लांब पल्ल्याचा प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2019   
Total Views |



जनसंपर्क कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून शिकायला हवे. त्यांच्यासारखी चिकाटी हवी.” केवळ एवढे बोलून चिकाटी कशी निर्माण होणार? विधानसभेच्या निवडणुका लांब नाहीत. परंतु, चिकाटीचा प्रवास मात्र अतिशय लांब पल्ल्याचा आहे.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आणि संघाचा द्वेष करण्यात शरद पवार यांची राजकीय हयात गेली. सर्व महाराष्ट्राला हे माहीत आहे. त्यामुळे त्यांनी जेव्हा संघाविषयी चार चांगले शब्द उच्चारले, तेव्हा, “शरदराव, तुम्हीसुद्धा!” असे उद्गार अनेकांच्या मुखातून निघाले असतील. खरं म्हणजे, शरदराव पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर देशाला संघापासून ‘भयानक’ धोका आहे, जनतेने सावध राहिले पाहिजे, पुरोगाम्यांची एकजूट झाली पाहिजे, असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते. त्याऐवजी ते म्हणाले, “जनसंपर्क कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून शिकायला हवे. त्यांच्यासारखी चिकाटी हवी. रा. स्व. संघाचे सदस्य कसा प्रचार करतात, हे लक्षात घ्यायला हवे. ते पाच घरांमध्ये भेटायला गेले आणि त्यातील एखादे घर बंद असेल, तर ते संध्याकाळी जातात. संध्याकाळी बंद असेल, तर सकाळी जातात. पण, त्या घरी जाऊनच येतात. हे त्यांच्याकडून शिकायला हवे.”

 

अपेक्षेप्रमाणे शरदरावांचे हे वक्तव्य गाजले. त्यांनी संघाच्या विचारधारेची स्तुती केली नाही किंवा तिचे समर्थनही केले नाही. त्यामुळे हे वक्तव्य संघाच्या समर्थनार्थ केले गेले, असा त्याचा अर्थ जर कुणी काढत असेल, तर तो चुकीचा आहे आणि पवारांवर अन्याय करणारा आहे. त्यांनी फक्त संघकार्यकर्त्यांच्या चिकाटीची प्रशंसा केलेली आहे. निवडणुकीच्या काळात संघ स्वयंसेवक घरोघर प्रचारासाठी फिरत होते, हे पूर्ण सत्य नाही. मे महिन्यात संघाचे संघशिक्षा वर्ग असतात. मी जेव्हा वर्ग केले, तेव्हा ते महाराष्ट्र प्रांताचे होत असत. आता हे वर्ग (प्राथमिक वर्ग वगैरे) जिल्हानिहाय होतात. या वर्गांच्या व्यवस्थेसाठी शेकडो कार्यकर्ते गुंतलेले असतात. शिक्षार्थी स्वयंसेवकांची संख्याही खूप मोठी असते. यापैकी कुणीही प्रचारासाठी जात नाही. सर्व स्वयंसेवकांना निवडणुकीत प्रचाराची आवड असते, असेही नाही. संघाची याबाबतीत कोणतीही सक्ती नसते. भाजपचे कार्यकर्ते प्रचार करतात. जे स्वयंसेवक भाजपचे काम करतात ते भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करीत असतात, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे.

अशा कार्यकर्त्यांमध्ये चिकाटी असते. तिचे अनुसरण करावे, असे पवार म्हणतात. चिकाटीचे अनुसरण भाषणाने होत नाही. संघ स्वयंसेवकाकडे चिकाटी असते. याचे एकमेव कारण तो विचाराने प्रेरित झालेला असतो. विचार जगणारे अधिकारी तो पाहत असतो. त्यांचा अनुभव घेत असतो. संघात अधिकारपद जेवढे मोठे, तेवढा प्रवास अधिक, तेवढा संपर्क अधिक. हे संस्कार त्याच्या मनावर सातत्याने होत असतात. त्यामुळे त्याला हे सांगावे लागत नाही की, आपले काम सर्व शक्ती पणाला लावून केले पाहिजे. काम करायचे म्हणजे सर्वशक्ती पणाला लावूनच करायचे, हे तो जाणत असतो. संघाचा कोणताही अधिकारी पंचतारांकित संस्कृतीत जगत नाही. त्याचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात किंवा वातानुकूलित हॉटेलमध्ये नसतो. तो सामान्य कार्यकर्त्याच्या घरी राहतो किंवा कार्यालयात राहतो. त्याला कुणीही सहजपणे जाऊन भेटू शकते. कार्यकर्त्यांना तो दुर्मीळ नसतो. कुणाच्याही घरी जाण्यास त्याला कसलीही अडचण नसते. अडीअडचणीचा तो अजिबात विचार करीत नाही. स्वयंसेवक हे सर्व पाहत असतात. त्यामुळे संपर्क करताना न थकता तो करायचा असतो, हे तो शिकतो.

 

‘जनसंपर्क’ हा संघकार्याचा प्राण आहे. त्याचा निवडणुकांशी काही संबंध नाही. निवडणुका येतात आणि जातात. ज्यांचे काम निवडणुकांच्या काळातच जनसंपर्क करण्याचे असते, त्यांना नित्याचा जनसंपर्क म्हणजे काय, हे समजणे अवघड आहे. संघाचे काम शाखांच्या माध्यमातून चालते. शाखेच्या कामाचे सूत्र असे आहे की, एक तासाची शाखा आणि २३ तासांचा संपर्क. व्यवहारात २३ तासांचा संपर्क शक्य नसतो. विद्यार्थी असेल, तर त्याला शाळा-महाविद्यालय असते. नोकरदार असेल तर त्याची नोकरी असते. आणि व्यावसायिक असेल तर त्याचा व्यवसाय असतो. या सर्वांसाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. संपर्कासाठी रोज एक-दोन तास काढावे लागतात. शाखा कार्यवाह आणि मुख्य शिक्षकांच्या बैठकीत, रोज संपर्कासाठी किती वेळ दिला जातो, हा प्रश्न विचारला जातो आणि त्याचे महत्त्व समजून सांगितले जाते.

 

संपर्क करायचा म्हणजे काय करायचे? निवडणुकीच्या काळात उमेदवाराचा प्रचार केला जातो. मतदान करण्याचा आग्रह केला जातो. यामागे स्वार्थाची भावना असते. काहीतरी मिळवायचे असते. संपर्कासाठी जे कष्ट केले जातात, ते काही तरी मिळविण्यासाठी केले जातात. काहीतरी मिळविण्यासाठी जे काम केले जाते, त्याचे नैतिक मूल्य फार कमी असते. संघ स्वयंसेवक असा संपर्क करीत नाहीत. त्याचा संपर्क ‘माणसे जोडण्यासाठीचा’ संपर्क असतो. लोकांच्या घरी जायचे. त्यांच्या सुख-दु:खाच्या कथा ऐकायच्या. त्यात समरस व्हायचे. काही प्रश्न असल्यास त्यातून मार्ग काढण्याचा विचार करायचा. असे काम देशभर लाखो स्वयंसेवक रोज करीत असतात. ते दिसत नाही. त्याची प्रसिद्धी काहीही होत नाही.

 

प्रत्येकाचे संपर्काचे क्षेत्र लहान-मोठे असते. असंख्य परिवाराशी तो जोडलेला असतो. काही कारणामुळे जर तो काही घरी गेला नाही, तर घरातील लोकांना चुकल्या चुकल्यासारखे वाटते. ते निरोप पाठवितात, चौकशी करतात आणि आत्मियतेने संघस्वयंसेवकाला घरी बोलवितात. संपर्काचा आधार शुद्ध सात्विक प्रेम हा असतो. काही मागायचे नसते. कसल्याही परतफेडीची अपेक्षा नसते, व्यक्तिगत काही मिळवायचे नसते. ज्याच्याशी मला संपर्क करायचा आहे, तो माझा आत्मिय आहे, माझ्या समाजाचे एक अंग आहे, हाच भाव स्वयंसेवकाच्या मनात असतो. त्यामुळे या संपर्काचे नैतिक मूल्य फारच मोठे असते. निवडणुकीत मते मिळविण्याचा हेतू धरून या संपर्काची रचना केली जात नाही. संघकार्य लोकांना ‘आपले कार्य’ वाटले पाहिजे, यासाठी हा संपर्क असतो.

 

संघ स्वयंसेवकांच्या संपर्क सूत्राचे अनुसरण करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. त्यासाठी केवळ चिकाटी कामाची नाही. संपर्क करण्यासाठी विचार हवा, आदर्श हवा आणि डोळ्यापुढे भव्य स्वप्न हवे. निवडणुका जिंकणे हे भव्य स्वप्न होऊ शकत नाही. समाज संघटित करायचा आहे आणि संघटित करून निर्दोष करायचा आहे, निर्दोष करून त्याला बलवान करायचा आहे, हे स्वप्न डोळ्यापुढे असावे लागते. हा ध्येयवाद एकदा मनाने स्वीकारला की, मग संपर्क हा त्याचा स्वाभाविक परिणाम होतो. शरदराव हे बुद्धिमान राजकारणी आहेत. बुद्धिमान माणसाचे वैशिष्ट्य असे असते की, तो केवळ बाह्य गोष्टीचा विचार करून थांबत नाही. तो मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या कृतीमागचा विचार आणि ध्येयवाद तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. शरदराव पवार यांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत स्वयंसेवकांची चिकाटी निर्माण करायची असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्येयवाद कोणता? हा ध्येयवाद जगणारे नेते कोण? हे कार्यकर्त्यांपुढे आणावे लागेल. त्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल. संपर्कामागे नैतिक अधिष्ठान उभे करावे लागेल.

 

राष्ट्रवादी काँग्रेसला आता २१ वर्षे होतील. राजकारणात एवढी वर्षे फार महत्त्वाची असतात. एवढ्या वर्षांत राष्ट्रवादीने महाराष्ट्रात काँग्रेसची जागा घ्यायला पाहिजे होती. स्वबळावर पक्ष उभा राहिला पाहिजे होता. परंतु, तसे काही झालेले नाही. लोकसभा निवडणुकीतही नेत्रदीपक यश मिळालेले नाही. केवळ नेत्यांभोवती पक्ष फिरता ठेवून पक्ष मोठा होणार की कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी करून पक्ष मोठा केला जाणार, याचा निर्णय पवारांनाच करायचा आहे. “जनसंपर्क कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून शिकायला हवे. त्यांच्यासारखी चिकाटी हवी.” केवळ एवढे बोलून चिकाटी कशी निर्माण होणार? विधानसभेच्या निवडणुका लांब नाहीत. परंतु, चिकाटीचा प्रवास मात्र अतिशय लांब पल्ल्याचा आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@