तेच ते आरोप करून हाती काही लागेल?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2019   
Total Views |



लोकसभा निवडणुकीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांना जनतेने धूप घातला नसल्याचे दिसत असताना विरोधी पक्ष तेच ते जुने आरोप का करीत आहेत? का त्यांच्या हाती अन्य काहीच मुद्दे नसल्याने त्यांची अशी बाष्कळ बडबड चालू आहे? जनतेला जी उत्तरे सापडली ती या चाचपडणाऱ्या विरोधकांना का सापडू नयेत याचे आश्चर्य वाटते!


लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर देशातील विविध विरोधी पक्ष आपला पराभव कशामुळे झाला, याची कारणे शोधण्यामध्ये मग्न असले तरी त्याची नेमकी कारणे विरोधकांना सापडली आहेत, असे म्हणता येणार नाही. विरोधकांकडून प्रचाराच्या दरम्यान जे आरोप केले जात होते ते आरोप जनतेला अमान्य असल्यानेच, जनतेने विरोधकांना धुडकाविले असताना, पुन्हा तेच ते आरोप करणे विरोधी नेत्यांनी चालू ठेवले आहे. तसेच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभवाची थोडीफार उपरती झाली असावी असे वाटत असताना केंद्र सरकारशी उभा दावा मांडण्याची त्यांची भूमिका अद्याप कायमच असल्याचे दिसून येत आहे. प. बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले ते पाहून तृणमूल काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरल्याचे दिसून येत आहे. प. बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. राजकीय हत्या होत आहेत. भाजपच्या पाच कार्यकर्त्यांची हत्या करण्याचा प्रकार अलीकडेच घडला आहे. भाजपचे काही कार्यकर्ते बेपत्ताही आहेत. लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा पराभव झाल्याने त्यांच्या पक्षाकडून हे सुडाचे राजकारण खेळले जात आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. प. बंगालमधील ममता सरकार ज्या सूडबुद्धीने वागत आहे त्याच्या निषेधार्थ भाजपने सोमवारी १२ तासांच्या बंदचे आयोजन केले होते. आपल्या नेतृत्वाखाली असलेल्या राज्यातील हिंसाचार रोखण्यात ममता बॅनर्जी या पूर्णपणे अपयशी ठरल्या असल्याचेच हे द्योतक आहे. राज्यातील ढासळत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेबद्दल केंद्राने विचारणा केली असता, योग्य ते स्पष्टीकरणही त्या सरकारकडून देण्यात आलेले नाही. उलट अशी विचारणा करणाऱ्या केंद्र सरकारलाच, कायदा-सुव्यवस्था हा विषय राज्याचा असल्याची आठवण तेथील एका मंत्र्याने करून दिली आहे! राज्यात कायदा-व्यवस्था राखण्याचे दायित्व घटनेने राज्य सरकारला दिले असले तरी, जर त्याचे पालन होत नसेल तर विचारणा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, याकडे ममतादीदी पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

 

ममता बनर्जी यांनी मोदी सरकारविरुद्ध जो उभा दावा मांडला आहे तो काही आजचा नाही. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान तर हे प्रकर्षाने दिसून आले होते. पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यास नकार देतानाच, निवडणुकीनंतर आपण नव्या पंतप्रधानांना भेटू, असे त्या म्हणाल्या होत्या. पण ममता बॅनर्जी यांच्या मनासारखे दान पडले नाही. भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा कितीही दुस्वास केला तरी आज ना उद्या त्यांना पंतप्रधानांची भेट घ्यावीच लागेल. ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच, नीति आयोगाच्या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट करून आपली जुनी भूमिका कायम असल्याचे दाखवून दिले आहे. पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या पत्रात, नीति आयोगाचे आर्थिक अधिकार काढून घेतले असल्याने त्या आयोगाच्या बैठकीस उपस्थिती लावणे हे निष्फळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आंतरराज्यीय परिषदेवर पंतप्रधानांनी लक्ष केंद्रित करण्याचा अनाहूत सल्लाही त्यांनी दिला आहे. केंद्र राज्य संबंधांची जाहीर चर्चा करून केंद्र सरकारविरुद्ध प. बंगालमधील जनतेला भडकविण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. लोकसभेतील दारूण पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या हातातील सत्ता जाण्याच्या भीतीतूनच त्यांची केंद्रावर आगपाखड चालू असल्याचे या वरून दिसून येते. ममतादीदी यांची अशी तऱ्हा तर तिकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेही पंतप्रधान मोदी यांच्यावर खोटे आरोप करण्यात मग्न आहेत. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणारे, पंतप्रधानपदावरील व्यक्तीचा जाहीर उपमर्द करणारे राहुल गांधी पराभवातून काही धडा शिकल्याचे दिसत नाही. अमेठीमध्ये पराभव झालेल्या पण केरळमधील वायनाडमधून विजयी झालेल्या राहुल गांधी यांनी आपला मूळ स्वभाव गेला नसल्याचेच दाखवून दिले आहे. मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेला प्रचार हा खोटारडेपणाने भरलेला, विखारी, द्वेष भावनेने भरलेला होता, असा आरोप वायनाड येथे बोलताना केला. त्या उलट काँग्रेसने प्रेम, सत्य आणि आपुलकीची भावना आपल्यापुढे ठेवली होती, असेही राहुल गांधी म्हणतात! जर राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी अयोग्य प्रचार केला असेल तर जनतेने प्रचंड मतांनी भाजपला निवडून दिले असते का? असे बिनबुडाचे वक्तव्य करून आपण देशातील मतदारांचा घोर अपमान करीत आहोत, हे राहुल गांधी यांना त्यांच्या सल्लागारांपैकी कोणीतरी सांगायला हवे! पराभवातून काही चांगला बोध घेऊन आपली जी पत गेली आहे ती पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करायचा की ती आणखी लयाला न्यायची? आपण मोदी यांच्यावर जे आरोप करीत होतो ते जनतेने मुळीच गांभीर्याने घेतले नाहीत, हे त्यांच्या अजूनही लक्षात कसे येत नाही?

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, स्वत:ला जाणते नेते म्हणविणारे शरद पवार यांनी मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या कार्यपद्धतीचे केलेले कौतुक पाहून उशिरा का होईना शरद पवार यांना संघाबद्दल चांगले बोलावेसे वाटले, याबद्दल आश्चर्य वाटले होते. पण आपल्या म्हणण्याशी चिकटून राहतील तर ते शरद पवार कसले? त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागली. तशी टीका करण्याचे काही कारणही घडले नव्हते. पण पवार यांना संघाची विचारसरणी ‘घातक’ असल्याचा साक्षात्कार झाला. संघाची विचारसरणी देशाच्या ऐक्यास घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या ताज्या भाषणात त्यांनी आणीबाणीचे उदाहरण दिले. लोकसभा निवडणूक प्रचाराच्यावेळी विरोधकांनी देशात आणीबाणीसारखी परिस्थिती असून लोकशाही संकटात आल्याचा प्रचार केला होता. सर्व महत्त्वाच्या संस्थांचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण झाले काय? विरोधकांच्या या आरोपांवर जनतेने मुळीच विश्वास ठेवला नाही. मोदी सरकार चांगल्या प्रकारे काम करीत असून जनतेच्या कल्याणासाठी ते झटत असल्याची अनुभूती घेऊन जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकला. असा सर्व ताजा इतिहास असताना शरद पवार यांना पुन्हा आणीबाणीचे स्मरण करून द्यावेसे का वाटले? लोकशाहीवर आणि राज्य घटनेवर विश्वास असलेल्या मोदी यांच्या राजवटीची तुलना इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या कारभाराशी कारण नसताना शरद पवार यांनी का केली? मोदी यांचे सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर येऊन काही दिवस लोटले नाहीत तोच एकदम असे टोकाचे भाष्य त्यांना का करावेसे वाटले? या सर्वांचे कारण एकच आणि ते म्हणजे पराभवाच्या धक्क्यांमधून विरोधी नेते अजून सावरलेले नसल्याने काय बोलावे हेच त्यांना कळेनासे झाल्याने जुने, चघळून चोथा झालेले मुद्दे ते पुन्हा उगाळत बसले आहेत! लोकसभा निवडणुकीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांना जनतेने धूप घातला नसल्याचे दिसत असताना विरोधी पक्ष तेच ते जुने आरोप का करीत आहेत? का त्यांच्या हाती अन्य काहीच मुद्दे नसल्याने त्यांची अशी बाष्कळ बडबड चालू आहे? जनतेला जी उत्तरे सापडली ती या चाचपडणाऱ्या विरोधकांना का सापडू नयेत याचे आश्चर्य वाटते!

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@