'दासी' ते 'सुपर फार्मर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2019   
Total Views |


शेतीतले दाणाभरही ज्ञान नसलेली
'दासी' ही कर्नाटकची वनवासी महिला आज सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वार्षिक चार लाखांचे उत्पन्न घेते. अशा या 'सुपर फार्मर' म्हणून सन्मानित दासीची कथा...

 

सेंद्रिय शेतीचे आजच्या कृषिजगतात पूर्वीसारखे फारसे अप्रूप राहिलेले नाही. कारण, हल्ली शेतकर्‍यांनाही सेंद्रिय शेतीच्या फायद्याचे 'गणित' बर्‍यापैकी उमगलेले दिसते. पण, शेतीचा 'श'ही माहिती नसणार्‍या एका कर्नाटकमधील वनवासी महिलेची चिकाटी आणि जिद्द मात्र पारंपरिक शेतकर्‍यांनाही लाजवणारी! या महिलेचे नाव दासी. पण, तिच्या नावार्थावर अजिबात जाऊ नका. कारण, आज केवळ मदत आणि मेहनतीच्या जोरावर ती 'सुपर फार्मर' ठरली आहे.

 

२००७ साली कर्नाटकातील एका राष्ट्रीय उद्यानात राहणार्‍या दासी आणि इतर 'जेनु कुरुबा' जमातीच्या वनवासी बांधवांचे सरकारतर्फे सोलेपुरा कॉलनी येथे स्थलांतर करण्यात आले. कुटुंबाला प्रत्येकी एक लाख रुपये, राहायला घर आणि कसायला तीन एकर जमीन सरकारतर्फे देण्यात आली. पण, दासीसह या वनवासी बांधवांना मात्र शेतजमीन कसण्याचा कुठलाही पूर्वानुभव नव्हता. त्यांची उपजीविका अवलंबून होती, ती जंगलांवर आणि छोट्या-मोठ्या मजुरीच्या कामांवर. त्यातच या स्थलांतरापूर्वी दासीच्या पतीचे अचानक निधन झाले. घरचा आधारस्तंभ एकाएकी कोसळला. त्यातच दासीवर तीन-चार नव्हे,तर तब्बल दहा मुलांची जबाबदारी होती. जीवन-मरणाच्या या प्रश्नाने दासीच्या जीवनावर सर्वार्थाने दास्यत्वाची भावना दाटून आली. पण, याही परिस्थितीत तिने धीर सोडला नाही.

 

दासीसह जवळपास ६० वनवासी कुटुंबे स्थलांतरित झाली. सरकारकडून किराण्यात थोडी फार सबसिडी आणि इतर मदत त्यांना मिळत होती. पण, पोटापाण्यासाठी त्यांना सरकारतर्फे फक्त शेतजमीन मिळाली. त्यासंबंधी कुठलेही मार्गदर्शन, बी-बियाणे, कीटकनाशके, पाणीपुरवठा यांचा अजिबात पत्ता नव्हता. त्यातही वनवासींना दिलेल्या शेतजमिनी जलस्पर्शाअभावी कोरड्याठाक पडलेल्या. घनदाट जंगलाच्या सान्निध्यात लहानाचे मोठे झालेल्या दासीसह इतर वनवासींनाही जमीन कसण्याचा अजिबात अनुभव गाठीशी नव्हता. तरी सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिले. पण, त्यात फारसे यश आले नाही. त्यांनी लावलेले रागीचे पीकही हत्तींनी लोळवले. त्यानंतर केरळचे काही कंत्राटदार त्यांचे आल्याचे पीक घेण्यासाठी शेतजमिनीच्या शोधात या वनवासींपर्यंत पोहोचले. या कंत्राटदारांनी जमीन कसण्याच्या मोबदल्यात वनवासींना वीजपुरवठा, बोअरवेल, मोटार, पाईप असे शेतीसाठी आवश्यक ते सगळे साधन-साहित्य देऊ केले. शेतीतून हाती काही न लागल्याने हतबल झालेल्या दासीसह इतर वनवासींनाही ही योजना स्वीकारली.

 

नियमित पाणीपुरवठ्यामुळे त्यांच्या शेतजमिनीचा पोतही सुधारला आणि आल्याचे पीक ते घेऊ लागले. पण, मुळात शेतीचे कौशल्यच अंगी नसल्यामुळे या वनवासी बांधवांना म्हणावा तितका परतावा पदरी पडत नव्हता. मग त्यांच्या मदतीला धावून आले ते 'वाईल्डलाईफ कन्झर्व्हेशन सोसायटी'चे काही स्वयंसेवक. या कृषिप्रशिक्षित स्वयंसेवकांनी दासीसह इतर वनवासींच्या ६० कुटुंबांना दत्तक घेतले. त्यांना बी-बियाणांपासून ते सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले. कृषिमेळाव्यांमध्ये त्यांना शेतीतील विविध प्रयोगांची प्रत्यक्ष माहिती दिली. मग आधी केवळ एक पीक घेणारी दासी तीन-तीन पिकांची लागवड एकत्र करू लागली. ज्वारी, टॉमेटो, वांगी, फरसबीसारख्या भाज्यांच्या पिकांमुळे दासीचा हळूहळू नफा वाढत गेला. या शेतकर्‍यांना फक्त शेतीसाठीचा १० टक्के खर्च उचलायचा होता. उर्वरित सरकारच्या सबसिडीचा त्यांना लाभ मिळत असे. तरीही काही वनवासी पीक कर्जाकडे वळले. पण, दासीने मात्र कुठल्याही कर्जाचा बोजा आपल्या डोक्यावर न घेता तिच्या कामातून, जिद्दीतून स्वावलंबन आणि स्वयंपूर्ततेतून शिवार हिरवेगार केले. एका पिकाऐवजी तीन-चार पिकांची लागवड, सेंद्रिय शेतीचा पुरेपूर अवलंब आणि अधिकाधिक उत्पादनातून उत्पन्नवाढ यामुळे कर्नाटकच्या 'विजय कर्नाटक' या कन्नड वृत्तपत्राने दासीला 'सुपर फार्मर' या सन्मानाने अलंकृत केले. दासीचे कर्नाटकमध्ये तर नाव झालेच, शिवाय इतर राज्यातील शेतकरी तसेच ग्राहकही सेंद्रिय शेतीचा हा किफायतशीर प्रयोग अनुभवण्यासाठी दूरवरून येऊ लागले.

 

दासीची दहापैकी सहा मुलं तिला शेतीच्या कामांमध्ये मदत करतात. पण, दासी केवळ शेतीवर थांबली नाही, तर तिने शेळीपालन, मेंढीपालन आणि मधुमक्षिकापालनालाही अल्पावधीत आपलेसे केले. शेतीबरोबर एक छानशी बागही उभी केली. आपल्या या प्रगतीविषयी दासी म्हणते की, “साधारण दहा वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही जंगलात राहत होतो, मला शेतीविषयी कुठलीही माहिती नव्हती. माझ्या पतीच्या निधनानंतर मी कसाबसा आमचा उदरनिर्वाह भागवला. पण, आज मी शेतीविषयी बरेच काही शिकले आहे. मी माझ्या मुलांना सांगितलं होतं की, आपण शेती केली की आपलं आयुष्य बदलेलं आणि बघा, नेमकं तसंच झालं. या सेंद्रिय शेतीने आमचं आयुष्य, भविष्यचं पार बदलून टाकलं.” आज दुष्काळ, पाणीटंचाईने महाराष्ट्रसह देशभरातील शेतकरी विवंचनेत आहेत. शेतकर्‍यांची पुढची पिढी शेतीपासून हळूहळू दुरावतेय. पण, जर दासीसारखी रानावनात वाढलेली वनवासी महिला शेतीमधून सोनं पिकवू शकते, तर तिचा आदर्श निश्चितच अनेक कृतिशील शेतकर्‍यांना प्रेरणा देणारा आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@