मितां लिहितो सर्व भाळीं।

परी लिहिता कोण त्याचे कपाळी।

हरू जाळितो लोक संव्हारकाळी।

परी शेवटी शंकरा कोण जाळी ॥

 

याचा अर्थ देवांची कल्पना पंचमहाभूतांनंतर असल्याने हे देव विश्व निर्माण करू शकत नाहीत. यासाठी कर्ता शोधायचा असेल, तर पंचमहाभूतांच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. तसे केले तर अखेरीस निर्गुण, निराकार ब्रह्म शिल्लक राहते. तथापि, निर्गुणांच्या ठिकाणी कर्तेपण संभवत नाही. सगुणाने सगुण निर्माण केले असे म्हणावे, तर सगुण आधीच निर्माण झालेले आहेत. याचा अर्थ सगुणाचा कर्ता त्याच्यापूर्वी असला पाहिजे. तसेच निर्गुण निर्विकारी असल्याने तेथे कर्तेपण संभवत नाही. निर्गुणाच्या दृष्टीने विचार करता हे विश्वच खोटे ठरते. (अगा ते जालेचि नाही। त्याची वार्ता पुरस्ती काई।) जे मुळात नाहीच, त्याच्या कर्त्याचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणून हे विश्व स्वभावतः झाले, हे म्हणणे योग्य होय, असे मत स्वामींनी दिले आहे.

 

लटिक्याचा कर्ता कोण।

हे पुसणेचि अप्रमाण।

म्हणोनि हेचि प्रमाण।

जे स्वभावेचि जाले॥ (१३.८.३१)

 

अशा रीतीने कर्त्याचा प्रश्न निकालात काढल्यावर आणखी एका प्रश्नाची चर्चा स्वामींनी या समासात केली आहे. तो प्रश्न त्याची उकल पुढील लेखात पाहू.

 

(क्रमश:)

- सुरेश जाखडी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@