अंत वीर घटोत्कचाचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |


 


दुर्योधनाला राधेयचा खूप अभिमान वाटला आणि त्याने सन्मान म्हणून त्याला आपल्या रथात घेतले. कौरव सैन्य आनंदाने राधेयच्या नावाचा जयघोष करत नाचू लागले.


शेवटी अत्यंत नाईलाजाने राधेयने इंद्रदत्त ‘वासवीशक्ती’ घटोत्कचावरती वापरायची असे ठरविले. ब्राह्मण वेशात येऊन इंद्राने त्याच्याकडून कवचकुंडलांचे दान मागितले होते आणि त्याच्या बदल्यात त्याला ‘वासवीशक्ती’ दिली होती, जी फक्त एकदाच त्याला एकाच शत्रूवरती वापरता येणार होती. त्या क्षणी राधेयने मनोमन ठरवले होते की, ही शक्ती फक्त अर्जुनावरतीच वापरायची. पण, आज त्याच्यापुढे घटोत्कच हा एक मोठाच पेचप्रसंग होऊन उभा राहिला होता आणि हे सर्व करणारा श्रीकृष्णच आहे, हेसुद्धा राधेयला कळून चुकले होते. दैवाची आपल्याला साथ नाही, हे त्याला कळून चुकले होते आणि नाईलाजाने आपल्या सैन्यास वाचविण्यासाठी त्याला ही शक्ती वापरणे भाग होते. ज्या वेळी इंद्राने ही शक्ती त्याला दिली, तेव्हा तो म्हणाला होता, “राधेया, मला माहिती आहे की, तुझा या जगात एकमेव शत्रू अर्जुन आहे. पण, तुला ही शक्ती त्याच्यावरती वापरता येणार नाही. कारण, प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार असलेला श्रीकृष्णच त्याचे रक्षण करतो आहे.” त्यावेळी राधेयला इंद्राचे हे वक्तव्य महत्त्वाचे वाटले नव्हते. पण, आता त्याला ते प्रकर्षाने आठवले.

 

‘मित्रप्रेम’ आणि ‘कर्तव्य’ यापुढे त्याला आपला जीव महत्त्वाचा वाटत नव्हता. ही शक्ती वापरून अर्जुनाला ठार करण्यापेक्षा आपण रणांगणावर लढून मृत्यू कवटाळू, हाच विचार आता त्याच्या मनात प्रबळ झाला. तो मनात म्हणाला, “माझ्या प्रिय मित्रा दुर्योधना, ज्या क्षणी ही शक्ती मी घटोत्कचावर फेकीन, त्याचक्षणी माझा आणि तुझा पण नाश होणार असे ठरलेले असेल. आता या जगावर राज्य करण्याची तुझी स्वप्ने ही स्वप्नेच राहतील. मला तर वीरमरण येईल आणि मी समाधानी असेन. कारण मला आता या जगण्याचा कंटाळा आला आहे,” असे म्हणून राधेयने ती शक्ती हाती घेतली. तिच्याकडे क्षणभर पाहिले. त्याला अश्रूंमुळे काही दिसेना. त्याने डोळे मिटले आणि ती शक्ती घटोत्कच राक्षसावर सोडली. विजेचा लोळ पडावा, तशी ती शक्ती घटोत्कचाच्या वस्त्रांतून त्याच्या देहात शिरली. त्याला कळून चुकले की, आता आपला अंत होत आहे. पण, जाता जाता कौरवांचे अधिकाधिक नुकसान करून जावे, हा विचार त्याच्या मनी येऊन त्याने आपला देह फुगवून मोठ्ठा केला. त्याने आपला देह प्रचंड फुगवला आणि तो कौरवांच्या सैन्यावर कोसळला. त्याच्या त्या अगडबंब देहाखाली कौरवांचे एक अक्षौहिणी सैन्य सापडले आणि चिरडून मेले. दुर्योधनाला राधेयचा खूप अभिमान वाटला आणि त्याने सन्मान म्हणून त्याला आपल्या रथात घेतले. कौरव सैन्य आनंदाने राधेयच्या नावाचा जयघोष करत नाचू लागले. आपल्या पुत्राचा घटोत्कचाचा वध झालेला पाहून भीमाला खूप वाईट वाटले नि तो सुन्न झाला. तो शोकातिरेकाने भूमीवर कोसळला आणि अश्रू ढाळू लागला. युधिष्ठिर पण रडू लागला, त्याने त्याचा हात हाती घेऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. ते दोघही एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, घटोत्कचाचा वध झालेला पाहून केवळ एकाच व्यक्तीला आनंद झाल्याचे दिसत होते. ती व्यक्ती म्हणजे श्रीकृष्ण! त्याने आनंदाने रथातून बाहेर उडी मारली आणि परत परत अर्जुनाला करकचून मिठी मारली. त्याचे हे वागणे अस्वाभाविक होते आणि ते पाहून सारेच चकीत झाले. अर्जुनास तर ते अजिबात आवडले नाही. त्याने या असभ्य वर्तनाबद्दल कृष्णाला विचारले.

 

कृष्ण म्हणाला, “अर्जुना, आजचा हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. राधेयकडे असलेली ती वासवीशक्ती आता इंद्रदेवाकडे परत गेली आहे. आता राधेयला घाबरण्याचे कारणच उरले नाही. तो आता जवळ जवळ मृतांमध्ये जमा आहे. अरे ती शक्ती त्याच्याकडे असेस्तोवर तू त्याच्याशी कसा लढू शकला असतास? तुझ्यासाठी इंद्रदेवाने ब्राह्मणाचे रूप घेऊन आधी त्याची कवचकुंडले दान म्हणून मागून घेतली आणि त्याच्या बदल्यात त्याला ही वासवीशक्ती दिली. तो सर्व देवांना पण भारी योद्धा आहे. तुझे गाण्डिव धनुष्य आणि माझे चक्र पण काही करू शकले नसते. हे तर दुर्योधनपण जाणतो. म्हणूनच तो म्हणत होता की, एक राधेय हे युद्ध जिंकण्यास पुरेसा आहे. मात्र, आता ही वासवीशक्ती वापरली गेल्यामुळे तो दात काढलेल्या नागासमान आणि विझलेल्या अग्निसमान आहे. तरीही आतासुद्धा फक्त तू आणि तूच त्याचा वध करू शकतोस! तो महान धनुर्धर आहे यात शंकाच नाही. जसा हत्तीमध्ये वनराज सिंह, मध्यान्हीचा सूर्य म्हणजे राधेय! पण आता तू त्याला ठार करू शकतोस आणि तुझा जीव वाचणार म्हणून मला आनंद झाला आहे.” मग इतके दिवस राधेयने वासवीशक्ती अर्जुनावर का नाही वापरली, असे सात्यकीने कृष्णाला विचारले. तो म्हणाला, “प्रत्येक रात्री दु:शासन, शकुनी आणि दुर्योधन हे राधेयला आठवण करून देत की वासवीशक्ती अर्जुनावर फेकून त्याला संपव आणि राधेय त्या संधीची वाटच पाहत होता. पण, मी अर्जुनाचा रथ अशा रीतीने नेत असे की, ते दोघे कधीच समोरासमोर येऊ नयेत! अशा रीतीने मी त्याला वाचविले आहे आणि घटोत्कचाला पण पाचारण करण्यास मीच अर्जुनाला सुचविले.”

 

युधिष्ठिराचे घटोत्कचावर अतोनात प्रेम होते. कृष्ण त्याच्या जवळ आला तेव्हा त्याची शुद्ध हरपली आहे, असे त्यास समजले. काही वेळात तो शुद्धीवर आला, तेव्हा कृष्णाने त्याचे सांत्वन केले. कृष्ण त्याला म्हणाला, “युधिष्ठिरा, असा हातपाय गाळू नकोस. हे असं दु:खात बुडून जाणं तुझ्यासारख्या राजास शोभत नाही. तू शूर आहेस तुला हे सहन केलेच पाहिजे.” युधिष्ठिर म्हणाला, “माझ्यासारखा पापी या धरेवर मीच असेन, जो घटोत्कच आमच्या सर्व दु:खात बरोबर साथ देत होता त्याचा वध कसा होऊ शकतो? मला वाटते, अभिमन्यूच्या मृत्यूच्या वेळी जी चूक झाली, ती आपण सुधारलीच नाही. त्याच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्यांचा वध या आधीच केला असता, तर आज हा दिवस दिसला नसता. आत्ता पण घटोत्कचाच्या वधास कारणीभूत असलेल्या राधेयचा त्वरित वध केला पाहिजे. मी त्याच्यावर चालून जातो आणि त्याचा सूड घेतो,” असे म्हणून युधिष्ठिर त्वेषाने पुढे गेला. त्याच्या मागोमाग कृष्ण व अर्जुन धावले. वाटेत युधिष्ठिराला व्यास महर्षी भेटले. त्यांनी त्याचे सांत्वन करून त्याला शांत केले व समजावले की, “वासवीशक्तीचा वापर झाल्याने आत युद्ध जिंकल्यासारखेच आहे. पाच दिवसात तू या पृथ्वीचा राजा होशील.”

 

- सुरेश कुळकर्णी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@